- माणूसकीचे असेही उत्कट दर्शन
- अनोळखी मुलाचा जीव उचलण्यासाठी दातृत्वाचा आदर्श
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पोलंडहून…
ही बातमी परदेशातील असून तिचा भारताशी संबंध नाही. तरीही ही बातमी माणुसकीचे उत्कट दर्शन घडवणारी आहे म्हणून प्रत्येक भारतीयाने वाचावी अशी आहे.
मारिया आंद्रेत्जि़क ही २५ वर्षांची पोलॅन्डची खेळाडू. २०१८ साली तिला हाडांचा कॅन्सर असल्याचे कळले. सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झाले आणि मारिया परत फील्डवर आली. बारा दिवसांपूर्वी जिंकलेलं ऑलम्पिकचं सिल्वर मेडल तिने चिमुरड्याच्या उपचारासाठी लिलावात काढले आणि एक आदर्श उभा केला. तिचे हे कृत्य कौतुकास्पद तर आहेच तितकेच ते प्रेरणादायी पण आहे.
२०१६ च्या रिओ ऑलम्पिकला भालाफेकमध्ये मारियाचे पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकले. २०१८ साल उजाडले आणि तिला हाडांचा कॅन्सर असल्याचे समजले. त्यामुळे टोकियो ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्याचं तिचं स्वप्न जवळपास संपुष्टात आले. सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झाले आणि मारिया परत फील्डवर आली. तिने फील्डवर यशस्वी आगमन करत २०२०च्या समर ऑलम्पिकला सिल्वर मेडल पटकावले आणि तिचे टोकियोचे दार उघडले. टोकियोत तिने स्वतःचा रेकॉर्ड आणि पोलंडचा राष्ट्रीय रेकॉर्ड तर मोडलाच; पण त्याच सोबत विश्वविक्रमाच्या यादीत आजतागायतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी करत तिने सिल्वर मेडलही पटकावले.
मारिया आंद्रेत्जि़क जेव्हां टोकियोत ही कामगिरी करत होती, तेव्हां मायदेशी पोलंडमधे एक लहान मुलाचे आईबाप हैराण झाले होते. त्यांच्या ८ महिन्याच्या मिलोस्ज़ेक मलिसाला हृदयाचा दुर्मिळ विकार असल्याचे निदर्शनास आले होते. ह्या मुलाच्या आजारावर उपचार एकच होता शस्त्रक्रिया आणि त्यासाठी खूप खर्च येणार होता.
अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरला ही शस्त्रक्रिया होऊ शकणार होती. पण त्यासाठी ३,८५,००० डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास ३ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. तो खर्च ऐकून मिलोस्ज़ेकच्या आई बाबांच्या तोंडाचं पाणी पळाले. आई-वडिलांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जेमतेम निम्मे पैसे जमवले. “आमच्या मिलोस्ज़ेकला वाचवा.” ही आईवडिलांची हाक मारियाने ऐकली.
मदत करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने ऑलम्पिकचे सिल्वर मेडल तिने मिलोस्ज़ेकच्या उपचारासाठी लिलावात काढले.
मेहनत, साधना, तपश्चर्या, ध्यास लावून मेडलच्या रुपात तिने साकारलेले स्वप्न तिने त्या मुलासाठी लिलावात काढले पोलंडच्या एका सुपरमार्केट चेन झाबका पोल्स्काने हे मेडल सव्वा लाख डॉलर्सला विकत घेतले. पण झाबका पोल्स्काचे मालक इथेच थांबले नाहीत. त्यांनी मारियाच्या मदतीच्या भावनेला दाद देऊन मारियाचे सिल्वर मेडल तिला परत दिले.
मारिया आंद्रेत्जि़कसारखे खेळाडू खेळावर, रिकॉर्डबुक्समधे आपलं नाव लिहितातच, पण इतिहासावरही आपलं नाव कोरून ठेवतात.