स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
अंबानी-अदानी आसाममध्ये १ लक्ष कोटी गुंतवणार
ईशान्य भारतातील असणारे आसाम राज्य अलीकडच्या काळात वेगाने विकसित होत आहे. आसामच्या विकासाचा हा वेग आता आणखी वाढणार आहे. अॅडव्हान्टेज आसाम २.० इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर समिट २०२५’ या परिषदेचे आयोजन आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये येथे करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य व मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा उपस्थित होते.
या बिझनेस समिटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, जेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदाल, एस्सारचे प्रमुख प्रशांत रुइया, वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्यासह देश-विदेशातील अनेक मोठमोठे उद्योजक सहभागी झाले आहेत. या बिझनेस समिटच्या माध्यमातून आसाममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी व अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठ्या घोषणा केल्या. भारतातील हे दोन्ही मोठे उद्योजक व त्यांच्या कंपन्या आसाममधील विविध व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. दोन्ही उद्योजकांनी आसाममध्ये प्रत्येकी ५० हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे जाहीर केले आहे.
————-
अंथरुणावर खिळलेल्या मुलीसाठी ‘बोलके पुस्तक’.. केरळमध्ये शिक्षण खात्याचा अभिनव प्रयोग
शारीरिक दुर्बलतेमुळे अंथरुणाला खिळून असलेल्या केरळमधील मलप्पुरम् जिल्ह्यातील चोलनैक्कन या आदिवासी जमातीच्या बारा वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. या जमातीच्या भाषेत ३० दृक-श्राव्य धड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. केरळ सरकारच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
मीनाक्षी असे या मुलीचे नाव असून तिच्या वडिलांचा या महिन्यात हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
चोलनैक्कन हा आदिवासी समुदाय जंगलातील आतील भागात राहणारा असून मुख्य समाजाशी त्यांचा अतिशय मर्यादित संपर्क आहे. हत्तीच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने मिनाक्षीच्या कुटुंबाला सुरक्षेसाठी घनदाट जंगलातून अतिथिगृहात हलविले आहे.
याविषयी समग्र शिक्षणअभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक सुप्रिया ए.आर यांनी सांगितले, की मीनाक्षीच्या शिक्षणासाठी मल्लपूरम जिल्ह्याच्या समग्र शिक्षण अभियानाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून पुढाकार घेण्यात आला असून ते प्रत्येक आठवड्याला ती राहत असलेल्या ठिकाणी भेट देतात. या अभियानांतर्गत राज्यातील ६,१६८ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
याविषयी समग्र शिक्षण अभियान कार्यक्रम अधिकारी एस.एस. सिंधू म्हणाल्या, मीनाक्षी अल्पावधीच बोलक्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद देत आहे. शारीरिक अवस्थेमुळे ती यापूर्वी कधीही घराबाहेरच गेली नसल्याने तिला सर्वाधिक असुरक्षितता होती. त्यामुळे तिला घरीच शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. चोलनैक्कन समुदायाची स्वतःची भाषा असून द्रविड कुटुंबातील ही भाषा मल्याळम व तमीळ भाषेशी मिळतीजुळती आहे. केवळ मीनाक्षीसाठीच या भाषेतील बोलक्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
——
देशात साकारला हायपरलूपचा पहिला चाचणी मार्ग.. रेल्वे मंत्रालयाची घोषणा.
भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या सुरू केल्या. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग तयार झाला आहे. यामुळे ३५० किलोमीटरचे अंतर केवळ ३० मिनिटांत कापता येऊ शकते. म्हणजेच पुणे ते धुळ्याला जाण्यासाठी हायपरलूपने साधारण ३० मिनिटे वेळ लागेल.
ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वर देऊन एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. ‘रेल्वेने आयआयटी मद्रासच्या सहकार्याने हायपरलूप चाचणी मार्ग तयार केला आहे. सरकार-शैक्षणिक संस्थेच्या सहकार्यामुळे भविष्यात वाहतुकीत नावीन्यता येणार आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. हायपरलूप प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने आर्थिक निधी पुरविला असून आयआयटी मद्रासच्या परिसरात हा ४२२ मीटरचा चाचणी मार्ग तयार केला आहे.