स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे सताऱ्याहून
सातारा जिल्ह्यातील करंडी गावचे ६७ वर्षीय अशोक (नाना) तुकाराम जाधव यांनी एकट्याने स्वतःच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किलोमीटर लांब आणि रुंद रस्ता तयार केला आहे. शिलोबा गडावर जाणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी हा ऐतिहासिक व प्रेरणादायी पराक्रम केला आहे
साताऱ्यातील करंडी गावालगतच्या डोंगरावर ग्रामदैवत शिलोबा (शंभू महादेव) यांचे स्थान आहे. गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत खडतर, घसरडी आणि अरुंद पायवाट होती. यामुळे गर्भवती महिला, रुग्ण किंवा वृद्ध भाविकांना वर नेताना मोठे हाल होत असत.मात्र कुठलाही स्वार्थ किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, देवावरील श्रद्धा आणि जिद्दीच्या बळावर नानांनी ही वाट सुकर करण्याचा निर्णय घेतला.
अशोक जाधव दररोज सकाळी ६ वाजता घरून निघत. हातात टिकाव, प्यायचे पाणी, फावडा आणि खोरे घेऊन ते न चुकता डोंगरावर श्रम करत. ते दररोज न थकता किमान ५० फूट रस्ता खोदून तयार करत असत. वर्षानुवर्षे (अंदाजे ८ वर्षे) केलेल्या या अपार कष्टांमधून आणि खडकांशी दिलेल्या धडकेतून अखेर पायथ्यापासून गडाच्या शिखरापर्यंत एक सुरक्षित व रुंद रस्ता तयार झाला आहे. त्यांच्या या कामात त्यांना साथ दिली ती टायगर या भटक्या कुत्र्याने. या भटक्या कुत्र्याने नाना काम करत असताना त्यांच्या वस्तूंचे रक्षण केले. मात्र एका बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
याविषयी अशोक जाधव म्हणाले, शिलोबा गडावर जाणारी आधीची वाट खूपच खडतर होती. आता मात्र लहान मुले, महिलादेखील सहजपणे वर पोहचू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून परिश्रमाचे खरेखुरे चीज झाल्यासारखे वाटते.
नानांनी आपले रस्त्याचे स्वप्न एकट्याच्या ताकदीवर सत्यात उतरविले. हे करत असताना त्यांनी कोणाकडूनही कसलीही अपेक्षा बाळगली नाही. अलीकडेच करंडी गावची यात्रा झाली. त्यात ग्रामस्थांनी नानांचा सत्कार करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र, त्याला नानांनी नम्र नकार दिला. या एका सामान्य माणसाच्या या असामान्य जिद्दीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.





