अभिमानास्पद! आग्रा येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे आग्राहून
औरंगजेबाच्या दरबारात त्याच्यासमोर बाणेदारपणे उभे राहून त्याला खडे बोल सुनावून महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आणि त्याच्या हातावर तुरी देऊन पुन्हा स्वराज्यात परतून दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आता थेट आग्रा येथे उभारण्यात येणार आहे. साडेतीनशे वर्षानंतरदेखील ही प्रेरणेची धगधगती मशाल अवघ्या देशाला आता स्वराज्याभिमानाची प्रेरणा देणार आहे.
आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक देशवासियाला प्रेरणा देणारे हे स्मारक असेल असा प्रयत्न शासन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे असताना ज्या ठिकाणी औरंगजेबाच्या नजरकैद होते, ती जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार आहे. आग्रा येथे शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय देखील महाराष्ट्र सरकारकडून उभारले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून आर्थिक तरदूत करण्यात येणार आहे.
राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या पुरस्काराची घोषणा केली. राम सुतार यांचे वय 100 वर्षे आहे. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात. हुबेहुब, जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील भाव इतके सूक्ष्म आणि बोलके असतात की पाहणाऱ्याला त्यातून काहीतरी संदेश हमखास मिळतो.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे ते त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. त्यांनी देशभरात अनेक शिल्प उभारली आहेत. राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर पुतळा उभारला आहे. गुजरात राज्यातील केवडिया येथे हा पुतळा दिमाखात उभा आहे. देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांची शिल्प साकारली आहेत. भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक आहे. त्यांच्या कलाकृतीमध्ये मुख्यत: इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो.
बिल गेट्स भारतातील युपीआय प्रणालीच्या प्रेमात
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून
मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील Unified Payment Interface (UPI) प्रणालीचे कौतुक केले आहे. हे खास तंत्रज्ञान गेम चेंजर ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
बिल गेट्स पुढे म्हणाले, “भारतातील यूपीआयची प्रणाली मला फारच आवडली आहे. मला खात्री आहे हे गेमचेंजर आहे आणि जगाला सहकार्य करणारी प्रणाली ठरु शकते. जगभरात मी एकापेक्षा एक सरस भारतीयांना भेटलो आहे. तरीही अनेक लोक असेही आहेत ज्यांना या देशाबाबत फारशी माहिती नाही. त्यांनी भारतात आले पाहिजे आणि शिकले पाहिजे. असे घडल्यास ते अनेक महत्वाच्या गोष्टी शिकू शकतील”
भारताबाबत काय म्हणाले बिल गेट्स?
जागतिक स्तरावर भारत हा विकसनशील देश आहे. २०४७ पर्यंत भारत जी प्रगती साधेल ती एकट्या भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारतात लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडते, तसेच येथील सरकार लोकांच्या प्राथमिकता ओळखून काम करते आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासाठी सर्वाधिक निधी खर्च करण्यात येतो आहे. ही चांगली बाब आहे असे मला मनापासून वाटते असेही बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
बिल गेट्स हे मागील तीन वर्षांत तिसऱ्यांदा भारताच्या दौऱ्यावर आहेत. बिल गेट्स यांनी एआय बाबतही भाष्य केले. हेल्थकेअर अर्थात आरोग्यविषयक क्षेत्रात एआय ची मदत महत्त्वाची ठरेल असे मत बिल गेट्स यांनी व्यक्त केले. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्गम भागातील रुग्णांना एआयच्या मदतीने सहकार्य करता येईल असे गेट्स यांनी म्हटले आहे.