सुपरसक्सेस स्टोरी! कुंभमेळ्यात बोट चालवून कुटुंबाने कमावले 30 कोटी!
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे उत्तरप्रदेशातून…
प्रयागराजमध्ये हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक पर्वाची अर्थात महाकुंभमेळ्याची नुकतीच सांगता झाली. या ४५ दिवसांच्या काळात त्रिवेणी संगमावर बोटीतून भाविकांना एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर नेण्याची व्यवस्था करणाऱ्या एका नाविक कुटुंबाने तब्बल ३० कोटी रुपये कमावले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिवेशनादरम्यान स्वतः ही माहिती दिली. या नाविक कुटुंबाचे नाव त्यांनी जाहीर केले नाही. परंतु या विषयी माहिती देताना ते म्हणाले, मी तुम्हाला कुंभमेळ्यातील एका नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी सांगतो आहे. या नाविक कुटुंबाकडे १३० होड्या होत्या. ४५ दिवसांच्या काळात या कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले आहेत. अर्थात एका होडीने या ४५ दिवसांत २३ लाख रुपये कमावून दिले आहेत.
या पवित्र महाकुंभ मेळ्याची सुरुवात १३ जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी झाली होती. तर शेवट २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीला झाला. महाशिवरात्रीच्या अखेरच्या दिवशी पहाटे ६ वाजल्यापासून भाविकांनी पवित्र स्नानाला सुरुवात केली, दिवस संपेपर्यंत ४० लाख भाविकांनी प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमावर स्नान केले. या महासोहळ्यात खरेतर गेल्या ४५ दिवसांमध्ये एकूण ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला. भारतासह परदेशातूनही हिंदू भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. त्यामुळे जगातील हा सर्वाधिक मोठा इव्हेंट ठरला.
या काळात स्थानिक नागरिकांनी जे जे व्यवसाय केले त्यामध्ये त्यांना आजवरच्या आयुष्यात झालेला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर नफा झालेला आहे. त्यामुळेच महाकुंभमेळा हा देखील अशा स्थानिकांसाठी पर्वणी ठरला आहे.
हिरोची वाडी!…. ‘इरफान’साठी गावाने बदलले स्वतःचे नाव!
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी);-
आजची चांगली बातमी आहे नाशिकहून
नाशिकमधील एका छोट्याशा गावाने ‘इरफान खान’ची आठवण अबाधित राहावी याकरता मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून या गावाने चक्क आधीचे नाव बदलून ‘हिरोची वाडी’ असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इगतपुरी तालुक्यात त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी इरफान खानचे एक फार्महाऊस आहे. इगतपुरी तालुका तसा निसर्गाने नटलेला तालुका आहे. इरफानचे फार्महाऊस देखील याठिकाणी दिमाखात उभे आहे. या गावकऱ्यांनी गावाला इरफानचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. इरफान ‘देवमाणूस’ होता असे देखील इथले गावकरी मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यामुळे आता या गावाचे नाव ‘हिरोची वाडी’ असे करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. केवळ इरफान खानप्रती असणाऱ्या प्रेमाखातर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
या ठिकाणच्या पत्र्याच्या पाडा जिल्हा परिषद शाळेसाठी देखील इरफान मदत करायचा. तिथल्या मुलांशी संवाद साधायचा. अमेरिकेत उपचार घेत असताना देखील इरफानने हे संबंध जपले होते. त्याने त्याच्या नातेवाईंकाच्या मदतीने पत्र्याचा पाडा शाळेसाठी मदत पाठवली होती. तर या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देखील इरफानच्या हस्ते मिळाला होता. इरफानच्या तशा अनेक आठवणी प्रत्येकजण जपण्याचा प्रयत्न करत आहे. इगतपुरी जवळील या गावाचे विशेष कौतुक होत आहे.
जुन्नरच्या शेतकऱ्याने शोधली नवीन आंब्याची जात
बाजारात दाखल होणार ‘जुन्नर गोल्ड’
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे जुन्नरहून
जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भरत जाधव यांच्या आंब्याच्या बागेत आगळीवेगळी दोन आंब्याची झाडे आढळून आली आहेत. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत या झाडावर संशोधन करून भरत जाधव यांनी नव्या जातीचा आंबा संशोधित केला आहे. या वाणाला ‘जुन्नर गोल्ड’ असे नामकरण करून शेतकरी पीक जाती संरक्षण कायद्यांतर्गत या वाणाच्या पेटंट नोंदणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
जर या वाणाला पेटंट मिळाले तर शिवनेरी हापूसनंतर जुन्नर तालुक्यातील ‘जुन्नर गोल्ड’ आंबा प्रसिद्ध होणार आहे. नामांतरित ‘जुन्नर गोल्ड’ हा वाण राजापुरी वाणासारखा दिसणारा आहे. त्याचे वजन ८०० ते १००० ग्रॅम आहे. कोयीचे वजन ४० ते ५० ग्रॅम आहे. या आंब्याला हापूस केसर आणि राजापुरी वाणमिश्रित स्वाद आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी सन २०२४ रोजी भरत जाधव यांच्या आंबा बागेस भेट दिली. त्यावेळी शिरसाठ यांना जाधव यांच्या बागेत नवीन पद्धतीचा विकसित झालेला आंब्याचा नवा वाण पाहावयास मिळाला. यानंतर वैशिष्ट्यपूर्ण वाणाची पाहणी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर व अन्य काही अधिकारी यांनी केली.
तज्ज्ञ भरत टेमकर व पीकसंरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी बागेतील दोन्ही झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून जाधव यांच्या नावाने नवी दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अॅड फार्मर्स राइट्स ऑथॉरिटी कडे पेटंटसाठी प्रस्ताव पाठविला. दिल्ली येथून लखनौ विद्यापीठ येथे हा प्रस्ताव तपासणीसाठी पाठविला आहे. सध्या ही झाडे कणी अवस्थेत असल्याने काही दिवसांतच लखनौमधील टीम झाडे पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली.