मुंबईत धावणार आता बाईक टॅक्सी!
मुंबईकरांचा प्रवास होणार एकदम स्वस्तात….
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच युवकांनाही चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाय करण्यात येत आहे. कोस्टल रोड, जलमार्ग वाहतूक, मेट्रो अथवा भुयारी रेल्वेचा टप्पा अशा विविध माध्यमांतून मुंबई थांबता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता बाईक टॅक्सीचा नवीन मार्ग समोर आला आहे.
स्वस्त आणि झटपट प्रवास
या बाईक टॅक्सी प्रवासाकरीता एका किलोमीटरसाठी फक्त ३ रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती समोर येत आहे. बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल. बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्याससुध्दा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीतकमी ५० दुचाकी वाहने असणे आवश्यक आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल.
बाईक टॅक्सीमधील दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलीस पडताळणी करूनच चालकाला परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणार्या कंपनीस देण्यात येतील.
ओला, उबेरच्या धरतीवर बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आह. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. बाईक टॅक्सीमध्ये महिला सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. बाईक चालकाला पाठीमागे प्रवाशी बसवताना बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे.
अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना खूश करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती. आता या योजनेअंतर्गत अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी एक कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी ९२ लाख रुपयांचा निधी पाठवला आहे. येत्या काही दिवसांत सेविकांच्या खात्यात भत्त्याची रक्कम जमा होणार आहे.
तत्कालीन महायुती सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्या योजनेसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
अर्जासाठी ५० रुपये
प्रत्येक अर्जासाठी सेविकांना ५० रुपये भत्ता देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यासह राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्यांसह आशा वर्करना प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात सुमारे चार हजार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांसह राज्यात सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनी अर्ज भरले होते.
हा निधी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ‘हा निधी आता कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे,’ असे महिला व बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. लवकरच त्याचे वाटपही होईल, असे महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंह गिरासे यांनी म्हटले आहे.
शासकीय कर्क रुग्णालयात रोबोटिक सर्जरी यशस्वी
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे संभाजीनगरहून
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया राज्य कर्करोग संस्थेत नुकतीच यशस्वी झाली. या नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ४२ वर्षीय महिलेवर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया होऊन दुसऱ्या दिवशी संबंधित महिला रुग्ण चालूदेखील लागली आहे.
राज्य योजनेंतर्गत व ‘टर्न की प्रोजेक्ट’अंतर्गत ३२.५ कोटींच्या निधीतून रोबोटिक शस्त्रक्रियेची यंत्रणा कर्करुग्णालयात कार्यान्वित झाली. या शस्त्रक्रियेसाठी स्त्री कर्करोग विभागातील पाच डॉक्टर व दोन परिचारिकांचे दिल्लीतील ‘एम्स’मध्ये प्रशिक्षण झाले आणि गर्भाशय काढण्याची रोबोटिक शस्त्रक्रिया नुकतीच झाली.
विशेष म्हणजे आशियातील पहिल्या रोबोटिक शल्यचिकित्सक पद्मश्री डॉ. मंजुला अनागानी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. कनीझ फातेमा, डॉ. पल्लवी तिडके यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. तर, डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. ज्योती कोडगिरे, डॉ. शगुफ्ता फातेमा, डॉ. सालेहा कौसर, डॉ. मदिहा फारुकी, भावेश आहेर, कृष्णा गायकवाड आदींनी या शस्त्रक्रियेसाठी सहाय्य केले. डॉ. दीपक कोकणे, डॉ. रश्मी बेंगाली, डॉ. सोनल पाचोरे, डॉ. रमाकांत अलापुरे, डॉ. सुजाता यांनी रुग्णाला भूल देण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. पुढील टप्प्यात गर्भाशय मुखाचे कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाच्या गाठी व अंडाशयाच्या गाठींवरही रोबोटिक शस्त्रक्रिया होणार आहेत.
कमीत कमी छेद, वेदना व रक्तस्त्राव या वैशिष्ट्यांसह शस्त्रक्रियेसाठी ३६० अंशात फिरणाऱ्या ‘रोबोटिक आर्म्स’मुळे गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही सहजतेने होते. या तंत्रज्ञानातील थ्रीडी व मोठ्या प्रतिमेमुळे शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रिया करताना अधिक स्पष्टता मिळते, ज्यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते. ‘रोबोटिक’मुळे रुग्णांमध्ये लवकर सुधारणा होत असल्याने रुग्णालयातील वास्तव्यही कमी होते.
उल्लेखनीय म्हणजे खासगीत ‘रोबोटिक’साठी काही लाखांचा खर्च येतो; पण कर्करुग्णालयात एक हजार रुपयांत ही शस्त्रक्रिया होणार आहे, अशीही माहिती विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड; तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. कर्करुग्णालयासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लांट’ सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे डॉ. गायकवाड म्हणाले. या वेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांची उपस्थिती होती.
Useful