स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
भारतीय सैन्याच्या ताफ्यात आता रोबोट डॉग्ज यांचा समावेश करण्यात आला आहे. या रोबोर्ट डॉग्जमुळे भारतीय लष्कर आणखी प्रबळ होणार असून यामुळे शत्रूंवरती नियंत्रण ठेवणे आणखी सोपे जाणार आहे. युद्ध सामुग्रीचे संरक्षण, घातक साहित्य हाताळणे, बॉम्ब निकामी करणे आणि गुप्त माहिती मिळवण्याची जबाबदारी पार पाडण्यात हे रोबोट डॉग्ज मदत करणार आहेत.
रोबोट डॉग्जची निर्मिती
लष्कराने बुधवारी सैन्य दिनाच्या निमित्तानं रोबोटिक मल्टी-युटिलीटी लेग्ड इक्विमेंटच्या (MULES) पहिल्या तुकडीचं प्रदर्शन केलं. या इक्विपमेंटला ‘रोबोट डॉग्ज’ असं म्हटलं आहे. या यंत्राची निर्मिती एरोअर्क या कंपनीने केली आहे. भारतीय लष्कराने सप्टेंबर 2023 मध्ये या यंत्राची मागणी नोंदवली होती. त्यानुसार, जून महिन्यात 100 यंत्रे हे लष्कराला मिळाली आहेत.
रोबोट डॉग्जची जबाबदारी
रोबोट डॉग्ज हे सैन्य दलाच्या आवारामध्ये किंवा लष्करी सामुग्री असलेल्या ठिकाणी ज्याला लष्करी सुरक्षेच्या भाषेत पेरिमिटर सेक्यूरिटी असं म्हणतात, अशा ठिकाणी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश न देण्यावर लक्ष ठेवेल. हे रोबोट डॉग्ज स्वतःहून कार्य करू शकतात. किंवा त्यांना रिमोट कंट्रोलच्या मदतीने सुद्धा हाताळता येऊ शकते. त्यांच्यामध्ये कम्प्यूटर, बॅटरी, फ्रंट व रेअर सेन्सर आणि चालण्यासाठी चार पाय दिले आहेत. त्यांच्यामध्ये इन्फ्रारेड थर्मल कॅमेरा आणि अन्य सेन्सर आहेत ज्याच्या मदतीने ते निगराणी करु शकतात.
या यंत्रांमध्ये बसवलेली बॅटरी ही तब्बल 20 तास पुरू शकते. हे संपूर्ण यंत्र हे एनव्हीडिया झेव्हीयर प्रोसेसर (NVIDIA Xavier processor) नुसार चालणार आहे. या यंत्राचं वजन हे 51 किलो असून प्रती सेकंद 3 किलोमीटर हा त्यांचा वेग असणार आहे. ते 12 किलोपर्यंतच वजन सहज उचलू शकतात आणि पुढच्या 15 मिनीटांमध्ये ते सर्व सामान जागी ठेवू शकतात.
या यंत्रामध्ये छोटी छोटी शस्त्रे सुद्धा फीट केली आहेत ज्याच्या मदतीने ही यंत्रे सैन्याशिवाय शत्रूंशी लढू शकतात. तसेच सीमा रेषेवरील सैनिकांपर्यत युद्धसामुग्री किंवा अन्य सामुग्रीच्या दळण-वळणासाठी सुद्धा त्यांचा वापर करता येऊ शकतो.
रोबोट डॉग्जच्या कामाचं क्षेत्र
ही यंत्रे सर्व प्रकारच्या भौगोलिक प्रदेशात कार्य करु शकतात. ज्या धोकादायक प्रदेशात सैन्य पोहोचू शकत नाही किंवा जास्त काळ राहू शकत नाही अशा ठिकाणी या यंत्राद्वारे सुरक्षा पुरवली जाण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कारण या यंत्राना उंच भागावर चढता आणि उतरता येऊ शकते. ते पायऱ्यावरुन चढ-उतार करु शकतात. त्यामुळे उंचावरील भागात निगराणी करण्यासाठी त्याचा वापर करता येणार आहे.
ही यंत्रे मायनस 40 अंश सेल्सीयस ते 55 अंश सेल्सीयस वातावरणात सहज काम करु शकतात. तसेच ते धूळरोधक आणि पाणीरोधक आहेत.
नुकतेच 77 व्या सैन्य दिनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या दिनानिमित्त परेडमध्ये पहिल्यांदाच झालेल्या एनसीसी गर्ल्स कॅडरच्या कवायतीसह मल्टी-युटिलीटी लेग्ड इक्विमेंट रोबोट डॉग्ज हे मुख्य आकर्षण ठरले. ‘समर्थ भारत सक्षम सेना’ ही या सैन्य दिनाची थीम होती.दरवर्षी सैन्य दिनानिमित्त लष्कराकडून नवी दिल्ली येथे विशेष परेड आयोजित केली जाते मात्र यंदा ही परेड पुण्यातील खडकी येथे आयोजित करण्यात आली होती.