स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मिळवलेल्या उच्च स्थानात बऱ्याच महान संशोधकांचा हातभार लागलेला आहे. त्यातील एक अस्सल आणि लखलखतं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर.
त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आसाम येथील रॉयल ग्लोबल या जागतिक विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. डॉ. माशेलकर यांच्या कारकिर्दीतील ही ५१ वी सन्मानाची डॉक्टरेट आहे.
जगभरातील विद्यापीठानी सन्मानाने गौरव करून प्रदान केलेल्या इतक्या डॉक्टरेट पदवी संपादन करणारे देशातील महनीय व्यक्तिमत्व हिसुद्धा एक विक्रमी नोंद ठरावी…
डॉ. माशेलकर यांना नुकतीच Deakin विद्यापीठाकडून ४९ वी doctorate ही पदवी, AcSIR_India यांच्याकडून ५० वी डॉक्टरेट सन्मानाने प्रदान करण्यात आलेली आहे.
भारतातील विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डॉ. माशेलकर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
त्यांची बालपणापासून ते जगविख्यात संशोधकापर्यंतची वाटचाल ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. एक थोर विचारवंत आणि वैज्ञानिक म्हणून ते जगविख्यात आहेत. पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी विज्ञान आणि समजसेवेसाठी समर्पित केलेला आहे.
माशेलकरांचा जन्म १ जानेवारी १९४३ सालचा. त्यांचे बालपण तसे हलखीत गेले.
बोर्डाच्या परीक्षेत माशेलकरांचा राज्यात ११ वा नंबर आला. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून जयहिंद महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. आणि रसायनशास्त्रात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊन त्यात पीएचडी मिळवली.
डॉ. माशेलकर यांची शैक्षणिक कारकीर्द म्हणजे परिस्थितीवर मात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करणारीच आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विज्ञानकडील कल बघता माशेलकरांनी संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. आणि CSIRच्या संचालकपदाची सूत्रे हातात घेतली. पुढे ते NCLचे संचालक म्हणून कार्यरत होते. संशोधनाच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करून अनेक वैज्ञानिक लढाया स्वतः पुढाकार घेऊन जिंकणारे ते भारतातील विज्ञानरूपी स्वराज्याचे निडर मावळेच आहेत.
त्यांनी जिंकलेल्या अनेक लढायांमधील विज्ञान क्षेत्रातील ओळखली जाणारी प्रसिद्ध अशी ‘हल्दीघाटी’ची लढाई आहे.
डॉ. माशेलकरांच्या सहभागामुळे आणि पुढाकारामुळे ही लढाई यशस्वी झाली. पूर्वीपासून भारत वापरत असलेल्या हळदीवर अमेरिकेने दावा केला होता आणि हळदीमध्ये असलेल्या नैसर्गिक औषधी गुणांवर स्वतःचे नाव लावले होते. डॉ. माशेलकरांनी या दाव्याला आव्हान करत तब्बल १४ महीने न्यायालयीन लढा दिला. हा विजय म्हणजे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा समजला जातो. या विजयानंतर पेटंटमधील कायद्यांमध्ये अनेक बदल आणि सुधारणा करण्यात आल्या.
बासमती तांदूळाच्या बाबतीतसुद्धा तसेच घडले. ते पेटंट माशेलकरांच्या पुढकारानेच परत मिळवले गेले.
डॉ. माशेलकर यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबाबत १९८२ साली शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला. तसेच इंग्लंड येथील सर्वोच्च आणि बहुसन्मानित समजली जाणारी royal society ची fellowship त्यांना प्रदान करण्यात आली. तंत्रज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व कामाबद्दल J.R.D Tata corporate leadership award १९९८ साली त्यांना देण्यात आला. भारत सरकारकडून सर्वोच्च समजले जाणारे असे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आले आहेत.
स्वतःच्या चिकाटी, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर भारतातील विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील हा अस्सल हीराच म्हणावा लागेल. डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा वैयक्तिक आणि वैज्ञानिक प्रवास नक्कीच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे.
सुंदर लेख