स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची बातमी आहे एका जिद्दी माणसाची…
त्या गावात धड कुणाचीही लग्न ठरत नव्हती… कारण एकच गावात पाणी नाही. तीन-तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे गावातल्या एका तरुणाची ठरत असलेली सोयरिक मोडली. तेव्हा त्याने निर्धार केला की माझ्या गावालाच दुष्काळमुक्त बनवेन. गावात पाणी आणून दाखवेन आणि ही लग्न न जुळण्याची समस्या कायमची मिटवेन.
हा तरुण म्हणजे हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं नागदरवाडी या गावात राहणारा. गावात पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे खूप हाल व्हायचे. गावात कुणीही मुलगी द्यायला तयार होत नसे. पाणी नसल्यामुळे केंद्रे यांचे ठरलेले लग्न मोडले. तो आयुष्यातील टर्निंग पाॅईंट ठरला. त्याने गावासाठी काम करायचे ठरवले. हे सगळं करताना प्रथम लोकांना तयार करण्याचे मोठे आव्हान बाबुराव केंद्रे यांनी स्वीकारले. त्यासाठी आदर्श गाव ठरलेल्या राळेगणसिद्धी, हिवरेबाजार इथे गावकऱ्यांच्या भेटी घडवून आणल्या..
महिलांना, मुलांना यात सहभागी करून घेण्यात आले. पाण्याचा प्रश्न आपण कायमचा सोडवू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात जागवला.
या विषयावर साडेतीन तास ग्रामसभा चालली. इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गावात राबवायचा असे ठरले. त्यानुसार 25 % गावकऱ्यांचे श्रमदान आणि 75 % नाबार्ड, वॉटर संस्थेमार्फत फंड असे ठरले. सुरुवातीचे 6 महिने गावातील 200 हेक्टरवर काम करायचे ठरले. त्यातून जे काही निष्कर्ष आले त्यामुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला. 1999 साली गावात जलसंधारणाचं काम सुरू झाले. त्यासाठी 3 नियम आखून देण्यात आले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि श्रमदान. चराईबंदीमध्ये जिथे काम केलेय तिथे जनावरे चारायची नाही. कुऱ्हाडबंदीमध्ये जिथे आपण वृक्ष लागवड केलीय ती झाडे तोडायची नाही. आणि श्रमदान म्हणजे दर एक महिना प्रत्येकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीने पाणलोटाचे काम एक दिवस मोफत करायचे.
200 हेक्टरवर पडणारा प्रत्येक थेंब अडवला. सहा महिन्यांनंतर पाऊस पडला. सहा महिन्यानंतर पाणी मुरत मुरत गेले. आजघडीला नागदरवाडीत 100 हून अधिक विहिरी आहेत. पाणी टंचाईचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो याची जाणीव त्यांना होती. त्यांनी नागदरवाडीत पाण्यासाठी काम सुरू केले. जलसंधारणाचे काम हाती घेतले. पुढच्या पाच वर्षांत ते जिद्दीने पूर्ण केले. यातून परिसरातील 1 हजार 14 हेक्टर क्षेत्रावरील पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजमितीला गावात 100 हून अधिक विहिरी, 300 हून अधिक शेततळी आहेत, तर 5 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पाणी आल्यामुळे गावकऱ्यांचं आयुष्य सुखकर झाले आहे.
‘माती अडवा, पाणी जिरवा’
नामदेव यांचे मोठे बंधू बालाजी केंद्रे इंडो-जर्मन वॉटर शेड डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत मराठवाड्यात काम करत होते. बाबुराव केंद्रे यांना त्यांचं मार्गदर्शन लाभले. इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात प्रामुख्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करण्यावर भर दिला जातो. आता नागदरवाडी गावात प्रवेश करण्याआधी पाण्यानं तुडुंब भरलेला तलाव दिसून येतो.
इतर गावांनीही घेतला आदर्श
नागदरवारडीने जलसंधारणाचे जे काम केले ते काम बघून आजूबाजूच्या अनेक गावांनी प्रेरणा घेतली. त्यापैकी एक गाव आहे भिलू नाईक तांडा. या गावात 23 घरे असून जवळपास 26 शेततळी आहेत. अनेक विहिंरींचेसुद्धा बांधकाम झाले आहे. येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा गेल्या 3 वर्षांपासून प्रत्यक्षरीत्या फायदा होत आहे.
जलप्रहरी’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
या सर्व कामामुळे बाबुराव केंद्रे यांना गेल्या वर्षी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ‘जलप्रहरी’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.
जल संसाधन आणि पाणी संकटावर काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो.
बाबुराव केंद्रे यांच्या आयुष्यावर नुकताच ‘पाणी’ चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.