पॅरा आॅलंपिकसाठीही शीतलदेवी सज्ज
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे जम्मूमधून…
तिरंदाजीमध्ये अचूक लक्ष्यभेद करायचा तर जशी एकाग्रता, वेध घेणारी नजर महत्त्वाची असते तसेच महत्त्वाचे असतात हात. पण दोन्ही हातच नसतील तर तिरंदाजी करता येईल का? आपण स्वाभाविकपणे नाही म्हणू. पण दोन्ही हात नसताना अचूक वेध घेणारी आपली भारतीय कन्या शीतलदेवी म्हणजे जिद्दीचा मूर्तीमंत आदर्श आहे. एशियन पॅरागेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी ही खेळाडू आता पॅरा आॅलंपिकसाठीही सज्ज झाली आहे. ती अचूक सुवर्णवेध करेल अशी भारताला आशा आहे आणि त्यासाठी कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी आहेत.
जम्मू जिल्ह्यात जन्मलेल्या शीतलला जन्मतःच फोकोमेलिया या दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे शीतल देवी ही हात नसताना तिरंदाजी करणारी आणि सक्रिय असणारी एकमेव खेळाडू ठरली आहे. एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी शीतल देवी, आता 28 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत उतरणार आहे.
यंदाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत जगभरातून 4,400 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 22 खेळ खेळले जातील. त्यात महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये शीतल देवी या सध्या जगात पहिल्या स्थानावर आहे. 2023 साली झालेल्या ‘पॅरा-आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये रौप्यपदक मिळाल्याने शीतल देवी पॅरिसच्या स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शीतलने, वयाच्या 15 वर्षांपर्यंत तिरंदाजीमध्ये वापरला जाणारा ‘बो आणि अॅरो’ (धनुष्य आणि बाण) बघितलेला देखील नव्हता. 2022 मध्ये तिच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने, तिला जम्मूच्या कटरामध्ये असणाऱ्या, श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जायचा मार्ग सुचवला. आणि तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
तिथे शीतलची भेट तिचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान आणि अभिलाषा चौधरी यांच्याशी झाली. या दोन प्रशिक्षकांनी तिला तिरंदाजीच्या जगाची ओळख करून दिली. त्यानंतर ती लवकरच कटरा शहरातील प्रशिक्षण शिबिरात राहायला गेली. आपल्या उजव्या पायाच्या मदतीने बो उचलणाऱ्या, उजव्या खांद्याचा वापर करून त्याची स्ट्रिंग मागे खेचणाऱ्या आणि जबड्याचा वापर करून अॅरो (बाण) सोडणाऱ्या शीतल देवींसमोर पॅरिसमध्ये, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली जेन कार्ला गोगेल आणि जागतिक चॅम्पियनशिप विजेती ओझनूर क्युर यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान असणार आहे.
याविषयी शीतल देवी म्हणते की, “मला सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा आहे, मी आत्तापर्यंत जिंकलेल्या पदकांवर नजर टाकते तेव्हा, मला आणखीन पदकं जिंकण्याची प्रेरणा मिळते. मी आता कुठे सुरुवात केली आहे.” तिरंदाजीची सुरुवात करण्याआधी शीतल देवी पायांनीच लिहिणे, मित्रांसोबत झाडावर चढणे अशी कामं करत होती, आणि याच कामांनी या खेळासाठी आवश्यक असणारं सामर्थ्य निर्माण केल्याचं ती सांगते.
सुरुवातीला खेळताना आलेल्या अनेक निराशेच्या क्षणांमध्ये, अमेरिकन तिरंदाज मॅट स्टुटझमन यांच्याकडून तिने प्रेरणा घेतली. मॅट त्यांच्या पायांचा वापर करून तिरंदाजी करतात. यासाठी ते सहाय्यक उपकरणाचा देखील वापर करतात. मॅट जे उपकरण वापरायचे, ते उपकरण घेऊन देणं हे शीतल देवी यांच्या वडिलांसाठी शक्य नव्हतं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते परवडत नव्हतं. अशावेळी तिचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांनी स्वतः शीतलसाठी एक विशिष्ट बो (धनुष्य) बनवला. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून आणि तिथल्याच फोर्ज शॉपमध्ये जाऊन त्यांनी शीतल देवीसाठी हे मशीन बनवले.
सुरुवातीला धनुष्य वापरण्याऐवजी त्यांनी रबरबँड किंवा थेराबँड वापरून सरावाला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 5 मीटर अंतरावर ठेवलेली लक्ष्य भेदून शीतल देवीने सराव केला. फक्त चारच महिन्यांमध्ये शीतल देवी नियमित बो आणि अॅरोचा वापर करून 50 मीटर अंतरावर ठेवलेलं लक्ष्य भेदू लागली. आणि अशारितीने कंपाउंड ओपन कॅटेगरीसाठीचे निकष पाळून शीतल देवी सराव करू लागली. फक्त दोनच वर्षांमध्ये, अगदीच कमी अंतरावर ठेवलेल्या लक्ष्यावर शूट करून सराव करणाऱ्या शीतलने, 2023 साली झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये, महिलांच्या जागतिक वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेच्या, अंतिम फेरीत सलग सहावेळा 10 पॉईंट मिळवले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
शीतल देवीचा प्रवास हा फक्त कठोर परिश्रमामुळेच नाही तर तिने वेळोवेळी केलेल्या त्यागाचा सुद्धा एक परिपाक आहे. तिला पॅरिसमध्ये तिचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे.