तन्मयी जोशी
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
जेव्हा तुम्ही तुमची आवड हेच तुमचं क्षेत्र म्हणून निश्चित करता तेव्हा त्यापुढचा सगळा प्रवास हा सुखकर आणि प्रगतिशील होतो. हेच सांगणारं एक उदाहरण म्हणजे पुण्यातील योधी तायक्वांदो अकॅडमीचे राजेश पुजारी.
राजेश पुजारी यांचा वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय असल्याने त्यांनी पुढे तोच सांभाळावा असा त्यांच्या वडिलांचा मानस होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करता व्यवसाय करायचा हे देखील राजेश पुजारी यांनी ठरवले होते. मात्र तायक्वांदो प्रशिक्षणात चांगली प्रगती होत असल्याचे राजेश यांना कळून चुकले. आणि त्यातच करियर करण्याचे त्यांनी निश्चित केला. इतकेच नव्हे तर नुकताच राष्ट्रीय क्रीडा भूषण पुरस्कार मिळवित त्यांनी तो निर्णय सार्थ ठरवला आहे.
१९९१ साली राजेश आणि त्यांची बहीण यांनी निव्वळ आवड म्हणून कराटे क्लासला जाण्यास सुरुवात केली. आणि १९९७ पर्यंत त्यातील उच्च मानला जाणारा ब्लॅक बेल्ट राजेश यांनी मिळवला. कराटे सुरु केल्यापासून त्यांना बरीच बक्षिसे आणि पदके मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे राजेश यांची या क्षेत्राबद्दलची आवड द्विगुणित होऊ लागली. प्रशिक्षण घेत असतानाच त्यांची प्रगती बघून क्लासमधील एका प्रशिक्षकांनी राजेश यांच्यापुढे एका जिममध्ये कराटे क्लासेस सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अर्थातच राजेश यांनी त्यांना होकार दिला. घरातून यासाठी विरोध होता. तरीही वडिलोपार्जित व्यवसाय न करता स्वतःची तायक्वांदो अकॅडमी सुरु करावी असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले. शेवटी घरच्यांना विश्वासात घेऊन तायक्वांदो प्रशिक्षक म्हणूनच करिअर करायचे त्यांनी ठरविले.
तिथून राजेश पुजारी यांचा कोचिंगचा प्रवास सुरु झाला. १९९७-९८ च्या काळात जेव्हा खेळात करिअर करावे असा लोक जास्त विचार करत नसत त्यावेळेस तायक्वांदो या नवीन आणि वेगळ्या असलेल्या खेळात करिअर करण्याचा धाडसी निर्णय राजेश यांनी घेतला आणि त्यात भरगोस यशप्राप्ती सुद्धा केली.
हळूहळू अनेक विद्यार्थ्यांना राजेश यांची प्रशिक्षण देण्याची पद्धत आवडू लागली. सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि समोरच्याला समजून घेऊन, संयम ठेऊन प्रशिक्षण देणे हे धोरण राजेश यांनी अगदी सुरुवातीपासून ठेवल्याने अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली.
मग १९९८ साली त्यांनी कराटेच्या क्लासची सुरूवात केली. कोचिंगचा आधी दांडगा अनुभव असल्याने स्वतःच्या क्लासमध्ये मुलांना हाताळणे राजेश यांना सोपे गेले. क्लास सुरु केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच चांगले निकाल दिसू लागले. इंडियन कराटे क्लब मध्ये सहा महिन्यातच झालेल्या स्पर्धेत क्लासच्या विद्यार्थ्यांना ६ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य पदके मिळाली.
अनुभवासोबतच राजेश यांचे यातील प्रशिक्षण सुद्धा दांडगे आहे. १९९७ साली पहिली ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले. मग १९९९ साली कराटे ची २nd डिग्री ब्लॅक बेल्ट. त्यानंतर २००४ साली तायक्वांदो ची ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे २०१३ साली साऊथ कोरियाला 4rth dan ची परीक्षा दिली. २०१७ मध्ये पुण्यात 5th dan ची परीक्षा उत्तीर्ण झाले. २०१८ साली साऊथ कोरिया येथे international championship मध्ये रौप्य पदक मिळवले. २०१९ साली भारतीय कोच म्हणून देशाकडून एका टीमचे नेतृत्व करण्याची राजेश यांना संधी मिळाली. २०२२ साली थायलंड येथे झालेल्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम करण्याचा अनुभव घेता आला.
योधी अकॅडमी सुरु केल्यानंतर राजेश हे एकटेच प्रशिक्षक म्हणून सगळा भार सांभाळत असत. आता संपूर्ण पुण्यात राजेश यांच्या योधी अकॅडमीच्या १५ शाखा आहेत. तसेच १० जणांचा स्टाफ त्यांच्यासोबत काम करतो. अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा तायक्वांदोचे क्लासेस राजेश यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही असे राजेश सांगतात. राजेश यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे कलासेस सुरु केले आहेत. अकॅडमी सोबतच राजेश अनेक शाळांमध्ये सुद्धा याचे प्रशिक्षण गेली अनेक वर्षे सातत्याने देत आहेत.
योधी अकॅडमीतर्फे दर वर्षी साऊथ कोरिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी दिली जाते. सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा या योजनेअंतर्गत महानगरपालिकांच्या शाळांमध्ये योधी अकादमीतर्फे प्रशिक्षण दिले जाते. अकॅडमीमध्ये ५५ ते ६५ वयोगटातील विद्यार्थी सुद्धा प्रशिक्षण घेतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मुलांसोबतच तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतात. तसेच मुलींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांचे शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यास मदत केली जाते.
तायक्वांदोची स्वतःची असोसिएशन असल्याने सरकारी कोटा उपलब्ध आहे. खेळाडूंसाठी नियोजित केलेल्या ५% सरकारी आरक्षणातून नोकरीची संधी यामार्फत उपलब्ध होऊ शकते. तसेच शाळांतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांमधून ५% आरक्षक्षणाअंतर्गत ग्रेस मार्क्स सुद्धा मिळतात.
नोकरी करताना सुद्धा हा व्यवसाय करणे शक्य आहे. संपूर्ण दिवस नोकरी करून संध्याकाळी एक तास कोचिंग देणे शक्य असते. त्यामुळे एक्सट्रा इन्कम तर मिळतेच परंतु स्वतःचा शारीरिक फिटनेस राखण्यास सुद्धा मदत होते. अनेक डॉक्टर्स मुलांना तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सांगतात. त्यामुळे शारीरिक तसेच बौद्धिक स्थैर्य टिकून राहते.
योधी अकॅडमीचा अजून विस्तार करण्याचा राजेश यांचा मानस आहे. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना अकॅडमीमार्फत स्वतःच्या पायावर उभे करण्याची राजेश यांची इच्छा आहे.
कोणतेही क्षेत्र निवडताना त्याची आवड असणे गरजेचे आहे. ती आवड असल्यास त्या क्षेत्रात आपली प्रगती ही निश्चित आहे. “make your passion, your profession ” असं राजेश आवर्जून सांगतात. इतर क्षेत्रांप्रमाणेच खेळ या क्षेत्रातही करिअर करता येऊ शकते हे राजेश यांच्या योधी अकॅडमी ने सिद्ध करून दाखवले आहे.
Nice compilation of the career graph of Rajesh Poojari, very inspirational for the youngsters who would like to transform their passion into profession.
Wishing Rajesh & his Yodhi Academy a great success in the coming years.