नियोजनबद्ध प्रगतीमुळे भारत बनला जगातील चौथी अर्थव्यवस्था
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून
भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक कामगिरी करत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. नियोजनबद्ध रीतीने केलेली प्रगती आणि सुधारित आर्थिक धोरणांमुळे भारताच्या पदरात हे यश पडले आहे. मात्र इथेच न थांबता जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरू झाली आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले, “आज भारत 4 ट्रिलियन डाॅलर्सची अर्थव्यवस्था बनला आहे.
भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कसा बनला हे समजण्यासाठी आर्थिक, राजकीय, तांत्रिक आणि सामाजिक घटकांचा विचार केला गेला.
* सुधारित आर्थिक धोरणे
1991 ची आर्थिक उदारीकरण धोरणे: भारताने 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारले. यामुळे परदेशी गुंतवणूक वाढली आणि खासगी क्षेत्राला चालना मिळाली.
जीएसटी आणि इतर सुधारणा: वस्तू आणि सेवा कर (GST), दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, डिजिटल पेमेंट्स मधील सुधारणा आदी पावले उचलल्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनले.
* तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्रांती
भारताने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. खासकरून बंगलोर, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये आयटी हब प्रस्थापित झाले.
भारत आजच्या घडीला जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टम्सपैकी एक बनलेला आहे.
* उद्योग व सेवा क्षेत्राची वाढ
सेवा क्षेत्र (विशेषतः आयटी, बँकिंग, वित्तीय सेवा) भारताच्या जीडीपीचा मोठा भाग आहे. औद्योगिक उत्पादनातही (विशेषतः औषधनिर्मिती, ऑटोमोबाइल्स, स्टील) वाढ झाली आहे. उद्योग क्षेत्रात केलेली लक्षणीय प्रगती देशाच्या विकासाला मोठा हातभार लावण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे.
* विदेशी गुंतवणूक
भारत सरकारने परदेशी गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे खुली केली. यामुळे परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू लागल्या, रोजगार निर्माण झाला आणि देशाचा जीडीपी वाढला.
* सरकारी योजना आणि मिशन्स
“मेक इन इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “डिजिटल इंडिया”, पीएम गती शक्ती अशा योजनांमुळे देशांतर्गत उत्पादकता, व्यवसाय सुलभता आणि पायाभूत सुविधा सुधारली.
* निर्यात आणि व्यापार
फार्मास्युटिकल्स, माहिती तंत्रज्ञान सेवा, वस्त्र उद्योग आदी क्षेत्रांमध्ये भारताची निर्यात वाढली आहे, ज्यामुळे परकीय चलन साठा व GDP वाढला. भारत आज चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. यामागे दिर्घकालीन धोरणात्मक निर्णय, लोकशक्ती, आणि तांत्रिक प्रगती ही मुख्य कारणे आहेत. आर्थिक विकास अजूनही चालू आहे.
आता लक्ष्य तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे…
भारताचे पुढील लक्ष्य जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे आहे. सुब्रह्मण्यम यांच्या मते, यासाठी सातत्यपूर्ण धोरणे आणि नियोजन आवश्यक आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ सारख्या उपक्रमांनी देशाला या दिशेने पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याशिवाय, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्टार्टअप इकोसिस्टममधील प्रगती भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आणखी उंचीवर नेण्यास सक्षम आहे.
अभिमानास्पद