प्रिया जाधव
स्वदेस न्यूज:
सांगलीकर कन्येची अंतरिक्ष भरारी…पाठवला भारतातील पहिला बायोलॉजीकल पेलोड
आजची चांगली बातमी आहे सांगलीहून
सांगलीच्या KWC च्या माजी विद्यार्थिनी डॉ. स्नेहा गोकाणी आणि डॉ. सेल्वाकुमारन या दांपत्याने त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भारतातील पहिला बायोलॉजीकल पेलोड अंतरिक्षात पाठविला.
शून्य गुरुत्वाकर्षण आणि अत्यंत कठीण वातावरणात वनस्पतींची जैविक वाढ कशी होते, याबाबत संशोधन करून तयार केलेला पेलोड इस्रोच्या PSLV- C60 या रॉकेटद्वारे अंतरिक्षात सोडला. या संशोधनाचा भविष्यात अंतराळवीरांना मोठा फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. स्नेहा गोकाणी यांचा जन्म सांगली येथे झाला. त्यांच्या आजी गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यामुळे त्यांच्या सर्व भावंडांची शिक्षणे गुजराती शाळेमध्ये झाली. दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण गुजराती भाषेत झाले. अकरावी बारावीचे शिक्षण कन्या पुरोहित कॉलेजमध्ये झाले. कस्तुरबाई वालचंद कॉलेज म्हणजेच केडब्ल्यूसी येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
दहावीपर्यंत त्यांचा रस ‘कले’ या विषयात होता. भाषा चांगली असल्यामुळे त्यांना साहित्यामध्येही रस होता. त्यांनी कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत. खरतर त्यांना बीए करायचे होते, परंतु त्यांच्या भावाने त्यांना सायन्स घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचे ऐकून त्यांनी सायन्स घेतले आणि हाच त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. फिजिक्स मध्ये त्यांना ९२ मार्क मिळत असत. हे चांगले गुण बघता त्यांच्या भावाच्या गुरूंनी त्यांना फिजिक्स घ्यायला प्रोत्साहित करत त्यातच पुढे संशोधन करण्याचा सल्ला दिला.
त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नव्हते तर एरोनॉटिकल इंजिनीयरिंग करायचे होते. मात्र घरच्यांनी त्यासाठी पाठिंबा दिला नाही.
याविषयी स्नेहा गोकाणी म्हणतात की, गुजराती समाजात शिक्षण कमी दिले जाते. त्यातून मुलगी असेल तर खूपच कमी दिले जाते. तरीही मी मागे न हटता स्पेस सायन्समध्ये करियर करायचे ठरविले. केवायसीत आमच्या बॅचमध्ये फिजिक्स या विषयासाठी फक्त सात विद्यार्थी होते आणि त्यात मी एकटीच मुलगी होते.
स्नेह गोकाणी यांनी पुढे एमएससी फिजिक्स करत स्पेशलायझेशन स्पेस सायन्समध्ये पहिल्या दहामध्ये येऊन दाखवले. आई-वडिलांनी लग्नाचा आग्रह केल्यानंतर भावाला त्यांनी पीएचडी करायचे असल्याचा मानस बोलून दाखवला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम मुंबई येथे अर्ज केल्यानंतर योगायोगाने त्यांना इंटरव्ह्यु साठी बोलावणे आले आणि त्या अलाहाबादला अनुभव मिळवण्यासाठी इंटरव्यूला गेल्या. तिथे त्यांना खूप अनुभव मिळाला. आणि त्यानंतर त्यांनी पीएचडीचे शिक्षण देखील पूर्ण केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पुढे तेथेच डॉ.आर सेल्वाकुमारन यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. त्या दोघांनी एकत्र काम करण्याचं आधीच ठरवलं होतं.
कालांतराने त्यांना रामानुजन फेलोशिप मिळाली. सध्या त्या मुंबईच्या Amity University मध्ये कार्यरत आहेत.
संशोधनाविषयी स्नेहा गोकाणी म्हणतात, कुलगुरू ए.डब्लू. संतोषकुमार यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. हे संशोधन करताना अंतराळातील पऱ्णची स्थिति पृथ्वीवर निर्माण करावी लागते. त्यामुळे हे खूप आव्हानात्मक काम होतं. हा पहिलाच बायोलॉजिकल पेलोड होता. याआधी कधीही बायोलॉजिकल पेलोड भारताने पाठवला नव्हता. माणसांमध्ये जशा पेशी असतात तशा वनस्पतीमध्येही पेशी आढळतात.
शंभर झाडे हवे असल्यास शंभर बिया पाठवाव्या लागतात. त्या वाढतात का? आणि वाढत असतील तर त्या टिकतात का ?हे पाहणेदेखील गरजेचे असते. तसे झाल्यास पुढे जाऊन आपण त्याचे ‘टिशू कल्चरिंग’ करू शकतो. जेव्हा आपल्या स्पेस स्टेशन सोबत अंतराळवीर जातील, तेव्हा त्यांना या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल. भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास एवढा अन्नपुरवठा कुठून आणणार? या समस्येवर उपाय म्हणून कोणतीतरी योजना करणे आवश्यक होते. यासाठीच पालक या पालेभाजीची निवड करण्यात आली.
असेच चीनने तांदूळ या धान्यावर अनेक प्रयोग केले आहेत. तांदळाच्या अनेक जाती त्यांनी अंतराळात पाठवल्या असून जमिनीवर आणून रुजवल्या आहेत. भारतीय संशोधनात अत्यंत मोलाची कामगिरी करत एक स्त्री असून स्नेहा गोकाणी यांनी आपल्या कामाचा ठसा उपटवला आहे. अशा या सांगलीकर कन्येचे आणि तिच्या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.