स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी हुपरीहून
कोल्हापूरपासून साधारण 25 किलोमीटरवर असलेला हुपरी परिसर ‘चांदीचे गाव’ किंवा ‘रजत नगरी’ म्हणून ओळखले जाते. आज या गावातल्या घराघरात चांदीशी निगडित काम करणारे कारागीर आहेत. आज जारी हे रुप दिसत असले, तरी या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागे मोठा इतिहास आहे. या गावातल्या चांदीच्या दागिन्यांना आणि गावाला जी. आय. मानांकन मिळाले आहे.
हुपरीचा इतिहास
इथल्या चांदी कारखानदार असोसिएशनने नोंदवलेल्या इतिहासानुसार, इसवी सन 1300 पासून या व्यवसायाला सुरुवात झाली. तेव्हाचे देवगीरीचे राजे श्री रामचंद्रराव यादव याच काळात कर्नाटकातील विजापूरहून महाराष्ट्रतील कोकण भगत व्यापारासाठी जायचे. तेव्हा प्रवासादरम्यान विसावा म्हणून हुपरीत त्यांचा मुक्काम असायचा.
त्या काळात इथले कारागीर हत्ती-घोडे यांना घालण्यासाठी दागिने तयार करत असत. त्यानंतर इसवी सन 1800 मध्ये निपाणीकर देसाई यांनी हल्ला करुन हुपरी गाव किल्ल्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींनी हे गाव काबीज केले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थान काळापासून इथे बदल होत गेले.
या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. इथला इतिहास सांगताना चांदीचे व्यापारी सतीश भोजे म्हणाले,”छत्रपती शाहू महाराज फिरण्यासाठी आणि शिकारीसाठी हुपरीत यायचे. ते तिथे असताना त्यांच्या घोड्याचा दागिना खराब झाला. त्यावेळी हुपरीत स्थायिक असलेल्या कृष्णाजी पोतदारांनी त्याची दुरुस्ती करुन दिली. तेव्हापासूनच व्यवसाय म्हणून याकडे पाहायला सुरुवात झाली.”
आज गावातील प्रत्येक जण या व्यवसायाकडे वळला आहे.
गाव ते पंचक्रोशी प्रवास
हुपरीतले लोक दागिने घडवायला लागले आणि व्यापाऱ्यांच्या, कारागीरांच्या हाताखाली काम करत आधी कारागीर आणि मग व्यापारी असा प्रवास सुरू झाला.
हुपरीत तयार केलेले दागिने त्यावरील हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे एकाच प्रकारचे काम पिढ्यानपिढ्या करणारी कुटुंबे आहेत. यातूनच ‘आजचा कारागीर उद्याचा व्यावसायिक’ या धोरणातून हे गाव घडत गेलं आणि चांदीचा व्यवसाय बहरत गेला.
चांदी घडवण्याच्या प्रक्रियेत चांदीची आटणी काढणे, चांदीची टक्केवारी म्हणजे टंच तपासणे, मशिन प्रेस, डिझाईन, कटिंग, डायमेकर, सूत पास्टा बनविणे, साखळी जोडकाम करणे असे टप्पे आहेत. गावात चांदीची टक्केवारी काढणारी वेगळी दुकाने, डायमेकरची वेगळी दुकाने आहेत. यातूनच हुपरीसोबतच पंचक्रोशीत म्हणजे पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, यळगूड, रेंदाळ, रणदेवीवाडी, सांगाव, कागल, इचलकरंजी यासोबतच कर्नाटक सीमेलगत असणारी मांगूर, बारवाड, कुन्नूर, ढोणेवाडी, कारदगा अशा अनेक गावांमध्ये चांदी हस्तकला उद्योग पोहोचला आहे.
तंत्रज्ञानाने प्रगती केली तशी हस्तकला मागे पडत त्याची जागा मशीनने घेतली. पण गावात अजूनही अनेक घरांमधून, दुकानांमधून ही कामे चालतात. सध्या या सगळ्या परिसरात एकूण चांदी हस्तकला उद्योजकांची संख्या अंदाजे 10 हजार असून हस्तकला कारागिरांची संख्या अंदाजे 35 हजार आहे.
पुढील काळात व्यापाऱ्यांकडून आलेल्या चांदीची जोडणी करुन देण्यासाठी महिलांचा सहभाग दिसायला लागला. यासाठी सुद्धा एक व्यवस्था निर्माण करण्यात आली.
व्यापारी कामनुरूप लागणारी चांदी महिलांकडे पोहोचवतात. मग वेळ मिळेल तसे ते काम पूर्ण करून महिला ते पुन्हा व्यापाऱ्यांकडे सोपवतात. व्यापाऱ्यांकडून आलेल्या चांदीची जोडणी करुन देण्याच्या या कामाला या भागात ‘भरणी’ म्हणून ओळखले जाते. हुपरी आणि परिसरातल्या घराघरातून बायका हे काम करतात. दररोजच्या तीन-चार तासांचे साधारण महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये या महिलांच्या हाती पडतात. चांदीचं गाव किंवा रजत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीतलं हे घरोघरीचं दृश्य आहे.
या कामाविषयी बोलताना हुपरीच्या रहिवासी मनिषा घोरपडे म्हणाल्या, ” घरातले काम आवरून चार-पाच तास जसा वेळ मिळेल तसे आम्ही हे काम करतो. कच्च्या मालापासून पैंजण-जोडवी असे वेगवेगळे डिझाईन आम्ही तयार करतो. या मालाचे प्रोडक्ट तयार करुन आम्हा बायकांना भरणी भरायला देतात.”
काही घरांमध्ये मात्र संपूर्ण सेट अप उभारण्यात आला आहे. व्यापाऱ्यांचे संपूर्ण काम तिथूनच चालते. यासाठी कुशल कारागीर त्यांच्या घरी जाऊन हे काम करतात. काही व्यापारी आता मशीनचा वापर करत असले, तरी या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हस्तकलेने घडणारे चांदीचे दागिने. यात मात्र दागिना तयार होण्यासाठी विविध ठिकाणी जातो.
इथले रुपाली, सोन्या आणि गजश्री या प्रकारातले पैंजण प्रसिद्ध आहेत. गावात आता पैंजण, जोडवी, करदोडे, बिंदली, मासोळ्या, बाजूपट्टा, ब्रेसलेट, भांडी यापासून ते अगदी घागरी, शोपीस, कळस इतकंच काय तर चांदीचे नक्षीकाम केलेले सुबक दरवाजेही घडवायला सुरुवात झाली आहे. परंतु ‘पैंजण’ हे त्याचं वैशिष्ट्य मात्र कायम आहेत.
याशिवाय आता काळाप्रमाणे मँगो पायल वगैरे नवनवीन प्रकारचे पैंजणही गावात घडवले जातात.