स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अहमदनगर मधून
व्यवसाय कोणताही असो तो यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याबद्दल असलेली आवड. अशाच एका शेती व्यवसायाची आवड असणाऱ्या एका शेतकरी महिलेला कृषी क्षेत्राशी निगडीत ज्ञानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राहीबाई सोमा पोपरे असे या शेतकरी महिलेचे नाव असून अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांना सबंध भारतामध्ये ‘बीजमाता’ म्हणून ओळखले जात आहे.
साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी काय असते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले की लक्षात येते. केवळ आवडच नाही तर बीज उत्पादन, त्याचे संगोपन व त्याचे महत्व राहीबाई पोपरे आजही शेतकऱ्यांना पटवून सांगत असतात. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदाच झालेला आहे.
राहीबाई यांनी कधी शाळेत प्रवशेच केला नाही. असे असले तरी त्या गावरान बिया वाचवण्याचे काम करतात आणि इतरांनाही प्रोत्साहन देतात. शास्त्रज्ञांनाही त्यांच्या बियाणांबद्दलच्या ज्ञानाबद्दल कौतुक आहे. केवळ मेहनतीवर त्यांनी गावरान बियाण्यांची बँक तयार केली आहे, जी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामागे तसे कारणही आहे. कारण संक्रमित भाज्या खाल्ल्याने त्यांचा नातू आजारी पडला तेव्हापासून त्यांचा कल हा गावरान बियाण्यांकडे आहे. राहीबाई ह्या सेंद्रिय शेती तसेच देशी बियाण्यांचा वापर आणि संवर्धन यालाच प्राधान्य देतात. शिवाय सेंद्रिय शेतीबद्दल जनजागृती करुन ही शेतीपध्दत वाढवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आज जो तो संक्रमित बियाणावर भर देत आहे. त्यामुळे देशी बियाणे हे काळाच्या ओघात लोप पावते की काय अशी स्थिती आहे. मात्र, गुजरात आणि महाराष्ट्रात या पारंपरिक बियाण्यांना सर्वाधिक मागणी आहे. हीच मागणी पूर्ण करण्याचे काम राहीबाई ह्या करीत आहेत. संक्रमित बियाणामुळे पिकांमध्ये विविध प्रकारचे आजार होतात. बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीही ओळखल्या जातात. राहीबाई सध्या 50 एकर जमिनीवर 17 हून अधिक प्रकारची पिके पिकवत आहेत. आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कार प्रदान झाले आहेत.
56 वर्षीय राहीबाई सोमा पोपरे आज कौटुंबिक ज्ञान आणि प्राचीन परंपरेच्या तंत्राने सेंद्रिय शेतीला एक नवीन आयाम देत आहेत. त्या आदिवासी कुटुंबातील आहे. गावरान बियाणे वाचवण्याचे काम वडिलोपार्जित होते आणि राहीबाईंनी ते पुढे नेले व इतिहासच रचला अशीच काहीशी त्यांची कहाणी आहे.
स्वदेशी बियाण्यांची लोकांना जाणीव करून दिली
राहीबाईंनी गावरान बियाणांचे जतन करण्यासाठी अनेक राज्यांना भेट दिल्या. एवढेच नाही तर देशी बियाण्यांच्या मूल्याबद्दल जागरूकता ही वाढविली. त्या लोकांना सेंद्रिय शेती, कृषी-जैवविविधता आणि जंगली अन्न संसाधनांबद्दल शिक्षणाचे धडे देत होत्या. राहीबाईंनी शेततळं आणि पारंपारिक पाण्याची टाकी यांसह स्वत:ची पाणी साठवणूकीची रचना डिझाइन करून उल्लेखनीय टप्पे साध्य केले आहेत. दोन एकर पडीक जमीन क्षेत्रात भाजीपाला पिकवून भाज्यांमधून पैसे कमवायला त्यांनी सुरुवात केली. राहीबाई यांनी ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र तंत्रज्ञान हस्तांतरण संस्थेच्या मदतीने सेंद्रिय शेतीतंत्राचेही धडे दिले आहेत.
वर्षभरापूर्वीच एका चित्रपट निर्मात्याने संकरीत बियाणाबद्दल राहीबाई यांचा लढा या कथेवर तीन मिनिटांच्या लघुपट केला. त्याला 72 व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेस्प्रेसो टॅलेंट 2019’ च्या आंतरराष्ट्रीय विभागात तिसरे बक्षीस मिळाले.