अनिल अवचटांच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
आपल्या सामाजिक पत्रकारितेतून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेले, मुक्तांगणच्या रुपाने व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, अखंड लेखनसाधनेतून विविध विषयांना स्पर्श करणारे, बासरीवादनात रमणारे, चित्रकलेला आनंद घेणारे, लाकूडकामात रंगून जाणारे, ओरीगामी करताना लहान मूल होऊन जाणारे अशी एका माणसाची किती रुपं सांगावीत… सतत कुतूहल जागं ठेवून झपाटल्यासारखा त्या विषयाचा शोध घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. अनिल अवचट. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करतानाच त्यांचा जवळून सहवास लाभलेल्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पुणेकरांनी पुन्हा एकदा ते उत्साहाने झपाटलेले झाड अनुभवले…
ज्येष्ठ लेखक स्व. अनिल अवचट यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्ताने अवचट यांच्या अनेकविध आठवणींना उजाळा दिला. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी, चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर, प्रख्यात संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी, अनुवादक अपर्णा महाजन, मॅजेस्टिक प्रकाशनचे संचालक अशोक कोठावळे, युनिक फिचर्सच्या कार्यकारी संपादक गौरी कानेटकर, मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर उपस्थित होते. यशोदा वाकणकर यांनी सर्वांना दीड-दोन तास रंगलेल्या कार्यक्रमात सगळेचजण अनिल अवचट यांच्या आठवणीत रंगून गेले. या निमित्ताने अनिल अवचट यांनी लिहिलेल्या ‘जवळचे’ आणि ‘द वंडर दॅट इज पुणे’ या इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे या निमित्ताने प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सगळ्यांनीच अवचटांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
डाॅ. आनंद नाडकर्णी म्हणाले, मी त्यांना वडिलांच्या स्थानी मानतो. गेली ४२ वर्षे मी पुण्यात आल्यानंतर बाबांच्याच पत्रकारनगरमधील घरी जाऊन मुक्काम करतो. बाबा हा क्षणस्थ माणूस होता. त्यांची मग्नता म्हणजे त्यांचे ध्यान होते. त्यांच्या चांगुलपणाचे चांदणे नेहमी पसरत राहुले. त्याला अमावस्याच नव्हती. त्या चांगुलपणामागे परताव्याचा हट्ट नव्हता. पुढे पुढे तर अपेक्षाही विरळ होत गेल्या. आजही त्यांच्या शब्दांच्या आणि पुस्तकांच्या रूपाने त्यांचे चांदणं आपल्यावर मायेची पाखर घालते आहे. सद्भावनेचा झरा म्हणजे बाबा हे व्यक्तिमत्त्व होते.
डाॅ. सलील कुलकर्णी म्हणाले, अनिल अवचटांच्या हाताला निर्मितीचे डोहाळे होते. व्यस्त असणं आणि मग्न असणं यात फरक असतो. अनिल अवचट हे कायम मग्न असायचे. ते कायम कसल्यातरी सुंदर तंद्रीत आहेत असे वाटायचे. प्रत्येक क्षणाला जगणं हे अनिल अवचट यांना जमले होते. म्हणून जे करू त्याचा उत्सव ते करू शकले. आपल्या संवेदनशीलतेचा परीघ वाढवण्याचे काम अवचटांनी केले. कायम चांगुलपणा पेरणारे हे व्यक्तिमत्त्व होते.
सुनिल सुकथनकर म्हणाले, झोळी घेऊन खेड्यापाड्यात हिंडणारा सामाजिक पत्रकार ते ओरीगामी करणारा गोड आजोबा हे त्यांच्यातील स्थित्यंतर सुखावणारे होते. मध्यमवर्गीयांच्या जाणीवा जागं करण्याचं काम त्यांनी मनापासून केले. पुलंनंतर महाराष्ट्रातील एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणून अनिल अवचटांकडेच पाहिले जाते. जे अनुभवले ते लगेच तितक्याच ताकदीने पोहोचवण्याची ताकद त्यांची लेखनात होती.
गौरी कानेटकर आणि अशोक कोठावळे यांनी प्रकाशक म्हणून आलेले अनुभव सांगितले. अशोक कोठावळे म्हणाले, पुण्याची अपूर्वाई हे अनिल अवचट आणि चित्रकार वसंत सरवटे यांचे मिळून पुस्तक आहे. एखाद्या लेखकाशी आपले सूर पहिल्या भेटीतच जुळतात तसेच अवचटांशी माझे सूर जुळले.
गौरी कानेटकर म्हणाल्या, समकालीन प्रकाशन आणि युनिकशी त्यांचे वेगळेच नाते होते. ते अतिशय पॅशनेट होते. एखाद्या विषयाने ते झपाटून जायचे. पुस्तक तयार होण्यातील त्यांची उत्स्फूर्तता आणि झपाटलेपण पाहणे फार सुंदर असायचे.
अपर्णा महाजन म्हणाल्या, लेखनातील सोपेपणा, रंजकता आणि प्रवाहीपणा हे अनिल अवचटांचे लेखनातील बलस्थान अनुवाद करताना इंग्रजीत आणणे हे एक मोठेच आव्हान होते.
आनंद नाडकर्णी यांनी इतर काही आठवणी जागवून कार्यक्रमाचा समारोप केला.