- अनोख्या पुस्तकप्रेमीला मानाचा मुजरा
- परिवर्तन संस्थेतर्फे राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने विशेष सन्मान
(पराग पोतदार)
स्वदेस न्यूज ः
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
एखाद्या विषयाने झपाटून जाणारी माणसंच नवे काही बदल घडवून आणू शकतात. बाकीची फक्त चौकटीबद्ध आयुष्य जगण्यात समाधान मानतात. असाच एक ध्येयवेडा पुस्तकप्रेमी सातारा जिल्ह्यात सध्या अनवाणी फिरतोय… कशासाठी? आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गाव कवितेचं गाव व्हावं या स्वप्नासाठी… हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार त्याने केला आहे.
या अवलिया माणसाचं नाव आहे, प्रल्हाद जयसिंग पारटे गुरूजी. साताऱ्यातील जकातवाडी येथे त्यांचे घर आहे. त्यांनी त्यांच्या गावाला ‘कवितेचं गाव’ बनवलंदेखील आहे. गावातील प्रत्येक भिंत एका कवीचं गीत गाताने दिसते. त्यातून मुलांवरही चांगल्या कवितांचे संस्कार होत आहेत. पण हे आपल्या गावापुरतं न ठेवता या खऱ्याखुऱ्या पुस्तकप्रेमी अवलियाने अवघ्या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गाव कवितेचं होऊन जावं आणि घराघरांतून कविता घुमावी आणि मराठीचा गजर सर्वत्र व्हावा असं अनोखं स्वप्न पाहिलं आहे. त्या ध्येयासाठी चप्पल घालणं सोडून दिले आहे.
या अवलिया माणसाच्या झपाटलेपणाला प्रोत्साहित करावे आणि त्याच्या कामाला दाद द्यावी म्हणून कायम सामान्यांतील असामान्यपण शोधणाऱ्या पुण्यातील परिवर्तन या संस्थेच्या अशाच ध्येयवेड्या मंडळींनी त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. संस्थेचे विश्वस्त स्व. प्रा. श्री सुनील संभाजी मते यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार २०२४ प्रल्हाद जयसिंग पारटे गुरूजी यांना त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या वेळी परिवर्तनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आपल्या भावना त्यांनी फार मोलाच्या शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले, हा पुरस्कार वाचनासाठी व वाचनसंस्कार रुजावी यासाठी दिला आहे. या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन अधिक काम करेन. झाड नव्याने उमलणाऱ्या कळ्यांचा विचार करते. तेच काम आज आपल्याला करायचे आहे. रस्त्यावरची माती धूळ समजून तुडवलीच जाते. परंतु एखादा कलावंत जेव्हा मातीतून मूर्ती घडवतो तेव्हा लोक त्याच मातीला वंदन करतात. असेच परिवर्तन या समाजात आपल्याला घडवायचे आहे. आज गरज आहे ती चांगल्या विचारांची. आज आमच्या वाचनालयात १७ हजाराहून अधिक पुस्तके आहेत. जिथे चांगले आहे ते घेऊन यायचे या भावनेने सातारा, पुणे जिथून मिळतील तिथून पुस्तके आणली. एखाद्या पुस्तकातील एखादी ओळ जरी उपयुक्त पडली तरी ती समाजासाठी महत्त्वाची ठरू शकते. वाचनालयाला जेव्हा २५ वर्षे वेगळी झाली तेव्हा आपण काही तरी वेगळे करावे असे वाटू लागले. त्याच दरम्यान सातारा जिल्ह्यातच पुस्तकांचे गाव साकारले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर कवितांचे गाव करायचे निश्चित केले. १८ भाषांतील चांगल्या कविता इकडे याव्यात म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहेत. या पुढील काळात जिल्ह्यातील प्रत्येक गाव कवितेचे गाव करण्याचा संकल्प असून त्या दिशेने काम करणार आहोत.