भारताच्या गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधूमध्ये ६,३०० डॉल्फिन
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे नवी दिल्लीहून
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नद्यांच्या संस्थांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त डॉल्फिन असल्याचे सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉल्फिन प्रकल्पअंतर्गत भारतामध्ये पहिल्यांदाच नद्यांमधील डॉल्फिनची गणना करण्यात आली असून हे जगातील अशा प्रकारच्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणांपैकी आहे. डॉल्फिन आणि अन्य जलप्रजातींचे संवर्धन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी या प्रकल्पाची घोषणा केली होती.
भारतात मुख्यत: गंगा नदीतील डॉल्फिन आणि सिंधू नदीतील डॉल्फिन आढळतात. हे दोन्ही डॉल्फिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी गंगा नदीच्या डॉल्फिनची संख्या जास्त आहे. आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाणारे हे डॉल्फिन गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना या नद्यांच्या संस्था आणि त्यांच्या भारत, बांगलादेश, नेपाळ व भूतानमधील उपनद्यांमध्ये आढळतात. भारतामध्ये सिंधू नदी लहानशा प्रदेशातून वाहते, त्यामुळे सिंधू डॉल्फिनची संख्याही कमी आहे.
सर्वेक्षणात गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांच्या संपूर्ण प्रवाहाचा अभ्यास करण्यात आला. गंगा नदीच्या डॉल्फिनची संख्या ६,३२४ (५,९७७ ते ६,६८८ या श्रेणीत) इतकी आहे. तर बियास नदीमध्ये सिंधू प्रकारचे तीन डॉल्फिन आढळले.
सर्वेक्षणाची व्याप्ती
डॉल्फिन प्रकल्पअंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब या आठ राज्यांमधून वाहणाऱ्या या नद्यांमधील डॉल्फिनची संख्या मोजण्यात आली. त्यामध्ये आठ हजार किलोमीटरपेक्षा जास्त जलप्रदेशाची पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये ५८ नद्यांचे मूल्यांकन करण्यात आले.
——————-
पिंपरी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात ‘एआय’चा वापर
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पिंपरीहून
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@ ५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत व्हिजन@ ५० उपक्रमाबद्दल चर्चेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, आजचे जग वेगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा सुविधांमध्ये परिवर्तीत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर सर्व स्तरावर केला जात आहे. अशावेळी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातही ‘एआय’तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, ‘शहराची संस्कृती जपत कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्रात शहराचा सर्वार्थाने विकास साधण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असताना शहरातील सर्व घटकांचे मत विचारात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने चर्चासत्रे आणि संवादसत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे प्राप्त सूचना आणि माहितीचा एकत्रित अंतर्भाव करून महापालिका स्वतंत्र आराखडा तयार करणार आहे. शासन तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील यामध्ये अंतर्भाव असणार आहे. त्यानुसार आवश्यक धोरणे आखून त्याप्रमाणे नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका कार्यवाही करणार आहे. त्यातून नव्याने विविध उपक्रम आणि योजना विकसित केल्या जाणार आहेत’.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.
—————–
भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन मार्च २०३१ मध्ये धावणार
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे चेन्नईहून
भारतात पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार आहे. सध्या डिझेल वापरानंतर इलेक्ट्रिककडे वळलेली भारतीय रेल्वे आता पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ही हायड्रोजन ट्रेन मार्च २०३१ मध्ये भारतामध्ये धावण्याची शक्यता आहे.
२८०० कोटी रुपये निधी मंजूर
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केली जात आहे. हायड्रोजन इंधन ट्रेनचे अनेक फायदे मिळणार आहेत. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी वापरून शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रेल्वे मंत्रालयाने ३५ हायड्रोजन फ्युअल सेल आधारित रेल्वे विकसित करण्यासाठी २८०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सेट या (मार्च) महिन्यात तयार होणे अपेक्षित आहे.
याविषयी आसीईचे जनरल मॅनेजर यू. सुब्बाराव म्हणाले होते की, “आम्ही प्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून हायड्रोन प्युअल सेल ट्रेन सेटवर काम करत आहोत. हायड्रोजन फ्युअल सेल कोच निर्मितीचे काम आसीएफ येथे सुरू आहे. मार्च २०२५ मध्ये हा ट्रेन सेट तयार होणे अपेक्षित आहे.”
भारताची मोठी भरारी
भारताने अलिकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते ६०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन तयार केल्या आहेत, तर भारताने १,२०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेचे इंजिन तयार करून मोठे यश मिळवले आहे.
पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे धावणार?
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाला देण्यात आली आहे. तसेच ही रेल्वे ८९ किमी लांबीच्या जिंद-सोनीपत विभागात धावण्याची शक्यता आहे.