स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून
देशाची लाईफ लाईन असलेली भारतीय रेल्वे आता लवकरच अणू ऊर्जेवर धावताना दिसणार आहे. झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल भारत उचलतो आहे.
२०३० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी रेल्वेने अणुऊर्जा विभाग आणि ऊर्जा मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वे आता स्वत:चे अणुऊर्जा प्रकल्प उभारणार असून सर्व रेल्वे या ऊर्जेवर धावतील असे नियोजन केले जात आहे. भारतीय रेल्वे छोट्या स्वरुपाच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणार आहे. अणुऊर्जा विभाग आणि ऊर्जा मंत्रालय इंधन पुरवठा करारांतर्गत हे प्रकल्प उभारण्यास मदत करणार आहेत.
२०३० पर्यंत १० गिगावॅट ट्रॅक्शन पॉवरची गरज पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. यासाठी रेल्वे ३ गिगावॅट अक्षय ऊर्जा (जलविद्युतसह) खरेदी करेल. ३ गिगावॅट वीज औष्णिक आणि अणुऊर्जेपासून मिळेल आणि उर्वरित ४ गिगावॅट वीज डिस्कॉम्स (वीज वितरण कंपन्या) कडून खरेदी केली जाईल. रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील वित्तपुरवठा संस्था या प्रकल्पांना निधी देतील. या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याची जबाबदारी भारतीय रेल्वे वित्त महामंडळाला दिली जाऊ शकते.
केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या संदर्भात म्हणाले की, रेल्वेची विजेची मागणी सतत वाढतच आहे. रेल्वेने विद्यमान आणि भविष्यात येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पांमधून वीज मिळविण्यासाठी पर्यायांचा शोध सुरू केला आहे. रेल्वेला त्यांच्या ट्रॅक्शन पॉवर गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.