स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे इंडोनेशियातून…
केवळ भारतातच नाही तर अवघ्या जगभरात ठिकठिकाणी गणेशमंदिरे आहेत. पण इंडोनेशिया या देशामध्ये एक गणेशमंदिर तब्बल ७०० वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि ते देखील ज्वालामुखीच्या काठावर.
केवळ देशातच नव्हे तर जगातील अनेक भागांत गणपतीची अत्यंत श्रद्धेने पूजा केली जाते. इंडोनेशियामध्ये सक्रिय ज्वालामुखीच्या तोंडावर हे अद्वितीय गणेश मंदिर आहे. या मंदिरात वार्षिक उत्सव होतो. भाविक आपला जीव धोक्यात घालून सलग 14 दिवस गणेशाची पूजा करतात.
गणेश मंदिर कोठे बांधले आहे?
इंडोनेशियामध्ये एकूण 141 ज्वालामुखी आहेत त्यापैकी 130 अजूनही सक्रिय आहेत. म्हणजेच वेळोवेळी तिथे उद्रेक होत राहतात. यापैकी एक म्हणजे माउंट ब्रोमो पर्वतावर बांधलेला ज्वालामुखी. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असल्याने इंडोनेशियाला जाणाऱ्या पर्यटकांना तेथील अनेक भागांना भेट देण्यास मनाई आहे परंतु ज्वालामुखीचे धोकादायक स्वरूप असतानाही लोक तेथील गणेश मंदिराला आवर्जून भेट देतात.
पूजेचा इतिहास काय आहे?
माउंट ब्रोमो म्हणजे स्थानिक जावानीज भाषेत भगवान ब्रह्मा. येथील मंदिर जरी गणेशाचे असले तरी स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही मुख्य मूर्ती 700 वर्षांपासून आहे. त्यांच्या पूर्वजांनी ही मूर्ती स्थापन केलेली होती. ही गणेशमूर्ती जळत्या ज्वालामुखीच्या जवळ राहूनही त्यांचे कायम रक्षण करते अशी इथे येणाऱ्या भाविकांची व स्थानिकांची श्रद्धा आहे.
येथील पूर्वेला स्थायिक असलेला टांगेरीज हा आदिवासी समूह अनेक शतकांपासून या गणेशाची पूजा करतो आहे. हे गणेश मंदिर लुहूर पोटें म्हणून ओळखले जाते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती असून सर्व मूर्ती ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाव्हापासून बनवलेल्या आहेत.
हिंदू चालीरीतींचे महत्त्व
ब्रोमो पर्वताभोवती बांधलेल्या ३० गावांमध्ये या जमातीचे सुमारे १ लाख लोक राहतात. ते स्वतःला हिंदू मानतात आणि त्यांनी हिंदू प्रथाच अंगिकारल्या आहेत. कालांतराने त्यांच्या चालीरीतींमध्ये काही बौद्ध प्रथा देखील जोडल्या गेल्या आहेत. या लोकांप्रमाणेच त्रिमूर्तीची (ब्रह्मा, विष्णू, महेश) पूजा करण्याबरोबरच भगवान बुद्धाचीही पूजा करतात.
अनोखी दंतकथा
टांगेरीजमध्ये एका विशेष पूजेला खूप महत्त्व आहे. जरी ब्रोमो पर्वतावर वर्षभर गणपतीची पूजा केली जात असली तरी मुख्य कार्यक्रम जुलैमध्ये 14 दिवस चालतो. या पूजेला यज्ञया कसाडा उत्सव म्हणतात. 13व्या ते 14व्या शतकादरम्यान ही पूजा सुरू झाल्याचे मानले जाते. यामागे एक लोककथा देखील आहे. त्या ठिकाणचे राजा आणि राणी यांना मूल नव्हते. त्यांना 14 मुले दिली. त्यांना अट घातली की ते त्यांचे १५ वे बाळ पर्वतावर अर्पण करतील. यानंतर दरवर्षी पूजेची प्रक्रिया सुरू झाली.
ज्वालामुखीच्या आत गणपतीला फळे, फुले आणि हंगामी भाज्याही अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की भगवान गणेशाची पूजा केल्याने आणि जळत्या ज्वालामुखीला फळे अर्पण केल्याने उद्रेक थांबतो आणि तसे न केल्यास हा समाज नष्ट होईल. ज्वालामुखीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक होत असले तरी पूजा नक्कीच केली जाते. 2016 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. तेव्हाही सरकारने केवळ 15 पुजाऱ्यांना पूजा करण्याची परवानगी दिली होती. मात्र हजारो लोक आले होते.
जय गणेश