स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
रक्तदाब अन् मधुमेहमुक्त भारताचा संदेश देणारे पिरंगुट (ता. मुळशी) येथील दुर्ग व इतिहास अभ्यासक अॅड. मारुती गोळे यांनी नुकताच भारतासह पंधरा देशांतील १४३३ गडांच्या अभ्यासाचा टप्पा ओलांडला आहे. त्यांच्या संग्रहात गडकोटांची तीन लाख ६८ हजार छायाचित्रे जमा झाली आहेत. त्यांच्या या दुर्गअभ्यास कार्याची नोंद नुकतीच ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये झाली आहे.
या विषयी गोळे सांगतात की ‘महाराष्ट्रासारखे दुर्गवैविध्य जगाच्या पाठीवर कुठेही आढळत नाही. मी आपल्या देशासह मी बांगलादेश, श्रीलंका, ब्रिटन, तुर्की, अफगाणिस्तान अशा १५ देशांत दुर्गभ्रमंती करून, १४३३ गडांचा अभ्यास आणि छायाचित्रण केले. या सगळ्यांत महाराष्ट्रातील दुर्गवैविध्य थक्क करणारे आहे. गडकोटांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी यापूर्वीच आपण जोमाने प्रयत्न करायला हवे होते. महाराष्ट्रात विविध राजवटींनी गडबांधले मात्र शिवरायांनी गडसंस्कृती निर्माण केली. या गडभ्रमंतीचा पुढचा टप्पा लवकरच पूर्ण होणार असून, पंधराशे गडांची भ्रमंती आणि अभ्यास करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. नव्या पिढीसमोर हे मांडत राहण्याचा हेतू आहे.’
याविषयी दुर्ग व इतिहास अभ्यासक अॅड मारुती गोळे म्हणतात की, शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून मराठी माणसाला आयुष्यभर पुरेल असा स्वाभिमानाचा वारसा दिला. या स्वराज्यात पायदळप्रमुख म्हणून सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी सेवा दिली, याचा अभिमान वाटतो. आज केवळ त्यांचे १४वे वंशज म्हणून न मिरवता गडकोटांचा जागर करीत राहण्याचा मानस आहे. यातून वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षाही मला नव्या पिढीला इतिहास आणि गडकोटांजवळ आणायचे आहे.
पंतप्रधानांकडून कौतुक
शिवछत्रपतींच्या आग्रा ते राजगड या थरारक अध्यायाचा जागरही गोळे यांनी सुरू ठेवला आहे. २०१७पासून त्यांनी आग्रा ते राजगड (गरुडझेप मोहीम) ही ११५३ किलोमीटरची पदयात्रा ३५ दिवसांत केली. हीच मोहीम २०२१मध्ये त्यांनी तेरा दिवसांत केली. या वर्षीपर्यंत पाच वेळा झालेल्या या मोहिमेत दोन हजार युवक सहभागी झाले असून, यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून या मोहिमेचे कौतुक केले. २०२२मध्ये शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेला मानवंदना म्हणून गोळे यांनी जिंजी (तमिळनाडू) ते सिंहगड हा अकराशे किलोमीटरचा प्रवास पायी चालत २७ दिवसांत केला.
गडकोटांवरील विक्रम
गोळे यांनी दुर्गाभ्यासासाठी सिंहगड (६५४), राजगड (१६३), तोरणा (४९) मोहिमा केल्या असून सिंहगड सलग १९ तासांत अकरा वेळा, राजगड सलग २१ तासांत तेरा वेळा, तोरणा सलग सोळा तासांत नऊ वेळा आणि सिंहगड – राजगड – तोरणा – लिंगाणा – रायगड हा ६८ किलोमीटरचा टप्पा सतरा तासांत पूर्ण केला आहे.