* मराठी भाषा यावी म्हणून अनिवासी भारतीय आई-वडिलांची धडपड.
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे सांगलीहून
शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालतात. मात्र, परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचे पाऊल कुणी उचलत नाहीत. त्यातच एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावे म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आई-वडिलांनी असेच एक पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये दाखल केले आहे.
विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघेही सध्या न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झाले होते. मात्र, मराठी भाषेशी त्याचे नाते घट्ट तयार व्हावे, मातीत रुजलेली मूल्ये आत्मसात व्हावीत, या उद्देशाने पालकांनी विहानचे शिक्षण काही काळासाठी भारतातच, तेही मराठी माध्यमातून करायचे असा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे विहानला त्याचे मामा डॉ. उमेश बालटे यांच्या गावी, म्हणजेच आटपाडीत आणण्यात आले. सांगोला हे शेळके कुटुंबाचे मूळ गाव असले तरी आजोळ आटपाडी असल्याने जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची निवड त्याच्यासाठी करण्यात आली. आपल्या मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात.
आटपाडी जिल्हा परिषद या आमच्या शाळेत विहानच्या आई आणि वडिलांनी विहानला शाळेत घातले आहे. हे कौतुकास्पद आहे. आमच्या शाळेत विहान च्या मामाची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्याची तयारी आणि शिक्षण पाहून पालकांनी हा निर्णय घेतला आहे. असे शिक्षक सांगतात.
जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक…
विहान विजयकुमार शेळके या विद्यार्थ्याने आमच्या मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे, त्याचे व त्याच्या आई-वडिलांचे कौतुक आहे. विहानचे स्वागत आहे असे सांगली जिल्हा परिषद मुख्याधिकारी तृप्ती धोडमसे यांनी म्हंटले आहे. त्याचे आई-वडील हे अमेरिकेमध्ये निवारण येथे सेटल झालेले आहेत परंतु मातृभाषा मुलाची कायम राहावी आणि मुलाला मात्र तसेच अनेक ज्ञान असावं या हेतूने त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेवरती त्यांनी विश्वास दाखवला असून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि एक नाळ जोडायचं काम जे आपल्या मराठी शाळा करतात यावर देखील त्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करू. एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांवरचा विश्वास वाढण्यासाठी हे उदाहरण नक्कीच मदत करेल.
वाह…..
अनुकरणीय