- जुन्या परंपरेला जपतेय आजची तरुणाई
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी लखनौमधून
दीपावलीत आकर्षक रोषणाईतही मातीच्या पणत्यांना दिवाळीत मोठी मागणी असते. या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्तर प्रदेशातील तरुणाईने कंबर कसली आहे. या पारंपरिक कलेला आॅनलाईन बाजारपेठ मिळवून देत जगभरात त्याचा संचार करण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. आॅनलाईन विक्रीतून या व्यवसायाला मोठा आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभारामध्ये आशेची ज्योत प्रजल्वित झाली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भव्य सोहळा, शाश्वत जीवनाकडे वाढता कल यामुळे दीपावलीत मातीच्या पणत्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे, तरुण कुंभार पणत्यांसह मातीच्या इतर वस्तूंच्या निर्मितीकडे गांभीर्याने पाहत आहेत. कुंभारकामाकडे वळलेल्या सचिन प्रजापती या तरुणाचे उदाहरण बोलके आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील अयोध्येच्या सीमेवरील मानकपूर या छोट्या गावाचा रहिवासी असलेला सचिन प्रजापती आयटी कंपनीत एक दशकभर काम करीत होता. तो पुन्हा आपल्या घरातील या मूळ व्यवसायाकडे वळला असून त्याने पणत्यांसह कुल्हड, कप आदी मातीच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी छोटा कारखानाही सुरू केला आहे.
याविषयी तो म्हणाला, “दैनंदिन वापरासाठी कुल्हड, कपासारख्या मातीच्या वस्तूंचीही निर्मिती केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये मी नोकरी गमावली. त्यानंतर घरी परतल्यावर कुंभारकामाकडे व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात केली. माझ्या गावातील लोकांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. येथील प्रत्येक दुसऱ्या घरात कुंभाराचे चाक असून तरुण पिढी आता कुंभारकामाकडे व्यवहार्य पेशा म्हणून पाहत आहे.
सचिन प्रजापतीप्रमाणेच इंजिनिअरिंगकडून कुंभारकामाकडे वळलेल्या राजेशकुमार प्रजापतीची कहाणीही अशीच. आपल्या घरातील कुंभारकामाचा वारसा पुढे नेत त्याने कारखाना सुरू केला. या कारखान्यात आता सणासुदीच्या काळात २० कुंभार काम करतात. उत्तर प्रदेशातील विविध भागांना पणत्यांचा पुरवठा केला जातो. याबाबत बोलताना राजेशकुमार प्रजापती म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पणत्या लावून दीपोत्सव केला जात असल्याने कुंभारांना सुगीचे दिवस आले आहेत. वस्तूंची सर्वदूर विक्री करण्यासाठी ऑनलाईन विक्रीही सुरू केली आहे.
तसेच कुंभार कपिल प्रजापती आणि सार्थक सिंह म्हणतात, आम्ही २०२२ मध्ये केवळ पाच कुंभारांसह पणत्या व मातीच्या वस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला. आता आमची १५ जणांची टीम आहे. लखनौमधील अनेक मोठ्या हॉटेलना आम्ही मातीचे कुल्हड, कप पुरवितो. गेल्या काही वर्षांत मातीच्या पणत्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.