स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
गिर्यारोहक लहू उघडे यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट पहिल्याच प्रयत्नात सर केले. सुरेंद्र शेळके या दिग्गज गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखाली व तीव्र ईच्छाशक्तीच्या बळावर लहू उघडे यांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि भगवा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जगातील सर्वोच्च शिखरावर नेऊन बालपणापासून उराशी बाळगलेले एक स्वप्न त्यांनी पूर्ण केले. कष्ट उपसण्याची तयारी असेल तर एव्हरेस्टही सर होऊ शकते हे त्यांनी यातून सिद्ध केले. एस.एल एडव्हेंचर आणि ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेने त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहकार्य केले. संस्थेचे रविंद्र चोभे, अक्षय भापकर, अमित सोनग्रा, आकाश पातकळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लहू उघडे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
लहूची आई सोनाबाई यांचे सिंहगडच्या पायवाटेला मध्यावर हॉटेल आहे. शनिवार- रविवारी सिंहगड पायथा आतकरवाडीतून अनेकजण व्यायामासाठी गडावर येतात. त्यांच्यासाठी लहू लिंबू- सरबतापासून पिठलं भाकरी विकायचे. आईला मदत करताना आणि शिक्षण घेताना त्यांची जगण्याची धडपड सुरु होती. जन्मापासून वडिलांचे छत्र नाही.
मोठा भाऊ मुंबईला कामाला आहे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने झालेली आहेत. त्यामुळे त्यांनी आईची जबाबदारी सांभाळत गडावर सरबत विकत खानापूरच्या शाळेत शिक्षण घेतले. दहावीनंतर आयटीआय केले. नोकरी न मिळाल्याने पाण्याचे जार वाहतूक करणाऱ्या गाडीवर हमाल म्हणून काम केले.
सिंहगड छत्रपती शिवरायांच्या काटक मावळ्यांची भूमी आहे. डोंगरदर्यात बालपण गेल्याने उपजतच सह्याद्रीतील कातळ कडे सर करण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान. गिर्यारोहण हा साहसी खेळ लहू उघडे यांना बालपणीपासूनच आकर्षित करत आला. हिमालय व सह्याद्रीतील अनेक शिखरे सर केल्यानंतर खुणावत होते ते जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट. पण या स्वप्नपूर्तीसाठी अनंत अडचणी पुढे उभ्या होत्या. शारीरिक तंदुरुस्ती व चढाईचा सराव व्हावा यासाठी दिवसातून दोन वेळा पाठीवर वीस किलो वजन घेऊन सिंहगड किल्ला चढायचा आणि उतरायचा
हा दिनक्रम गेली दोन वर्ष सुरु होता. सोबतच एकीकडे सह्याद्रीतील कातळ कडे, सुळके प्रस्तरारोहण करण्याचा सराव त्यामुळे शारीरिक व मानसिक तयारी जबरदस्त झाली. गिर्यारोहणातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणही त्यांनी जिद्दीने पूर्ण केले.
नेपाळ सरकारची फी, शेर्पा व इतर खर्च धरून एव्हरेस्ट मोहिमेसाठी साधारण ३०-३२ लाख रुपये खर्च येतो. एवढा मोठा निधी उभारायचा म्हणजे एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही कठीण काम होते. पण मनातील जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती.
समाजातील दानशूर लोकांकडे त्यांनी मदत मागायला सुरु केली. त्यातही अनंत अडचणी येत होत्या आणि अश्यातच २०२२ चा सिझन संपला. पण त्यांनी हार मानली नाही. २०२३ च्या सिझनला जायचेच हा निश्चय करून निधी जमा करणे त्यांनी सुरुच ठेवले. अनेक जाणत्या अजाणत्या हातांनी मदत केली. सर्वात कमी देणगी होती ५० रुपये. अनेकांनी मोठी मदत केली. आणि मोहिमेचा मार्ग खुला झाला.
हा सिझन वाया जाऊ नये म्हणून त्यांनी पहिले नेपाळ गाठले. पण अडचणी पिच्छा सोडत नव्हत्या. मोहिमेसाठी भरायला लागणाऱ्या फी मध्ये काही रक्कम कमी होती. आणि ती मित्रमंडळी मागून पाठवणार होते. सोबतच्या टीमचे सर्वांचे पैसे जमा करून झाले होते. पण लहूची आवश्यक रक्कम अजूनही जमा होत नव्हती.
पत्नी, मित्र अनेक ठिकाणी फिरून मदतीसाठी प्रयत्न करत होते. शेवटी मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी आवश्यक रक्कम जमा झाली. आणि एव्हरेस्टचा मार्ग खुला झाला. कष्ट उपसण्याची तयारी असेल तर एव्हरेस्टही सर होऊ शकते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याविषयी गिर्यारोहक लहू उघडे म्हणतात, माऊंट एव्हरेस्ट सर केल्यावर स्थानिक पर्वतारोहण वाढविण्यावर भर देणार आहे. देशातील पर्वतारोहण, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये मोठी आव्हाने आणि संधी आहेत. स्थानिक पर्वतारोहण वाढल्यावर त्या परिसरात रोजगार वाढेल. ते तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाहीत.”
लहू उघडे यांनी राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी चढाई केलेले पर्वत
भागीरथी २ – ६,५१२ मीटर
माऊंट युनाम- ६ ,१११ मीटर
फ्रेंडशिप पीक – ५,२८९ मीटर