स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अंदमानातून
अंदमानच्या सफरीमध्ये गेलात की एका विलक्षण आजीची भेट होते. त्यांचं नाव अनुपमा राव!! या 65 वर्षांच्या आजीबाई अंदमान मधील रॉस आयलंड म्हणजे आताचे नेताजी सुभाष चंद्र बोस आयलंड !!… या बेटावर अनेक वर्षांपासून मुक्कामी आहेत. तिथे या आजीबाई गाईड म्हणून काम करतात.
2018 पासून नव्याने नामकरण झालेल्या या बेटावर असणाऱ्या या आजी चक्क हरणं आणि मोरांशी बोलतात. इतकेच नाही तर ती हरणे आणि मोर त्यांना प्रतिक्रियाही देतात. हरणे त्यांचं ऐकत त्यांच्या सोबत फिरतात, तर मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. निसर्गाला आणि प्राण्यांना आपण मनापासून हाक दिली तर ती तेवढ्याच निरागसपणे आपल्या हाकेला उत्तर देतात याच हे उत्तम उदाहरण आहे.
इतकंच नाही तर या आजी एका झाडाकडे बघून ‘परी परी’ म्हणून हाका मारतात. झाडावर अनेक छोटे छोटे पक्षी आणि खारुताई यांच्याशी बोलतात.
जेव्हा या आजी वेगवेगळ्या नावांनी हाका मारतात तेव्हा हाकेसरशी पोरं गोळा व्हावीत अशी असंख्य हरणं त्यांच्या भोवताली गोळा होतात. इतकेच नव्हे तर कित्येक मोरसुद्धा अगदी हाताच्या अंतरावर येऊन थांबतात.
दिसायला सगळी हरणं तशी एकसारखीच पण या आजीबाई मात्र प्रत्येक हरणाला नावाने ओळखतात. ती येऊन त्यांच्याजवळ त्यांचा हात चाटत बसतात.
याविषयी अनुपमा राव म्हणतात, या बेटाचे आणि माझे अगदी रक्ताचे नाते आहे.. या बेटावर आता ही मोजकी हरणं, काही प्राणी, पक्षी यापलीकडे फारसं कोणी राहत नाही.. इथे आता मानवी वस्ती उरलेली नाही.. उरलेले आहेत ते ब्रिटिश काळातील काही अवशेष..
मधल्या काळात आलेल्या त्सुनामीच्या संकटाने तर इथे पार होत्याच नव्हतं करून टाकलंय.. दोनशे दोनशे फुटांच्या लाटा या काळात या बेटाने झेलल्या आहेत..
त्सुनामी संकटात वाचलो कसे हे सांगताना अनुपमा राव म्हणतात, ”त्सुनामीचं संकट येणार हे प्रगत म्हटल्या जाणाऱ्या माणसाला आधी कळलं नाही. पण प्राणी आणि पक्षांना ते सर्वात आधी कळलं. त्यापासून वाचायचं कसं हे सुद्धा त्यांनाच समजतं. हे संकट येणार हे हरणांना आठ दिवसापासूनच माहीत होतं. पक्ष्यांना तर एक महिना अगोदरपासूनच याची जाणीव झालेली होती. त्यांनी आपले तळ त्यापूर्वीपासूनच बदलायला सुरुवात केली होती. त्या काळात आमचाही जीव मोरांनी वाचवला. आम्हाला सुरक्षित ठिकाणी हे मोरच घेऊन गेले!!…”
या हरणांशी त्यांचं नातं इतकं जिवाभावाचं कसं जुळलं असं त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “पूर्वी या हरणांची शिकार केली जात असे. त्यावेळी अनेक जखमी हरणांना मी उचलून वाचवलं आहे. या बेटावर पूर्वी जेमतेम वीस पंचवीस हरणं होती. आता ती संख्या 150 च्या वर गेलेली आहे. मला वेगळं कुटुंब नाही. मी इथेच रमते. मला सरकारने इथेच एक खोली दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत इथे राहते.”
या बेटाचा सगळा इतिहास या आजीबाईंना मुखोद्गत आहे. वयोमानाप्रमाणे आता त्या जरा थकल्या आहेत. पण तिथली प्रत्येक पडलेली वास्तू जणू त्यांच्याशी बोलत असावी अशा पद्धतीने उत्साहाने त्या प्रत्येक गोष्टीची माहिती देतात. त्याकाळची ब्रिटिशांची बेकरी, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, बांधकामातील वैशिष्ट्ये असं कितीतरी काय काय सांगत असताना त्यांच्या हाताशी लडिवाळपणे हरणं येऊन थांबलेली असतात.. त्या हरणांचा मुका घेत मधूनच त्या हरणाशीही बोलत असतात. त्यांनी चल म्हटलं की आज्ञाधारकपणे सगळं हरणांचा कळप त्यांच्या मागे चालू लागतो.. एकाच ठिकाणी गर्दी केली की ‘तुमचं आता ढुंगण सुजवते’ असं स्थानिक भाषेत म्हणत आजीबाई काठी घेऊन बाहेर पडते तेव्हा ती सगळी हरण पुन्हा शहाण्या मुलांसारखी बाहेर जाऊन उभी राहतात.
हे सगळं पाहणं, अनुभवणं अद्भुतच. कृत्रिम गॅजेट्स, आणि डिजिटल युगामध्ये अडकून पडलेल्या आपल्यासाठी हे सगळं नवीन असतं आणि एक वेगळाच आनंद देऊन जातं.
अंदमान नितांत सुंदर आहेच. पण इथे आल्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस आयलँडवरती आवर्जून जायला हवं आणि अनुपमा राव यांना भेटून त्यांच्या सोबतीने, हरणांना आणि मोरांना आपल्यासोबत घेऊन हे बेट फिरण्याचा आनंद एकदा तरी लुटायला हवा.
अशा या अफलातून व्यक्तिमत्व असलेल्या अनुपमा राव यांना मनापासून सलाम!!