स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी सोलापुरहुन
काही दशकांपूर्वी गरीबांचे अन्न असलेली ज्वारीची भाकर आज श्रीमंतांच्या जेवणातील मुख्य पदार्थ बनत आहे. याचे कारण म्हणजे ज्वारीमध्ये असलेले शरीरास उपयोगी गुणधर्म. त्यामुळेच अनेक आहारतज्ज्ञ दैनंदिन आहारात ज्वारीचा वापर करण्याचा सल्ला देतात. यामुळेच आता ज्वारीला आणि ज्वारीच्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढत आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. ज्वारी हे भरडधान्य असून याचे उत्पादन सोलापूरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
याच ज्वारीपासून बनलेल्या कडक भाकरी आज लोकांच्या पसंतीस तर उतरत आहेतच, याशिवाय या भाकरींनी येथील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून दिल्या आहेत.
सोलापुरातील शेळगी येथील शिवगंगानगरात राहणाऱ्या लक्ष्मी बिराजदार या मुळच्या दौंडच्या. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतलं. मात्र त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली.
2001 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि त्या सासरी शेळगी येथे आल्या. आपण काही तरी करावं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.
लग्नानंतर त्यांनी ट्यूशन घेण्यास सुरुवात केली. 2011 पर्यंत त्यांनी ट्यूशन घेतल्या मात्र आपण काही तरी व्यवसाय करावा हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
त्यामुळे त्यांनी आपल्या स्वयंपाकाच्या कलेचेच रूपांतर व्यवसायात करायचे ठरवले आणि कडक भाकरीचा व्यवसाय करण्याचे ठरवले.
2012 ला त्यांनी कडक भाकरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. परंतु सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्या.
हा व्यवसाय त्यांनी पन्नास भाकरी पासून सुरू केला होता. सुरूवातीला दोघींनी मिळून हा व्यवसाय चालू केला. भाकरी घेऊन गेल्यावर लोक म्हणायला लागले की, भाकरी कोणी विकतं का? घरातल्या शिळ्या भाकरी कोणी खात नाही तर तुमच्या या शिळ्या भाकरी कोणी खाईल का? तेव्हा त्या म्हणाल्या, “तुम्ही ठेवून तरी बघा, तेव्हा दुकानदारांनी नकार दिला.”
खूप विनंती केल्यावर दुकानदारांनी भाकरी ठेवल्या. दोन दिवसात ती 10 पाकीटं विकली गेली. त्यानंतर ते स्वतःहूनच आम्हाला 20 पाकीट पाहिजेत, 30 पाकीट पाहिजेत, असं सांगू लागले. आता मात्र त्यांना दररोज 1000-2000 पाकिटांची ऑर्डर असते.”
हळूहळू ऑर्डर वाढू लागल्यानंतर त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलांचेही प्रमाण वाढले. आणि अखेर 2013 मध्ये संतोषीमाता गृहउद्योगची सुरुवात झाली.
दोन महिलांपासून सुरू झालेल्या या व्यवसायातून आता 20-25 महिलांना रोजगार मिळू लागला आहे. तर या व्यवसायातूनच लक्ष्मी महिन्याला 50-60 हजारांचा निव्वळ नफा कमावत आहेत. त्याच्या कुटुंबियांचीही या व्यवसायात त्यांना खूप मदत मिळते.
त्यांचे पती सुरेश बिराजदार हे स्कूल वॅन चालक आहेत. ते या भाकरीच्या डिस्ट्रीब्यूशनचे काम पाहतात. तर मुलगा निखिल आणि मुलगी निकिता हे मार्केटींग आणि इतर गोष्टी पाहतात. लक्ष्मी यांच्या भाकरींना महाराष्ट्रभरातून मागणी आहे. तसेच त्यांच्या भाकरी अमेरिकेपर्यंतही पोहोचल्या आहेत.
लक्ष्मी यांच्याप्रमाणेच सोलापूरच्या शिंगडगाव येथील अंबिका म्हेत्रे यांनीही कडक भाकरीच्या व्यवसायातून स्वतःचे आणि गावातील इतर महिलांचे आयुष्य बदलले आहे.
अंबिका सुरुवातीला दुसऱ्यांच्या शेतावर मजूरी करायला जायच्या आणि कधीकधी हुरडा पार्टीसाठी हाताने कडक भाकरी बनवून द्यायच्या.
त्या सांगतात, सुरूवातीला त्या 250-3000 भाकरी हाताने बनवायच्या. मात्र हळू हळू मागणी वाढू लागल्यानंतर पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत त्यांनी दीड लाखाचे लोन घेऊन भाकरी बनवण्याचे मशीन घेतले आणि आज या मशीनच्या सहाय्याने त्या दिवसाला 1000-4000 भाकरी बनवतात.”
अंबिका यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून चार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
अंबिका या ज्वारीसोबतच बाजरी, नाचणी आणि मक्याच्याही भाकरी बनवतात. तर या व्यवसायातून त्या महिन्याला 40 हजारांपर्यंत उत्पन्न कमावतात.
सोलापूरात या भाकरी ढाबे, हॉटेल, किराणा दुकाने तसेच लग्न समारंभ, पार्टी्ज, स्नेहसंमेलनात आवर्जून पाहायला मिळतात.
या भाकरींच्या माध्यमातून सोलापूरात नवनवीन डिशेसही तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मसाला भाकर, कडक भाकरीचा चिवडा, कडक भाकर पिझ्झा यासारख्या अनेक डिशेसचा समावेश आहे.
आज सोलापूरात कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला कडक भाकरी पाहायला मिळते. इतकच काय तर किराणा दुकानांमध्येही आता कडक भाकरी विक्रीला ठेवलेल्या दिसतात. आज भाकरी हा केवळ आहाराचा भाग न राहाता तो व्यवसायाचा भाग कधी बनला हे आम्हा सोलापूरकरांनाही कळलं नाही.”
सोलापूरच्या उद्योगवर्धिनी या संस्थेच्या म्हणण्यानुसार कडक भाकरीच्या या व्यवसायात सोलापूर जिल्ह्यांमध्ये महिलांचे साधारण 1200 बचतगट आहेत तर यामाध्यमातून दिवसाला 50 हजार कडक भाकऱ्या तयार केल्या जातात, आणि त्यातील वीसेक हजार भाकऱ्या हातावर थापल्या जातात.
या व्यवसायाने इथल्या दोन हजार महिलांना रोजगार दिलाय. याशिवाय या भाकरी महाराष्ट्रभर विक्रीसाठी पाठवल्या जातात.
या भाकरीच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि लोकांची आरोग्याविषयीची जागरूकता. यामुळेही ज्वारी खाण्यावर जास्त भर दिला जातो. तसंच अनेक आहार तज्ज्ञ पौष्टीक आहारासाठी ज्वारीचा अन्नामध्ये उपयोग करण्याचा सल्ला देतात.
भारतात पाच प्रकारचे मिलेट्स उपलब्ध आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर ज्वारी येते. तर बाजरी, नाचणी, वरई आणि कोद्रा हे चार बाकीचे प्रकार आहेत.
ज्वारीचे फायदे
ज्वारीही ग्लूटनमुक्त असते. ज्वारीमध्ये ब जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, आणि जस्त यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यासोबतच यात असलेले फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ज्वारीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे आणि मज्जातंतू पेशींच्या विकासास मदत करते.
भारताने 2018 हे वर्ष मिलेट्सच वर्ष म्हणून ज़ाहिर केले होते. 2023 हे वर्ष जागतिक मिलेट्स वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघानेही जाहिर केले होते.