पर्यावरणपूरक दृष्टीने चोखाळली उद्योजकतेची नवी वाट
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी पुण्याहून
पुण्यातील पूजा आपटे या तरुण उद्योजिकेने एक वेगळी वाट निवडत पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल उचलले आहे. आफ्रिकेत वापरली जाणारी टायरपासून चप्पल बनवण्याची पारंपरिक पद्धत पाहिली आणि त्यातूनच ‘नेमीताल’ या ब्रँडची संकल्पना जन्माला आली. आता जुन्या टायरपासून चप्पल बनवण्याचा व्यवसाय चांगल्या रीतीने रुजतो आहे.
पूजाने TERI (The Energy and Resources Institute) मधून अपारंपरिक ऊर्जा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तीव्र जाणीव झाली. विशेषतः टायरसारख्या न विघटणाऱ्या वस्तूंचा प्रश्न तिला खटकला. पारंपरिक पद्धतीने टायर रिसायकल करताना मोठा खर्च आणि प्रदूषण दोन्ही होते.
आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी तिने स्थानिक चांभारांसोबत काम केले. जुन्या टायरपासून विविध डिझाईनच्या चपला तयार केल्या. नव्या आणि टिकाऊ उत्पादनासाठी योग्य टायरची जाडी, साहित्य आणि डिझाईन यावर प्रयोग करत तिने अधिक हलके आणि आरामदायक उत्पादन तयार केले. 2018 साली तिला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून ‘अपकमिंग वुमन आंत्रप्रिन्युअर’ हा पुरस्कार आणि ५०,००० रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचा उपयोग करून त्यांनी 2019 मध्ये ‘नेमीताल’ ब्रँडच्या नावाने व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. फक्त १८ महिन्यांत त्यांनी सुमारे १००० जोड्या विकल्या आणि सुमारे ४०० किलो टायर रिसायकल केला. त्यांचा व्यवसाय जसजसा वाढत गेला, तसतसं त्यांनी ऑनलाइन विक्रीसाठी स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केले. कोविड-१९ च्या काळात मार्केटमध्ये थोडी अडचण आली, पण त्यांनी ऑनलाइन मोडचा अधिक चांगला वापर केला.
आज नेमीतालकडून कोल्हापुरी, मोजडी, सँडल्स, हिल्स अशा विविध प्रकारच्या चपला ६०० ते १००० रुपयांदरम्यान विकल्या जातात. या व्यवसायातून केवळ पर्यावरणपूरक उत्पादनच नाही, तर स्थानिक चांभारांना काम मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम पूजा आपटे यांनी केले आहे. सध्या पूजा आपटे यांचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे ८-१० लाख रुपयांच्या घरात आहे आणि तो दरवर्षी वाढतच आहे.
एक अपारंपरिक कल्पना, थोडंसं धाडस आणि पर्यावरणाची जाणीव यातून पूजाने एक यशस्वी स्टार्टअप उभा केला आहे. त्यांच्या प्रवासाने हे दाखवून दिलंय की खरंच ठरवलं तर कचऱ्यातूनही सोनं बनवता येतं.
Great news