स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे धुळ्याहून
बारीपाडा पॅटर्न नेमका आहे तरी काय?
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या सुमारे शंभर उंबऱ्यांच्या बारीपाडा गावात मागच्या तीन दशकांमध्ये जो काही बदल घडला तो चैत्राम पवार यांच्यामुळे झाला आहे. पर्यावरण रक्षणाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ राबवणारे चैत्राम पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे कार्य उल्लेखनीय तर आहेच पण त्यातून खूप काही शिकण्यासारखे देखील आहे.
कोकणा आणि भिल्ल या आदिवासी जमातीचे लोक राहत असलेल्या बारीपाड्यात तीन दशकांपूर्वी दरवर्षी दुष्काळ पडायचा.
डिसेंबर महिना उलटला की गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागायचं, गावात कसलाही रोजगार उपलब्ध नव्हता. पाणी नसल्याने शेती व्हायची नाही आणि या सगळ्याला कंटाळलेले बारीपाड्याचे लोक हिवाळ्यानंतर स्थलांतर करायचे. कुणी ऊसतोडणीसाठी गाव सोडायचं तर तर कुणी बांधकामावर मजूर म्हणून कामाला जायचं.
या गावात साधी नियमित शाळादेखील नव्हती .
अशातच एका जिद्दी बापाचा मुलगा मिळेल तसं शिक्षण घेतो, एम. कॉमची पदवी मिळवतो आणि शिक्षणानंतर गावाचा कायापालट करण्यासाठी बारीपाड्यात परत येतो.
काही संस्था, संघटनांची मदत आणि बारीपाड्यातील लोकांच्या सहकार्याने या गावाच्या आजूबाजूला असलेलं जंगल वाचवण्याचा निश्चय करतो आणि त्यानंतर पुढची तीन दशकं या गावाचा कायापालट करणारा बारीपाडा पॅटर्न राबवला जातो. बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावातली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे चैत्राम पवार.
काय आहे बारीपाडा पॅटर्न? “बारीपाडा हे सीमाभागावरचं एक छोटंसं गाव आहे. १९९१ पूर्वी शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी आणि वन याबाबतीत हे गाव पूर्णपणे विस्कळीत होतं. यात बदल करण्यात चैत्राम पवार यांना वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची मदत झाली.
“या संस्थेने लक्षात आणून दिलं की, भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर माणसाचं अस्तित्वच संपेल. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचं काम करण्यासाठी १९९१ मध्ये एक गाव निश्चित केलं. दोन वर्षे गावाला संघटित करण्यामध्ये वेळ गेला आणि या कामाला एक दिशा मिळाली.
ज्या वनवासी कल्याण आश्रमाचा उल्लेख केला आहे ती संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचा एक भाग आहे. देशातील आदिवासी समुदायाच्या विविध विषयांवर ही संस्था काम करते.
जंगल वाचवण्याचा विडा उचललेल्या बारीपाड्याच्या लोकांनी यासाठी अनेक नियम बनवले.
याबाबत बोलताना चैत्राम पवार म्हणाले, “आम्ही गावातील लोकांचं संघटन करून वनव्यवस्थापन सुरू केलं. गावाच्या शेजारील जंगलाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही नियम बनवले. मुख्य झाड तोडताना सापडला तर त्याला १०५१ रुपये दंड, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, मुळ्या आणल्या तरी दंडात्मक कारवाई, राखीव जंगलात बैलगाडी नेऊ नये, वॉचमन आम्ही स्वतः बसवले या सगळ्या प्रयत्नांमधून बघता बघता तब्बल अकराशे एकरचं जंगल गावाने उभं केलं. बॉटनिकल सर्वेक्षण केल्यानंतर लक्षात आलं की आता २७ प्रजाती आमच्या जंगलात आहेत. आम्ही वनभाजी महोत्सव सुरू केला. एकूण ४४५ भाज्या तिथे असतात.
“२००६ च्या सामुदायिक वनाधिकार कायद्यानुसार या जंगलाचा मालकी हक्क गावाला मिळाला. यातून गावाच्या मालकीची पाच ते सहा हजार कोटींची मालमत्ता तयार झाली. सर्वांगीण विकासासाठी आणखीन काही प्रयोग करायचे ठरवले,असेही पवार सांगतात.
यानंतर शेती आणि स्थलांतर थांबविणे हा प्रश्न समोर होता.
वनसंरक्षणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता प्रश्न होता उदरनिर्वाहाचा.
दरवर्षी पाचवीला पुजलेल्या दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी विस्थापित होणाऱ्या कुटुंबाना स्थिर करण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करणं गरजेचं होतं.
याबाबत चैत्राम पवार म्हणाले, “गावात शेतीमध्ये काही प्रयोग आम्ही करू शकतो का हे तपासलं. पण गावात पाणीच नव्हतं तर शेती कुठून करणार? मग श्रमदानातून बंधारे बांधायचं ठरवलं. आम्ही श्रमदानातून ४८५ बांध बांधले, जवळपास ५ किलोमीटर भरता येईल एवढी सी.सी.टी. (खोल सलग समतल चर) गावाने मिळून खोदली. यामुळे जलस्तर हळूहळू वर यायला लागला. अशाप्रकारे वनसंवर्धन आणि श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीमध्ये बदल घडून आला.
आमच्या गावातले निम्म्यापेक्षा जास्त कुटुंब ऊसतोडणीला जायचे, विस्थापित व्हायचे पण गावात पाणी आलं आणि हे लोक गावाकडे परतले. गावाकडे माणसं परत आली, ती स्थिर झाली. यामुळे गावातील शिक्षण, आरोग्य आणि शेतीवर काम करणं सोपं झालं. वनसंवर्धन, भूसंवर्धन आणि जलसंवर्धनावर काम केलं. बारीपाडा आणि परिसरातील ११ हजार ७६७ हेक्टर वनक्षेत्र गावकऱ्यांच्या मालकीचं केलं. त्यामुळे विकासाला चालना मिळाली, असे पवार सांगतात.
तसेच ते पुढे सांगतात की, “हे सगळं काम करत असताना आम्हाला वेगवेगळ्या संस्थांनी मदत केली. आयआयटी मुंबई, मीनाक्षी मेहता फाउंडेशन या संस्थांनी मदत केली. या कंपनीने आम्हाला सामुदायिकरीत्या सौर ऊर्जा वापरता यावी, यासाठी ३२ सौर पंप लावून दिले. हे पंप आम्ही मापलगाव, सावरीपाडा, मोहगाव, कालघर आणि बारीपाडा या गावांमध्ये वाटून दिले.
वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आम्ही देशभर काम करत आहोत. केवळ बारीपाडाच नाही झारखंड, ओरिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये आदिवासी समुदायाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं चैत्राम पवार यांनी सांगितलं.