स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे फलटण हुन
गोष्ट सांगणे ही खर तर पूर्वापारहून चालत आलेली भारतीय परंपराच आहे. लहान मुलांना गोष्टी सांगण्याचा मोह अनेकांना होत असतो. याला इन्फोसिस च्या सर्वेसर्वा सुधा मूर्ती याही अपवाद नाहीत.यातच एक हटके प्रयोग ‘कुल्फी’ या कुमारवयीन मुलांसाठी निघणाऱ्या त्रैमासिकाचे संपादक ऋषिकेश दाभोळकर यांनी केला आहे. त्याचं नाव आहे ‘गोष्टदिंडी’. या उपक्रमांतर्गत ऋषिकेश दाभोळकर हे गावोगावी फक्त गोष्टी सांगायला निघाले. ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात ते फलटणपासून सासवडपर्यंत गोष्टी सांगत पायी चालत निघाले.
लहान मुलांसाठी तर गोष्ट ही अमूल्य ठेव असतेच पण गोष्टींमुळे ज्ञानात भरसुद्धा पडते. काळाप्रमाणे गोष्टी आणि गोष्ट सांगणे यांच्यातही बदल होत गेला. आता काळानुसार गोष्टी सांगण्याच्या नवनवीन क्लुप्त्याही आकाराला येत आहेत. स्टोरी टेलर हे त्याच पठडीतले. आजी ही आपली पहिली ‘स्टोरी टेलर’ असते. गोष्टी सांगण्याचा असाच एक प्रयत्न गोष्टदिंडीतून करण्यात आला आहे.
यामधून वाटेत ज्या शाळा, वस्त्या, गावं लागतील अशा ठिकाणी मुलांना रंजक गोष्टी सांगणं आणि त्यांना काही आधुनिक पुस्तक दाखवणं अशा प्रकारचे कार्यक्रम करत ते पायी चालत होते.
यावेळी त्यांनी युय्या आणि थॉमस व्हीसलॅंडर लिखित ‘कपिलेने घेतला झोका’ , मंजुषा पावगी लिखित ‘पुस्तक न वाचणारी मुलगी’, व्हिक्टर द्रागुन्स्की यांचे ‘छू मंतर’ या तीन गोष्टी अनेकदा सांगितल्या. या व्यतिरिक्त वयोगट बघून, पार्श्वभूमी बघून प्रत्येक ठिकाणी वेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत गेला. अनेक लहान मोठ्या शाळा, जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या वस्त्या अशा अनेक प्रकारच्या समूहांना त्यांनी गोष्टी सांगत मंत्रमुग्ध केले. या उपक्रमात वाटेत लागणाऱ्या काही गावांमध्ये त्यांनी मुक्काम केला. ग्रामस्थानी ही अतिशय आपुलकीने आणि उत्साहाने या उपक्रमाचे स्वागत केले.
आत्तापर्यंत ही दिंडी दौंडज या गावी पोहोचली आहे. वाटेत नऊ सर्कल, साखरवाडी, वानेवाडी, वाघळवाडी, निरा, पिंपरे, जेऊर वाल्हे असं करत आता दिंडी दौंडजला पोहोचली आहे.
या उपक्रमात अगदी क्लासरूम साईज पुस्तकांपासून ते अगदी लहान पॉकेटबुक्स पर्यंतची पुस्तकं, त्याचबरोबर थ्रीडी पुस्तक अशा विविध प्रकारची पुस्तक ऋषिकेश दाभोळकर यांनी सोबत घेतली आहेत. त्याचबरोबर अतिशय समरस होऊन आवाजाचे उत्तम चढउतार, वाचिक अभिनय यांचा प्रत्यय मुलांना या गोष्टी ऐकताना येतो आहे.
याविषयी ऋषिकेश दाभोळकर म्हणाले, भरपूर ऊर्जा लावून हे प्रयोग सादर करणे आणि चालत-चालत पुढच्या गावी जाणे, या प्रवासाची मजा काही वेगळीच आहे. वाटेत भेटणाऱ्या लोकांना उपक्रमाबद्दल सांगणे, त्यांना पुस्तकाचे महत्त्व सांगणे, वाटेत जर भेटणाऱ्या मुलांना पुस्तके दाखवणे, असेही उद्योग मी प्रवासादरम्यान करत आहे.
या उपक्रमाच्या नियोजनात फलटणचे वसीमबार्री मणेर आणि वाघळवाडीचे परेशदादा यांनी आखणी करण्यात मोठी मदत केली आहे.
Wonderful initiative Mr Dabholkar. I stay in Pune and am willing to support in any ways you need . Do let me know.