स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
संयुक्त राष्ट्रसंघाचा ग्लोबल यूथ एज्युकेशन अम्बॅसेडर म्हणून निवड झालेली, महाराष्ट्र राज्याचा आणि भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळवलेली आणि ब्रिटन सरकारची प्रतिष्ठेची चिवनिंग स्कॉलरशिप कमावलेली मुलगी म्हणजे दीक्षा दिंडे.
तिचा प्रेरणादायी प्रवास….
वडील रिक्षा तर आई टेलरिंग काम करणाऱ्या कात्रजच्या सोनावणे चाळीतील घरात एक बाळ- मुलगी जन्माला आली. दीक्षा दिंडे हे तिचे नाव. आपली लेक वर्ष दीड वर्षाची झाली तरी रांगतच नाही, पावलं टाकणं तर लांबच! पण हे त्या कुटुंबाच्या लक्षात यायला थोडासा वेळ लागला. लक्षात आल्यावर मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला. या बाळाला सेरेब्रल पल्सी हा रोग झाल्याचे निदान झाले.
84 टक्के अपंगत्व असणारी दीक्षा दिंडे कधीच चालू शकणार नव्हती. दीक्षाच्या आईने एकहाती तिची सगळी जबाबदारी पेलली. अगदी शाळेत उचलून नेण्यापासून ते तिला आत्मविश्वास देईपर्यंत . या लेकीनंही आई वडिलांच्या विश्वासाचं सोनं केलं. आज त्यांची लेक संयुक्त राष्ट्रसंघाचा ग्लोबल यूथ एज्युकेशन अम्बॅसेडर म्हणून निवड झालेली, महाराष्ट्र राज्याचा आणि भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळवलेली आणि ब्रिटन सरकारची प्रतिष्ठेची चिवनिंग स्कॉलरशिप कमावलेली मुलगी आहे.
खासगी प्रथितयश शाळांनी प्रवेश नाकारले
सोनावणे चाळ ते चिवनिंग स्कॉलरशिप हा प्रवास सोपा नव्हताच. पण दीक्षाची जिद्द, तिच्या आई वडिलांचा पाठिंबा यामुळे गोष्टी सुकर झाल्या.
याविषयी दीक्षा दिंडे सांगते, “माझ्या आई वडिलांची इच्छा होती मला चांगल्या प्रतिष्ठित शाळेत शिकवण्याची.पण कोणत्याच तथाकथित चांगल्या शाळेने प्रवेश न दिल्याने, शेवटी जिल्हा परिषदेच्या शाळेत मला प्रवेश मिळाला. अभ्यास तर मी उत्तम करतच होते, चांगले मार्क्सही मिळवायचे. पण सगळ्यांसारखं राहता येत नाही हा एक न्यूनगंड मनात कायम वस्तीला असायचा. इतर मुलं मधल्या सुट्टीत डबा खायला- खेळायला खाली मैदानावर जायची, सहलींना जायची मी वर्गात बसून एकटी रोज डबा खायचे, समर व्हेकेशन नावाची गोष्ट मला माहीत नव्हती. शाळा- कॉलेजात विकलांगांना सोयिस्कर होतील असे बाथरूम टॉयलेट नसायचे, मग कायम कमी पाणी प्या. बहुतांश ठिकाणी रॅम्प नसायचेच, व्हीलचेअर जाऊ शकायची नाही, अश्या सर्व ठिकाणी मी अक्षरश: 23-24 वर्षांची होईस्तोवर आई मला उचलून न्यायची. अक्षरश: लाज वाटायची, आईला आपण किती त्रास देतोय या विचारांनी त्रास व्हायचा. मग आपलं वजन वाढायला नको म्हणून मी अतिशय कमी खायचे. मनातून खूप बंडखोर असले तरी बाहेरच्यांच्या सहानुभूतीच्या आणि बहुतांश वेळेला चेष्टेच्या नजरा बघून जिणं नकोसं व्हायचं, काही वेळा आत्महत्येचे विचार सुद्धा मनात येऊन गेले आहेत. पण या सगळ्यात माझं प्रेम करणारं कुटुंब, अभ्यास, वाचन आणि चांगले मित्रमैत्रिणी यांनी मला तारलं.”
बिझनेस एडमिनिस्ट्रेशनची पदवी, इंग्रजीच्या न्यूनगंडावर मात
बिझनेस अडमिनिस्ट्रेशन विषयातून दीक्षा दिंडे हिने बीकॉम केलं, यूपीएससी करायचं होतं म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इतिहासातून एमए केलं. हे सगळं करताना इंग्रजीचा न्यूनगंड तिला होता. तो घालवण्यासाठी वाचन, लेखन, संवाद, उच्चार या सगळ्यावर तिने दररोज मेहनत घेतली.
दरम्यानच्या काळात आधी वडिलांचा अपघात झाला आणि नंतर तर 2016 साली वडील गेले. दीक्षा, तिची आई आणि बहीण यांच्यावर परत एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. पण शांत बसून राहील ती दीक्षा कसली? तिनं नेहरू युवा केंद्राशी जोडून घेतलं, पुण्यातल्या झेड ब्रीज खाली राहणाऱ्या भीक मागणाऱ्या, फुगे विकून गुजराण करणाऱ्या लहान मुलांसाठी दोन वर्षं खुली शाळा चालवली. पण एकट्या आईवर सगळाच भार पडायला नको, म्हणून अडव्हेंचर मंत्रा नावाच्या टुरिझम कंपनीत ऑफिस अडमिनिस्ट्रेटर म्हणून कामाला लागली. दरम्यानच्या काळात कोविडमुळे कंपनीच बंद पडली आणि नोकरी गेली. या काळात सामाजिक कामाच्या आवडीपायी विविध स्तरावर दीक्षाचे काम सुरू होते. कोविड काळात We Care नावाचा उपक्रमही तिने राहुल साळवे या विकलांग मित्रासह आणि इतर अनेक मित्र मैत्रिणींसह राबवला. ज्यात गरजूंना डबे, किराणा कीट, वैद्यकीय मदत, रक्तदानाविषयी जागृती असं वेगवेगळं काम ते करत होते. त्यातूनच दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये टीचर्स कॅपॅसिटी बिल्डींगसाठी ती काम करू लागली. त्यात शिक्षणाविषयीची जनजागृती, मासिक पाळीविषयीची जनजागृती या विषयावर दीक्षा काम करत होती.
मलेशियात 30 देशातील 300 प्रतिनिधींपैकी ‘बेस्ट डेलिगेट’
दरम्यानच्या 2017 साली दीक्षाचे काम बघून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘वर्ल्ड अट स्कूल’ या उपक्रमासाठी तिची वर्ल्ड यूथ एज्युकेशन अम्बेसेडर म्हणून निवड झाली. तिची ‘एशिया पॅसिफिक फ्युचर लीडर्स इनिशिएटिव्ह’ या मलेशियात क्वालांलपूर येथे होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी तिची निवड झाली होती. या परिषदेत सर्वसमावेशक शिक्षण या विषयावर दीक्षाने सादर केलेला पेपर खूप गाजला आणि 30 देशातून आलेल्या 300 प्रतिनिधींपैकी ‘बेस्ट डेलिगेट’ म्हणून दीक्षाची निवड झाली.
चिवनिंग स्कॉलरशिपकरता 68 हजार विद्यार्थ्यांमधून निवड
यानंतरही वेगवेगळ्या देश विदेशातील परिषदांमध्ये ती आपला अभ्यास मांडतेय. जात- धर्म, लिंग, आर्थिक स्तर, शारीरिक विकलांगता अश्या कशाचाच अडसर न येता सर्वांना सामावून घेणारं- सर्वसमावेशक शिक्षण मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे यावर दीक्षाचा ठाम विश्वास आहे. या विषयांतच काम करायचं असल्याने तिने परदेशी शिकायला जायचा निर्णय घेतला. असं वेगळं काही करू इच्छिणाऱ्या पण तेवढी आर्थिक ताकद नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिटीश सरकार चिवनिंग स्कॉलरशिप (Chevening Scholarship) देते , हे तिला समजलं. तिनं 2021 साली उत्तम प्रकारे फॉर्म भरला, कागदपत्रांची पूर्तता केली. मुलाखतीला ती आत्मविश्वासाने सामोरी गेली, त्यात तिला उत्कृष्ट लीडरशिपची दोन उदाहरणं द्या असं सांगण्यात आलं होतं, तेव्हा दीक्षाने दिलेलं उत्तर परीक्षकांना प्रभावित करून गेलं. ती म्हणाली, “एक म्हणजे सावित्रीबाई फुले- ज्यामुळे भारतातल्या सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची, स्वातंत्र्याची दारं खुली झाली आणि दुसरं म्हणजे माझी आई- जिनं माझी सगळी जबाबदारी घेत, घराची जबाबदारी पेलत आज मला इथवर आणून पोहोचवलंय, यापेक्षा उत्तम दिशा दाखवणारे नेतृत्त्व काय वेगळे असणार? या दोघींच्या प्रति मी मनापासून कृतज्ञ आहे.” जगभरातल्या 68 हजार विद्यार्थ्यांमधून दीक्षाला चिवनिंग स्कॉलरशिप मिळाली. Governance, Development and Public Policy मध्ये तिने Institute of Development Studies, University of Sussex, United Kingdom इथून एमए ची डिग्री घेतलेली आहे. या शिक्षणासाठी तिचा प्रवासखर्च, राहण्याचा, शिक्षणाचा खर्च आणि विद्यावेतन हे सर्व काही तिला ब्रिटीश सरकारकडून मिळालं आहे.
विकलांग व्यक्तीचा परदेशी शिक्षणाचा सुखद अनुभव
या परदेशातल्या शिक्षणाच्या अनुभवाबद्दल दीक्षा सांगते, “हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता. या कोर्समध्ये मी व्हीलचेअर वापरणारी तर दुसरा एक अंध विद्यार्थीही होता. त्यावेळी आमच्या युनिव्हर्सिटीकडून आम्हाला सांगण्यात आलं की, ‘या कोर्ससाठी पहिल्यांदाच असे विकलांग विद्यार्थी आमच्याकडे तुम्ही शिकायला आले आहात. आम्हांला कल्पना नाही तुम्हांला सामावून घेण्याकरिता आमचे विद्यापीठ कितपत सक्षम आहे, पण तुम्हांला काहीही अडचणी आल्यास हक्काने सांगा, कारण हा तुमचा प्रॉब्लेम नाही, आमचा प्रॉब्लेम आहे!’ हे वाक्य इतकं आश्वासक होतं की भारतात पदोपदी तुम्ही विकलांग आहात हा जणू काही तुमचा प्रॉब्लेम आहे, एकट्या विद्यार्थ्यासाठी रॅम्प असलेले बाथरूम बनवू शकणार नाही, एकट्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजचा वर्ग खालच्या मजल्यावर भरणार नाही हा जो उद्दामपणा असतो, या सगळ्यावरचा हा उतारा होता. कारण इथे प्रत्येकाची माणूस म्हणून किंमत केली जायची. मी स्वतंत्रपणे इंग्लंडमध्ये कुठेही फिरू शकायचे. कारण तशा सोयी सार्वजनिक ठिकाणी होत्या आणि त्या सोयी केवळ विकलांग नव्हे तर वृद्ध व्यक्ती, गर्भवती बायका आणि लहान मुलंही वापरायचे. महाराष्ट्रात बालेवाडी स्टेडियमला एक क्रिकेटची मॅच बघायला गेलेली असताना ‘लै हौस तुम्हा लोकांना फिरायची!!’ असा एका पोलिसाने मारलेला टोमणा ते इथं कोणीही- काहीही जज न करता स्वतंत्रपणे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य हे माझ्यासाठी 360 अंशातलं जग बदलणं होतं. शिवाय उत्कृष्ट शिक्षक, सेल्फ स्टडीजवर भर, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेले सहविद्यार्थी आणि मोलाचं ज्ञान यानं आयुष्य समृद्ध होत होतं.”
आपला देश सर्वांसाठी Accessible बनवण्याचे स्वप्न
याचदरम्यान आणखी एका गोष्टीनं दीक्षाचं आयुष्य समृद्ध होत होतं – ते म्हणजे तिचा जोडीदार अमोल सुतारचं तिच्या आयुष्यात येणं. इंग्लंडला जाण्याच्या केवळ एक महिना आधी 9 ऑगस्ट 2022 रोजी, ऑगस्ट क्रांतिदिनी अमोल आणि दीक्षा विवाहबद्ध झाले. ताबडतोब सप्टेंबर महिन्यात दीक्षाच्या शिक्षणासाठी दोघांनीही इंग्लंड गाठलं. बोचरी थंडी, नवा अभ्यासक्रम, वेगळंच आयुष्य, भावनिक चढउतार या सगळ्यात अमोलने बेटर हाफ बनत दीक्षाला उत्तम साथ दिली. अमोल ग्राफिक डिझायनर आहे आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगही करतो. भारतात परत आल्यानंतर Accessibility and Inclusiveness वर काम करणारी एक कंपनी दीक्षा सुरू करतेय. तसंच ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानमध्ये Capacity Building क्षेत्रासाठी प्रोग्राम लीड म्हणूनही काम करतेय. आपला देश सर्वांसाठी Accessible बनवण्याचे तिचे स्वप्न आहे.