- फोर्डमध्ये काम करणारी पहिली महिला अभियंता
- आयर्न लेडीने दिला स्वप्नांना आकार
स्वदेस न्यूज :-(प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून…
सुधा मूर्ती यांनी टाटा मोटर्सच्या जाहिरातीवर आक्षेप घेत जेआरडी टाटांना लिहिलेल्या पत्राबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पण आज आपण अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी एके काळच्या सर्वात मोठ्या कार कंपनीला आव्हान दिले. कंपनीला त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागले आणि इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला अभियंता म्हणून नोकरी देणे भाग पडले.
अमेरिकन कंपनीत जिथे कधी अमेरिकी असो वा ब्रिटिश नोकरीही मिळायची नाही तिथे काम मागायला एक भारतीय महिला पोहोचली. साहजिकच त्यांना रिकाम्या हाती मागे परतावे लागले. पण तिने हार मानली नाही. कंपनीला वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा मोडण्यास तिने भाग पाडले आणि पहिल्यांदाच एका महिलेला अभियंता म्हणून नोकरी द्यावी लागली. यानंतर या कंपनीने महिलांसाठी कायमचे दरवाजे उघडले.
ही यशोगाथा आहे अमेरिकेतील प्रतिष्ठित ऑटो कंपनी, फोर्डमध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता दमयंती हिंगोरानी गुप्ता यांची. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी दमयंती यांनी अभियंता बनायचा निर्धार केला होता. शिक्षण पूर्ण करून त्यांनी अमेरिकेतील डेट्रॉईट येथील फोर्ड मोटर्सच्या कार्यालयात पोहोचल्या. या वेळेपर्यंत फोर्डमध्ये एकही महिला अभियंता नव्हती. ते साल होते १९६७. नोकरीसाठी त्या जेव्हा फोर्ड मोटर्सच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांचा बायोडाटा पाहून एचआरने त्यांची बोळवण केली. आमच्या कडे महिला अभियंता पद नाही, कंपनीचे तसे धोरणही नाही, असे सांगून त्यांना परत पाठवले.
एचआरने नकार दिल्यावर दमयंती निराश पावलांनी दरवाजाकडे वळल्या पण दार उघडण्यापूर्वीच त्यांनी मागे वळून पहिले आणि एचआरला म्हणाल्या, ‘आतापर्यंत तुमच्याकडे एकही महिला इंजिनिअर नाही आणि मी पहिली स्त्री आहे जी नोकरी विचारायला आली आहे. तुम्ही मला संधी देणार नाही, तोपर्यंत तुमच्या कंपनीत एक महिला अभियंता कशी येणार?’
हे ऐकून अधिकारी प्रभावित झाला आणि त्याने आपल्या बॉसचा विरोध पत्करून पहिल्यांदाच एका महिला अभियंत्याला कंपनीत भरती केले. त्यांनंतर दमयंती यांनी पुढील ३५ वर्षे फोर्डमध्ये उत्कृष्ट सेवा दिली.
दमयंती सांगतात की, वयाच्या १३ व्या वर्षी त्या आपल्या आईसोबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे भाषण ऐकण्यासाठी गेल्या होत्या. नेहरूंनी आपल्या भाषणात सांगितले होते की, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला अभियंत्यांची गरज आहे आणि हे काम फक्त मुलांनीच नाही तर मुलींनाही करावे लागेल. दमयंती यांनी नेहरूंच्या तोंडून पहिल्यांदा इंजिनियर हा शब्द ऐकला आणि मग ठरवलं की आपण भविष्यात हेच व्हायचं आहे. दमयंती यांनी इंजिनीअरिंगमध्ये यांत्रिक (मेकॅनिकल) इंजिनिअरिंग निवडली ज्यामध्ये फक्त मुले जायची. सुरुवातीपासून त्यांनी हे वेगळेपण जपले.
दमयंती सांगतात की वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी हेन्री फोर्डचे चरित्र वाचले ज्याचा खूप प्रभाव पडला. तेव्हाच त्यांनी एक दिवस फोर्ड कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करायचे ठरवले. त्यांनी जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले.