स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे तुलसीहून..
तसं पाहायला गेलं तर, तुलसी हे भारतातल्या इतर कोणत्याही गावासारखंच एक गाव. बसक्या कौलारू घरांचं आणि कच्च्या रस्त्यांचं. घरावरच्या पाण्याच्या टाकीवर उभं राहिलं तर, सगळं गाव दिसेल एवढंसंच.
आजही वडाच्या झाडाच्या पारावर सगळा गाव जमतो. भारतातलं “युट्यूब गाव” ही तुलसीची जगावेगळी ओळख आहे.
गावाची लोकसंख्या जेमतेम चार हजार असेल. पण त्यातली हजारापेक्षा जास्त लोकं युट्यूबसाठी काम करतात. गावात चालताना युट्यूबच्या व्हीडिओत काम केलं नाही असा माणूस शोधणं अवघड आहे.
युट्यूबच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाने इथली स्थानिक अर्थव्यवस्था पार बदलून गेली आहे. पण आर्थिक फायद्यांच्या पलीकडे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गावात भेदभाव कमी करायला आणि सामाजिक बदल घडवून आणायला मदत केली, असे गावकरी सांगतात. स्वतःचं युट्यूब चॅनेल काढून त्यातून पैसे कमावणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. या महिलांसाठी गावात कामाच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत. आता वडाच्या झाडाखाली रंगणाऱ्या गप्पांमध्येही तंत्रज्ञान आणि इंटरनेट हेच विषय असतात. व्हीडिओ शुटिंग करण्यासाठी तुलसी गावाचे रहिवासी रोजच्या रहाटगाड्यातून आवर्जून वेळ काढतात.
फेब्रुवारी 2025 मध्ये युट्यूबला 20 वर्ष पूर्ण होतायत. ‘स्टॅटिस्टा’ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जगातली 2.5 अब्ज लोक दर महिन्याला युट्यूब वापरतात. भारत हा देश तर युट्यूबसाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देतो.
गेल्या दशकभरात युट्यूबने फक्त इंटरनेटच नाही तर मानवी संस्कृतीच्या उत्पादन आणि उपभोगाबद्दलचे आपले विचारही बदलून टाकलेत.
एका दृष्टीने तुलसी हे गाव म्हणजे युट्यूबचा जगावर कसा परिणाम झाला याचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहे. तिथल्या अनेकांचे आयुष्य या ऑनलाईन व्हीडिओच्या भोवतीच फिरते. “मुलांना वाईट सवयी आणि गुन्हेगारीपासून लांब ठेवण्यासाठीही त्याची मदत होते, असे तुलसी गावातील शेतकरी असलेले 49 वर्षांचे नेत्रम यादव सांगतात.
तुलसीचा कायापालट होण्याची सुरुवात झाली ती 2018 पासून. जय वर्मा आणि त्यांचे मित्र ज्ञानेंद्र शुक्ला या दोघांनी मिळून ‘बिईंग छत्तीसगढीया’ नावाचं एक चॅनेल युट्यूबवर सुरू केलं. “रोजच्या रहाटगाड्याचा फार कंटाळा आला होता. आमच्यातली क्रिएटीव्हिटी कायम ठेवण्यासाठी काहीतरी नवं करायचं होतं,” असं वर्मा सांगतात.
त्यांनी बनवलेला तिसरा व्हीडिओ फारच व्हायरल झाला. एका तरूण जोडप्याला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बजरंग दलाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत, असं त्यात दाखवलं होतं. व्हीडिओ खूप विनोदी होता. पण त्यातून एक संदेशही लोकांपर्यंत गेला. व्हीडिओच्या शेवटी “कोणताही निष्कर्ष न दाखवता प्रेक्षकांनाच त्याचा अर्थ लावू दिला,” असं वर्मा पुढे सांगत होते.
काही महिन्यातच त्यांच्या युट्यूब चॅनेलला हजारो लोकांनी फॉलो केलं. आज त्यांचे 1 लाख 25 हजार सबस्क्राईबर्स आहेत. तर, त्यांच्या व्हीडिओला एकूण 26 कोटी व्हूव्ज मिळाले आहेत. ते इतका वेळ सोशल मीडियावर घालवतात म्हणून काळजी करणारे घरातले, त्यातून इतके पैसे येऊ शकतात हे कळल्यापासून मात्र काही बोलत नाहीत. “आम्ही महिन्याला 30,000 रुपये कमावत होतो. शिवाय, व्हीडिओसाठी मदत करणाऱ्यांनाही काही मानधन देत होतो,” असं शुक्ला म्हणाले. कालांतराने दोघांनी नोकरीही सोडली आणि आता पूर्णवेळ युट्यूब व्हीडिओचं काम त्यांनी हाती घेतलं.