स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लीम कुटुंबातील हे व्यक्ती रोज करतात 27 कोटी रुपयांचे दान
भारतातील मुस्लीम समाज बांधवांनी कला, साहित्य, गायन या क्षेत्रात मोठे नाव कमावले. परंतु उद्योग क्षेत्रात अजूनही मुस्लीम समाज मागे आहे. मात्र तीन पिढ्यांपासून उद्योग सांभाळणारा एक मुस्लीम परिवार आहे. 1947 मध्ये फाळणीच्या वेळी मोहम्मद अली जिन्ना यांनी त्यांना पाकिस्तानात बोलवले होते. परंतु त्या परिवाराने जिन्ना यांची कल्पना धुडकावली होती. त्या परिवाराने भारतात राहूनच आपला उद्योग वाढवला. आज तो परिवार देशातील सर्वात श्रीमंत मुस्लीम परिवार आहे. देशातील या सर्वात श्रीमंत मुस्लीम कुटुंब म्हणजे ‘प्रेमजी’ यांचे. त्याचे प्रमुख अझीम प्रेमजी आहेत. ते ‘विप्रो’ या आयटी कंपनीचे संस्थापक आहेत.
अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे नाव विप्रो ठेवले. त्यांनी विप्रोला संगणक हार्डवेअर आणि नंतर सॉफ्टवेअर विकासाकडे वळवले.
किती देतात दान?
अझीम प्रेमजी भारतातील 19 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, अझीम प्रेमजींची एकूण संपत्ती US$ 12.2 बिलियन आहे. विशेष म्हणजे अझीम प्रेमजी ही देणगी देण्यात खूप पुढे आहेत. प्रेमजी 2021 मध्ये भारतातील परोपकारी अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. त्यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात ₹9,713 कोटी दान केले. म्हणजेच दररोज ते कोटींनी रुपये दान करतात.
—————–
शिवरायांच्या 12 गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज नामांकन
केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ नामांकन देण्यात येणार आहे. महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले होते. सरकारी शिष्टमंडळाची पॅरीसमध्ये वर्ल्ड हेरिटेड कमिटीशी चर्चा झाली. युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची देखील भेट घेण्यात आली आहे. या भेटीनंतर महाराजांच्या तब्बल 12 गड-किल्ल्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ नामांकन देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ सध्या पॅरिस दौऱ्यावर आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी इत्यादि किल्ल्यांचा समावेश होणार आहे.
—————
प्री वेडिंग शूटिंगला फाटा देत मनशांती छात्रालयास मदत
प्री वेडिंग फोटोशूटला फाटा देत शिरुर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ संचालित ‘मनशांती’ छात्रालयातील विद्यार्थ्यांना १ ली ते १० वी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व ४२ इंच टीव्ही कॅरम बोर्ड बॅडमिंटन किट, चेस बोर्ड व स्नेहभोजन देऊन योगेश पंदरकर व सीमा निभोरे यांनी नवा आदर्श घालून दिला.
याप्रसंगी दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मनशांती छात्रालयाचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले, संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांनी दोन्ही कुटुंबाचे आभार मानले. असाच आदर्श समाजातील सर्व तरुणांनी घेऊन समाजामध्ये अनाथ असलेल्या मुलांसाठी कार्य करावे, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मनशांती छात्रालयच्या इमारत बांधकामाचे काम सुरु करण्यात येणार असून त्यासाठीही मदत करावी असे आवाहन केले. अहिल्यानगर येथील शिक्षक अविनाश निंभोरे, पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई कला महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब पंदरकर उपस्थित होते.
—————-
300 फूट रुंद लघुग्रहाचा पृथ्वीवरील धोका टळला
अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाने ‘अॅस्टरॉईड 2024 YR4’ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नव्याने मोजली आहे. आधी हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता 1/32 इतकी होती आणि आता ही 1/360 इतकी झाली आहे.
गेले अनेक दिवस एक लघुग्रह चर्चेचा विषय ठरला. ज्यामुळे नासाची देखील चिंता वाढली होती. अलीकडेच Asteroid 2024 YR4 नावाच्या लघुग्रहाचा शोध लागला होता. ज्याची श्रेणी धोकादायक होती. काही दिवसांपूर्वी आलेल्या नासाच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते, की 2032 मध्ये त्याची पृथ्वीशी धडक होणार आहे. त्यावेळेस ती शक्यता 1/32 इतकी सांगण्यात आली होती. परंतु आता नवीन रिपोर्टनुसार नासाने दावा केला आहे की हा धोका आता जवळपास नाहीसा झाला आहे. आता हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी असल्याचे सिद्ध झाले आहे.
या लघुग्रहाचा आकार 55 मीटर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुरुवातीला नासाच्या ‘सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS)’ च्या ‘Sentry Risk Table’ नुसार हा लघुग्रह खूप धोकादायक असल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु नासाने 18 आणि 20 फेब्रुवारीला पुन्हा या लघुग्रहाचे निरीक्षण केले आणि याची पृथ्वीशी धडक होण्याची शक्यता कमी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता हा लघुग्रह पृथ्वीवर न पडता सरळ निघून जाण्याची शक्यता 99.72 टक्के झाली आहे, जी जवळपास नगण्यच म्हणता येईल.
नासाने प्रकाशित केलेली ही नवीन माहिती ‘अॅडिशनल टेलीस्कोप ऑब्जेर्वेशन’ वर आधारित आहे. उपलब्ध डाटावरुन या लघुग्रहाचा मार्ग आधीपेक्षा जास्त चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत मिळाली. Torino Scale वर हा लघुग्रह Level 1 वर क्लासिफाय करण्यात आला आहे. Torino Scale बनवणाऱ्या रिचर्ड बिन्झल यांच्यामते नवीन रिपोर्टनुसार asteroid 2024 YR4 द्वारे धोक्याची पातळी 0 वर जाईल. म्हणजे आता या लघुग्रहाची भीती बाळगण्याची पृथ्वीवासीयांना गरज नाही.
छान बातमी