स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नाशिकहून
ग्लासगो येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नशिक जिल्ह्यातील दिलीप गावित याने राष्ट्रकुल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर सर्वेश कुशारेने रौप्यपदक मिळविले. एक हात नसतानाही तो ज्या वेगाने धावला आणि सुवर्णपदक पटकावले ते पाहून सारेच थक्क झाले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि राष्ट्रकुल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या दोन खेळाडूंनी पदक मिळविण्याची कामगिरी केली असून यामुळे ग्लासगो या शहराने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नाशिकला नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे.
नाशिकच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील तोरण डोंगरी येथील दिलीप महादू गावित याने राष्ट्रकुल पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर टी 47 प्रकारात 10.71 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
दिलीपचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास कठोर परिश्रम, अडथळे आणि जिद्दीचा राहिला आहे. तोरण डोंगरीसारख्या लहानशा आदिवासी गावातील गरीब शेतकरी कुटुंबात दिलीप गावित याचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी शेतात झाडावरून पडला. यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली. ग्रामीण भाग असल्याने तातडीने उपचार न झाल्याने जखम चिघळली. अखेर त्याचा एक हात कापणे भाग पडले. आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दिलीपला अपंगत्व आले. परंतु अपंगत्वावर मात करुन दिलीप पुढे जात राहिला.
शाळेत असतानाच प्रशिक्षकांनी दिलीपची धावण्यातील क्षमता ओळखली. दिलीपला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास तो प्रगती करु शकतो, हे लक्षात घेऊन प्रशिक्षकांनी दिलीपच्या पालकांना समजाविले. आणि प्रशिक्षणासाठी दिलीपला पाठविण्यास तयार केले.
प्रारंभी अपंगांसाठी वेगळ्या क्रीडा स्पर्धा असतात, हे त्याला माहीत नव्हते. तो सर्वसामान्य खेळाडूंमध्येच खेळत होता. विशेष म्हणजे, अपंग असूनही इतर सर्वसामान्य खेळाडूंना तो मागे टाकत असे. मात्र ग्लासगोमधील स्पर्धेत दिलीपने कमाल केली. पहिल्या 60 मीटरपर्यंत दिलीप आघाडीच्या स्पर्धकांपेक्षा मागे होता. परंतु, शेवटच्या 40 मीटरमध्ये त्याने जबरदस्त वेग वाढवला, आणि बघता बघता पुढे असलेल्या सर्वांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले.
विशेष म्हणजे पावसामुळे धावपट्टी ओली असतानाही दिलीपने विपरित परिस्थितीत हे यश मिळविले. दिलीप याला प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली.






Great 👍