दुबईमध्ये भारत ठरलाय सर्वात मोठा गुंतवणूकदार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे दुबईहून
भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. तसेच भारत विविध देशांमध्ये गुंतवणूक करत आहे. जगात पर्यटन आणि सर्वात उंच इमारतींसाठी युनायटेड अरब अमीरातमधील दुबई शहर प्रसिद्ध आहे. या दुबईत भारत सर्वात मोठा गुंतवणूकदार बनला आहे. दुबई सरकारच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारताने सन 2024 मध्ये दुबईत 3.018 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
दुबईची अर्थव्यवस्था आणि पर्यटक विभागच्या दुबई एफडीआय मॉनिटरनुसार, दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे. भारताने दुबईत 21.5 टक्के गुंतवणूक केली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेने 13.7 टक्के, फ्रॉन्सने 11 टक्के, यूनाइटेड किंगडम 10 टक्के गुंतवणूक दुबईत केली आहे. स्वित्झर्लंडची गुंतवणूक 6.9 टक्के आहे.
सन 2023 मध्ये दुबईमध्ये भारताची गुंतवणूक 589 दशलक्ष डॉलर्स होती. ती 2024 मध्ये चांगलीच वाढली आहे. ती आता 3.018 अब्ज डॉलर्स झाली आहे. यामुळे भारत दुबईतील पहिल्या क्रमांकाचा गुंतवणूकदार देश बनला आहे. दुबईतील गुंतवणुकीच्या यादीत भारताचे नाव अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीनसह सर्व विकसित देशांच्या पुढे आहे. 2024 मध्ये ग्रीनफिल्ड एफडीआय प्रकल्पांची कामगिरी 2023 च्या 73.5 टक्के इतकी होती. त्याच वेळी, पुनर्गुंतवणूक एफडीआय प्रकल्प 2023 मध्ये 1.2 टक्क्यांवरून 2024 मध्ये 3.3 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
सन 2023 मध्ये 249 प्रकल्पांमध्ये भारताने गुंतवणूक केली. ती वाढून 2024 मध्ये 275 झाली आहे. प्रकल्पाच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताच्या गुंतवणुकीत सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. या क्षेत्रात 26.9 टक्के गुंतवणूक भारताने केली आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रात 23.6 टक्के, उत्पादन क्षेत्रात 9.8 टक्के, खानपान क्षेत्रात 8.4 टक्के तर रिअल एस्टेटमध्ये 6.9 टक्के गुंतवणूक भारताने केली आहे.
महाराष्ट्रातील 5600 शिक्षकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार
56 कोटी रुपयांची थकबाकी मंजुर
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) –
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार आहे. मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षकांची 56 कोटीहून अधिक प्रलंबित थकीत बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
ही बिले मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. शिक्षक शिक्षकेतरांची अनेक प्रकारची थकीत बिले तातडीने तपासून शिक्षण संचालकांकडे पाठवून मार्चपूर्वी बिलांना मंजुरी देऊन शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करा या मागणीसाठी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन पथक अधिक्षक तसेच ठाणे पालघर रायगड वेतन अधिक्षक यांच्याकडे तगादा लावला होता.आज याबाबत शिक्षण उपसंचालकांनी ही सर्व बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविले असल्याचे लेखी पत्र अनिल बोरनारे यांना सुपूर्द करण्यात आले.
एकाच दिवशी १७१ रुग्णांना वैद्यकीय मदतीचा हात
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) –
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली. माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली. यामध्ये मेंदूशी निगडीत आजाराचे सर्वाधिक ३५ आणि हिप रिप्लेसमेंटच्या २९ रुग्णांचा समावेश होता.
राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचे नाही, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तातडीने आणि अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कक्षांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
मेंदूचा आजार असलेले सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. त्याखालोखल हिप रिप्लेसमेंटचे २९ रुग्ण, हृदयरोगाचे १८ रुग्ण, रस्ते अपघाताचे १७ रुग्ण, कर्करोग शस्त्रक्रियेचे १७ रुग्ण, अपघात शस्त्रक्रियेचे १२ रुग्ण, कर्करोग केमोथेरीपी किंवा रेडीएशनचे १० रुग्ण, बाल रुग्ण १०, नवजात बालरोग ७ रुग्ण, डायलिसिसचे ५ रुग्ण, गुडघा प्रत्यारोपण ५ रूग्ण, कर्करोगाचे २ रुग्ण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण १ रुग्ण, मूत्रपिंड प्रत्यारोपण १ रुग्ण, यकृत प्रत्यारोपण १ रुग्ण, तर विशेष प्रकरणातील १ रूग्ण अशा एकूण १७१ रूग्णांना एकाच दिवशी कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात आली.
कशी मिळवू शकता मदत?
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सहायता कक्षाच्या मदत क्रमांक ८६५०५६७५६७ वर दूरध्वनी करून थेट मोबाइलवर अर्ज उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करता येतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देता येतील, अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.