स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी मुंबईहून
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्यातर्फे दर्जेदार दिवाळी अंकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील मनोरंजनकार मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – नवलाई डोंबिवलीकर,निसर्गोत्सव कोल्हापूर सकाळ, संस्कार भक्तिधारा, कालनिर्णय, कोकणसाद, शब्दशिवार, सृजनदीप, पुढारी दीपस्तंभ, चांगुलपणाची चळवळ, नवाकाळ, मीडिया वॉच, उद्याचा मराठवाडा, नवभारत, कलासागर, द इनसाईट या उत्कृष्ट दिवाळी अंकांचा विविध पुरस्कार देऊन सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी असा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने संकल्प केला आहे, अभिजात सोबतच ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय ) व्यवहारात मराठी अधिक उपयोगात आणण्यासाठी, त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे मत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगार नेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते.
मराठी भाषा व्यवहाराविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “आज याठिकाणी भानुदास साटम यांनी एआय तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त यावर व्याख्यान दिले. परंतु काही विषय या तंत्रज्ञानाला मांडताच येणार नाहीत. एखादी प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन केलेले रिपोर्ताज एआय कसे तयार करणार? संत तुकारामांच्या विषयी जगभरातील जवळ-जवळ सर्व भाषांमधून लिहिले गेले आहे त्यामुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेची ओळख अथवा माहिती जगभर व्हावी असे वाटत असेल तर त्यासंबंधीचा मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा. आज व्यक्त होण्याची अनेक साधने निर्माण झाली आहेत. यापुढे आवश्यक तो इतर भाषेतून मराठीतून संवाद साधला तरच आपण काय म्हणतो आहोत हे इतरांना कळेल. म्हणजेच आपल्याला यापुढे मुलांच्या भाषेत बोलावे लागणार आहे. पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही दैनिकातील संपादकीय पानावरील एक कोपरा व्यक्त होण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हक्काचा आहे. त्या मंडळींची ही संस्था आहे, या संस्थेत आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेले आहेत. मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो.”
बालसाहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड म्हणाले की, “पुस्तके माणूस जोडण्याचे काम करतात, म्हणूनच आपण पुस्तकांना आपले मित्र म्हणतो. लेखकांची आणि पुस्तकांची ताकद मोठी असून दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. पुस्तकांशी मैत्री करा, स्वप्नं बघा, परंतु त्यासोबत एखादी कलाही जोपासा.कलेमुळे जीवनाचा खरा आनंद तुम्हाला मिळेल. वाचनाचा छंद तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवेल.”
ज्येष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि सरकारचे मराठी भाषेविषयीचे धोरण याची अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या भाषणात केली. रवींद्र मालुसरे यांनी अभिजात मराठी भाषा उपक्रमाचे स्वरूप आणि संस्थेच्या कार्याची ओळख करून देत प्रास्ताविक केले. उपस्थितीचे स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, सूत्रसंचालन कार्यवाह नितीन कदम, राजन देसाई यांनी तर आभार प्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय कदम, मनोहर साळवी, सुनील कुवरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आबास आतार, अरुण खटावकर, दिलीप सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. वाचन चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते दादर सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष दिवंगत दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ‘ग्रंथ सखा पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येतो. यावर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाला तो प्रदान करण्यात आला.
आनंदतरंग उत्कृष्ट दिवाळी अंक
संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत आनंदतरंग या अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार शब्दसारथीचे संपादक पराग पोतदार यांनी स्वीकारला.