३६५ दिवस… १२ तास चालणारी जिल्हापरिषदेची शाळा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे नाशिकहून
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळी नावाच्या गावात ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर एक जिल्हापरिषदेची शाळा बारा तास भरते आणि वर्षभर ३६५ दिवस सुरू असते.
या शाळेत मुलं देखील सुट्टी न घेता ३६५ दिवस अखंडपणे येतात आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने शाळेत शिकवतात. या शाळेचे नाव आहे, केशवतीर्थ प्रयासराज आणि शाळेचे मुख्य आहेत केशव गावित गुरूजी.
या शाळेत बालवाडीपासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. शाळेला वेळापत्रक नाही पण उत्तम कृतिकार्यक्रम आहे. सकाळी साडेनऊ वाजता जी शाळा भरते ती थेट रात्री साडेनऊला संपते.
शाळेला भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात. या शाळेत अॕम्फी थिएटर आहे. अद्ययावत वाचनालय, संगणककक्ष बोलक्या भिंती, गोशाळा परसबाग आहे. या शाळेत ६५ विद्यार्थी शिकत आहेत.
नेमलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कौशल्यविकासावर अधिक भर दिला जातो. या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळी दोन वेगवेगळी कामे करू शकतात. दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात. ते पाहून थक्क व्हायला होते. एकीकडे कामे सुरू असताना ही मुले संविधानाची कुठलीही कलमे अचूक सांगू शकतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते. विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात.
यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात. गाणी शिकतात, विविध भाषा शिकतात. पाचवी-सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात. त्यांची काळजी घेतात.
गो पालनसुद्धा करतात. यात गायीची काळजी घेणे, गोठा साफ करणे, शेणखत तयार करणे, गायीवर माया करणे हा सुद्धा शाळेतला अभ्यासक्रम आहे. परसबाग फुलवणं, झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे. शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात.
याविषयी केशव गुरूजी सांगतात, शाळेत जी किमया केली तिचा सुरूवातीचा प्रवास खडतरच होता. रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे. विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते. या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्लीत येण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे.
या शाळेतले माजी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ, शेतकरी, चित्रकार, भाषाअभ्यासक, शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत.
………..
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ६,४८६ कोटींची तरतूद
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
“राज्याच्या कानाकोपऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी यंदा एकूण ६,४८६.२० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी निव्वळ भार ४,२४५.९४ कोटी रुपये इतकाच आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरे, कृषी पंपांना वीजेच्या दरात सवलत व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. तसेच राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद जाहीर करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार या संबंधात माहिती देताना म्हणाले, “आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५’ च्या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागातील घरे, कृषीपंपांना वीजदरात सवलत, रस्ते विकासाला गती अशा पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या योजनांसाठी वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजनेंतर्गत कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र शासनाच्या योजनांतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना, तसेच शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांसाठीचा निधी या सर्वांचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले, आज विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एकूण ६,४८६.२० कोटी रुपयांपैकी ९३२.५४ कोटी रुपये अनिवार्य मागण्या, ३,४२०.४१ कोटी रुपये कार्यक्रमांतर्गत मागण्या, २,१३३.२५ कोटी रुपये केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून प्रस्तावित आहेत. या पुरवणी मागण्यांद्वारे राज्यातील विविध घटकांचा सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा मला विश्वास आहे”.