ल. म. क़डू, शाहीर हेमंत मावळे, चिंतामणी हसबनीस, अरुण मेहेत्रे, शीतल बापट आदींचा सन्मान
स्वदेस न्यूज प्रतिनिधी) :
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांचा कर्तृत्वरत्न पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला.
निमित्त होते, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनाचे.
‘शब्दसारथी’च्या वतीने हे कर्तृत्वरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक उपस्थित होते.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू, शाहिरी परंपरेतील विशेष योगदानाबद्दल शाहीर हेमंतराजे मावळे, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल श्यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक शीतल बापट, अंधांना चित्रकलेचा अनुभव देणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस, ज्येष्ठ पत्रकार अरुण मेहेत्रे यांना कर्तृत्वरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी डॉ. माधव पोतदार यांनी लिहिलेल्या ‘अंतरीचा देव माझा’ आणि स्वप्नगंधा वस्ते यांनी लिहिलेल्या ‘मायपीस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी डाॅ. विनोद म्हणाले, संपन्नता, भावसंपन्नता आणि संवेदनशीलताच कुटुंबाची परंपरा टिकवू शकते आणि आपल्याला एक नवी ऊर्जा देऊ शकते. कृतीशील परंपरेचा आदर्श हाच आपल्या संस्कृतीचा आधार आहे. जो आचरणाने आपले कर्तृत्व दाखवून देतो तो खरा आचार्य असतो. डाॅ. माधव पोतदार हे खऱ्या अर्थाने आचार्य होते. त्यांचा आदर्श घेऊन घरातले सगळे लिहिते झाले आणि परंपरा टिकली. सध्याच्या काळात असे होताना दिसत नाही कारण आई-वडीलच घरात नसतात. मुलांना उत्तम असे प्रत्यक्षात पाहायला काही मिळत नाही तर त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळणं तर दूरच. आजी आजोबा तर ज्ञानाची अनुभवाची खाण असते त्यांच्याकडे नातवंडे राहिली तर त्यांच्याकडून जाता-जाता संस्कार होऊन जातात. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आता सगळ्या पालकांसमोर पालकत्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
अभय टिळक म्हणाले, आज दुर्दैवाने आपला समाज इतिहासात गुंतला चालला आहे. वर्तमानातील जे प्रश्न आहेत ते सोडवायची ताकद नसल्याने भविष्याकडे बघण्याची उमेद नाही म्हणून आपण जास्तीत जास्त इतिहासात गुंतत जाऊन इतिहासातील वाद व्यवहारांमध्ये आणून वर्तमान नासवण्याचे काम करत आहोत. त्यामुळे शाहीरांची, शिक्षणप्रेमींची, साहित्यिकांची, कलावंतांची भूमिका मोलाची आहे. त्यादृष्टीने आजचे हे कर्तृत्वरत्न पुरस्कार महत्त्वाचे आहेत.
ल. म .कडू म्हणाले, मी अनेक वाटा धुंडाळल्या. मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये कला ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. साधारण सहावी नंतर चित्रकला थांबते याचे कारण पालक. चित्रकला छडी घेऊन शिकवायचा विषय नाही हे कळल्यावर मी माझ्या मुलांवर संस्कार केले. त्याचा परीघ इतर मुलांपर्यंत नेऊन विस्तारण्याचा प्रयत्न केला.
पाहू शकणाऱ्यांनी पाहता न येण्यासाठी प्रयत्न करणे ही मनुष्यप्रकृती. पाहता येणाऱ्यांनी आणि पाहू न शकणाऱ्यांनी एकत्र जमून एखादी गोष्ट पाहणं ही संस्कृती असते अन् पाहता न येणाऱ्यांनी पाहता येणाऱ्यांच्या पाहण्याविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार ही क्रांती असते, असे चिंतामणी हसबनीस यांनी सांगितले आणि अंधांसाठी चित्र काढण्याच्या अनुभवाविषयी ते बोलले.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, जेव्हा मी शाहिरी शिकलो तेव्हा माझ्या गुरूंनी मला सगळ्या प्रकारच्या अंगणामध्ये जा असे शिकवले होते पण दुर्दैवाने तसे घडत नाही. साहित्य क्षेत्रात काम करत असतानाही आमच्या लोकसाहित्याचा साहित्यात विचार होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. मनिषा पोतदार यांनी केले. ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.
खूप छान