* राज्य सरकारनं केला मोठा करार
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे गडचिरोलीहून
राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. पण, या जिल्ह्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. गडचिरोलीमध्ये नवे उद्योग सुरु व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात असून नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे मायनिंगचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे एखाद्या राज्य विद्यापीठाशी थेट सहकार्य होणे हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. गेल्या आठवड्याभरात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या नामवंत विद्यापीठासमवेत आपण सामंजस्य करार करत आहोत. नुकत्याच पार पडलेल्या वेव्ह्ज 2025 मध्ये, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासमवेत नवी मुंबई येथे त्यांच्या कॅम्पसच्या स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे कारण आपण जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय दुर्लक्षित राहिलेल्या भागात, म्हणजेच गडचिरोली येथे घेऊन जात आहोत. मागास जिल्हा म्हणून ओळखला गेलेला गडचिरोली आज महाराष्ट्रातील सर्वात वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनला आहे. लॉइड्स कंपनीच्या पुढाकारामुळे गडचिरोली हे खाण व पोलाद उद्योगात भारताचे ‘स्टील हब’ म्हणून उदयास येत आहे. या विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक आहे. गोंडवाना विद्यापीठाने केवळ 12 वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कर्टीन विद्यापीठासमवेत हा नव्याने झालेला करार संशोधन, कौशल्यविकास आणि औद्योगिक गरजांसोबत शिक्षणाची जोड मजबूत करेल आणि त्यामुळे गडचिरोलीसह संपूर्ण भारताच्या खाण आणि धातुशास्त्र क्षेत्राला बळकटी मिळेल.
कसं असेल विद्यापीठ?
या जागतिक दर्जाच्या कॅम्पसचा उद्देश किमान 12 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना येथे स्थापित करण्याचा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय यांसारख्या संस्थांनी आधीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एज्यु सिटी हे 80,000 ते 1,00,000 विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.