स्वदेस न्युज(प्रतिनिधी):-
* जागतिक आर्थिक मंचच्या अहवालात कौतुक
* आर्थिक घोडदौडीवरही शिक्कामोर्तब
आजची चांगली बातमी आहे दावोसहून
अलिकडच्या काळात भारताने स्टार्टअप व डिजिटल नवोन्मेषाचे जागतिक केंद्र म्हणून आघाडी घेतली असून तो जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे जागतिक आर्थिक मंचाने (डब्लूईएफ) म्हटले आहे. तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासासाठी तंत्रज्ञान अडथळा नसून तो महत्त्वाचा पूल आहे, अशी भूमिका भारताने प्रभावीपणे मांडली असून सरकारचा तंत्रज्ञानाचा पुरस्कार आणि पाठपुरावा प्रशंसनीय आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या सुरू झालेल्या नव्या वर्षातील पहिल्या वार्षिक बैठकीत, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र (सीफोरआयआर) या जागतिक आर्थिक मंचाच्या भारतातील समन्वय केंद्राने आपल्या सहा वर्षांच्या वाटचालीचा अहवाल सादर केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भारतासोबतची भागिदारी ४० वर्षांहून अधिक जुनी असून या काळात केंद्र सरकार, राज्य सरकारे, प्रमुख उद्योगांमधील व्यावसायिक नेते, नागरी समाज आणि तज्ज्ञांसह इतर महत्त्वाच्या घटकांबरोबर अर्थपूर्ण सहकार्य निर्माण झाले असल्याने अनेक उपक्रम प्रभावी ठरले आहेत. भारतासोबतच्या भागिदारीत मानव- केंद्रित,पर्यावरणपूरक आणि भविष्य घडविण्यासाठी काम करण्याचा अभिमान आहे, असेही मंचाने म्हटले आहे. याविषयी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले, “चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्रासोबतच्या भागीदारीत आरोग्य, शिक्षण, स्मार्ट शहरे आणि शेतीसमोरील मोठ्या आव्हानांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता बहुआयामी कुशल समुदाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
याविषयी जागतिक आर्थिक मंचाचे व्यवस्थापकीय संचालक जेरेमी जर्गेन्स म्हणाले, गेल्या सहा वर्षांत ‘सीफोरआयआर’ केंद्र भारतातील एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. या केंद्राने वाढीव उत्पन्न आणि उत्तम आरोग्यसेवेद्वारे १२ लाखांहून अधिक नागरिकांचे जीवन सुधारले आहे. आता हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे
‘सीफोरआयआर इंडिया’तर्फे विविध उपक्रम
भारत वेगवान आर्थिक विकासासह डिजिटल नवोन्मेषासाठी जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान मजबूत करत असताना, सीफोरआयआर इंडियाने एक कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘एआय फॉर इंडिया २०३०’ उपक्रमाअंतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाच्या कल्याणासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अंतराळ अर्थव्यवस्था उपक्रमाअंतर्गत अंतराळ विज्ञानात भारताला आघाडी मिळवून देण्याचा उद्देश आहे, तर हवामान तंत्रज्ञान उपक्रमात हवामान-स्मार्ट शहरी केंद्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.