स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
पुण्यातील प्रसिद्ध असलेले डॉ. दिलीप देवधर यांनी नुकतीच त्यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण केली असून त्यांचा जीवन प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. डॉक्टरी पेशा सांभाळताना लेखक म्हणून वाटचाल करणारे डॉ. दिलीप देवधर आणि त्यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या अवघड काळातसुद्धा रुग्णांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांना हात लावून तपासणारा हा देवदूत म्हणजे पुण्यनगरीची शान आहे.
आयुष्यात ठरवलेली कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणाराच यशस्वी ठरतो. परंतु या काळात घडणाऱ्या अनेक घडामोडी लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करू देतातच, असे नाही. पण मिळालेल्या संधीचे सोने करीत यशाचा मार्ग नक्कीच साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. दिलीप देवधर. लहान असताना हॉकी या खेळामध्ये विशेष आवड असणारे डॉ. देवधर यांना मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे खेळात करियर करता आले नाही. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले. बीजे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातच आपले कार्य सुरू केले.
जुलै १९८७ मध्ये ‘आरोग्य तेथे’ हे मासिक प्रकाशित करण्यास त्यांनी सुरुवात केली. गेली ३८वर्षे सातत्याने हे मासिक डॉ. दिलीप देवधर यांनी सुरू ठेवले असून प्रत्येक मासिकात आरोग्यविषयक लेखवाचायला मिळतात. तसेच डॉ. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली भुगाव व नारायण पेठ येथे गेली अनेक वर्षे २ वृद्धाश्रम चालवले जात आहेत.
वृद्धांच्या आजारांविषयी माहिती देणाऱ्या तब्बल १२ पुस्तिका त्यांनी लिहिल्या असून आध्यात्मिक विषयांवरील त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील दोन पुस्तके दासबोधावर आधारित असून त्यांची नावे ‘आत्मज्ञान’ व ‘जीवनयोग’ अशी आहेत. इतर पुस्तकांमध्ये दैनंदिन जीवन व गीता, आनंदी जीवन, जीवनशैली व आजार, आनंदी वृद्धत्व, वृद्धत्वाशी मैत्री अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.
लेखक म्हणून त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. परंतु एक डॉक्टर म्हणूनसुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेस यशस्वी कर्तव्यपूर्ती केलेली दिसून येते. कोरोना काळामध्ये रुग्णांना हात लावून तपासणारे पुण्यातील ते एकमेव डॉक्टर आहेत. कोरोना या आजाराची भीती कमी करण्यासाठी डॉ. देवधर स्वतः रुग्णाजवळ बसून हात लावून त्यांना तपासत असत. कोरोना हा आजार भीती कमी झाल्याने अर्धा बरा होऊ शकतो, अशी त्यांना खात्री होती. तसेच या आजाराबाबतची जनमानसातील भीती कमी करण्यासाठी आणि या आजाराबाबतची अधिकाधिक माहिती व उपचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकसारख्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात त्यांनी अनेकदा मार्गदर्शनदेखील केले.
या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यात; सर्वोत्कृष्ट सचिव, सर्वोत्कृष्ट अध्यक्ष – इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा, जीवनगौरव पुरस्कार तसेच डॉ. आर.के. मेंढा सामाजिक सेवा पुरस्कार, बेस्ट फॅमिली डॉक्टर पुरस्कार. महाराष्ट्र शासनाचा कुटुंब कल्याण विषयक लेखनासाठीचा प्रथम पुरस्कार, युनिसेफ या बालकल्याण विषयक साहित्यासाठीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेले आहे.
‘I am proud to be a family doctor’असे ते अभिमानाने सांगतात. वयाच्या ७०व्या वर्षीसुद्धा कोरोना काळात त्यांनी केलेले आव्हानात्मक काम नक्कीच स्तुत्य आहे.