* केंद्र सरकारच्या मदतीने कृषी विभागाकडून तयारी सुरू
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
राज्य सरकारने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात ५६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘विस्तार’ या एकत्रीकृत संकेतस्थळाचा वापर यासाठी केला जाणार आहे.
राज्य सरकारच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कृषी क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक मदतीने ही योजना राबविली जाणार आहे.
आगामी खरीप हंगामपासून राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिला टप्पा सुरू होईल. केंद्र सरकारच्या मदतीने सर्व पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाईल. शेतकऱ्यांच्या हातातील स्मार्ट फोनच्या मदतीने योजनेची अमंलबजावणी करण्यात येईल असे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या व्हर्च्युअल इंटिग्रेटेड सिस्टिम टू अॅक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स (विस्तार) या संकेतस्थळाचा वापर केला जाणार आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. ‘विस्तार’ या संकेतस्थळावर शेतकऱ्यांची सर्व माहिती अपलोड केलेली असेल.
माती, मातीची प्रतवारी, हवामानाचा अंदाज, खते, औषध फवारणीच्या शिफारशी आदींचा समावेश ‘विस्तार’वर असेल. शेतकऱ्याला त्यांच्या स्थानिक भाषेत लेखी किंवा तोंडी प्रश्न विचारता येतील. त्याला ‘विस्तार’ वरून प्रतिसादाच्या रुपाने शेतकऱ्याला सल्ला मिळेल. प्राथमिक पातळीवर हवामान अंदाज, पावसाचा अंदाज, कीड, बुरशीजन्य रोगांविषयीचा सल्ला दिला जाणार आहे. त्यानंतर पीकनिहाय कृषी विद्यापीठांनी केलेल्या शिफारशींचा प्रत्यक्षात वापर करण्यावर भर दिला जाईल. अॅग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच संकेतस्थळावर भरली जाणार आहे. अॅग्री स्टॅकवरील नोंदणी जितकी अचूक, पारदर्शक असेल तितका सल्ला किंवा शिफारस अचूक असणार आहे.