(पराग पोतदार)
स्वदेस न्यूज –
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
सुसंस्कृत आणि सुरक्षित पुण्यासाठी आता सज्जनांची एकजूट तयार होणे गरजेचे असून त्यांचा एक प्रभावी दबावगट तयार झाला पाहिजे. तेव्हाच विविध समस्यांवर काम करून पुण्याचे पूर्वीचे वैभव परत आणता येईल, असा आशावाद आज समविचारी पुणेकरांनी एकत्र येत व्यक्त केला.
‘वेध अस्वस्थ मनाचा…’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी आज सकारात्मक पुणेकर उत्साहाने नियोजित वेळेत उपस्थित राहिले. ठीक साडे सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम हाऊसफुल्ल गर्दीत रात्री ८,.१५ वाजता संपला. विविध प्रश्नांच्या, समस्यांच्या आणि आव्हानांच्या कचाट्यात अडकलेल्या पुण्याला बाहेर काढण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा हा संकल्प उपस्थितांनी या वेळी केला. या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पराग ठाकूर, उदय जगताप, शिरीष मोहिते यांनी केले.
पुण्याशी संबंधित विविध विषयांवर बोलण्यासाठी अंकुश काकडे, मोहन भंडारी, सूर्यकांत पाठक, संदीपसिंह गिल आणि गणेश शिंदे हे सर्व उपस्थित होते. त्यांनी पुण्यातील विविध प्रश्नांचा मोकळेपणाने वेध घेतला आणि जागरुकतेसोबत आता नागरिकांनी लढा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.
अंकुश काकडे म्हणाले, आजच्या परिस्थितीला आपण सारेच जबाबदार आहोत. बाहेरून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यांना या शहराचे काही घेणे देणे नाही. त्यामुळे आज शहराची परिस्थिती ढासळते आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचे हे सामूहिक अपयश आहे. राजकीय पक्षांचा, नेतृत्वाचा धाक हरवत चालला आहे.
संदीपसिंह गिल म्हणाले, आजच्या घडीला पौगंडावस्थेतील मुलांमध्ये गुन्हेगारी व व्यसनाधिनता वाढते आहे. त्यासाठी प्रथमतः पालकांनी मुलांचे मित्र होणे गरजेचे आहे. मुलांच्या दप्तरात कोयते सापडणे हे चांगले चिन्ह नाही. आपली मुले कुणाच्या संगतीत आहेत हे पाहायला हवे. उज्ज्वल पुणे हा प्लॅन आखण्यासाठी आता नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. जागरुकता वाढली तर बदल नक्की होतील.
सूर्यकांत पाठक यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा संदर्भ देत ही पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना असल्याचे सांगितले. आजच्या घडीला पोलीसांचा धाक राहिला नाही. बाहेरच्या लोकांनी पुण्याची संस्कृती पूर्ण बिघडवलेली आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. आज आपण सजग आणि सबळ नागरिक आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
माधव भंडारी म्हणाले, पैसे नसल्याने जशा काही समस्या निर्माण होतात तसेच गरजेपेक्षा जास्त पैसा अनेक चुकीच्या गोष्टींना कारणीभूत ठरतो आहे. मादक द्रव्यांचा पुण्याला विळखा हे सर्वात मोठे आव्हान पुण्यापुढे आहे. खासगी शिक्षण संस्थांना एकत्रित करून त्यांची चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.
गणेश शिंदे म्हणाले, गरीबी आणि श्रीमंती यांच्यातील वाढती दरी चिंताजनक आहे. त्यात जर संघर्ष सुरू झाला तर तो रोखणे आपल्याला अवघड होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पावले टाकणे आवश्यक आहे.
पराग ठाकूर यांनी सर्वांशी संवाद साधला. उदय जगताप यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शिरीष मोहिते यांनी आभार मानले. होनराज मावळे याने पसायदान सादर केले.
एकत्र आलो तर बदल होऊ शकतात ही सकारात्मकता मनात घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.