स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था पुण्यात ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या असून सामाजिक बांधिलकीचा अनोखा जागर या निमित्ताने होतो आहे.
आर्टिस्ट्रीतर्फे ‘देणे समाजाचे’ हा एक अनोखा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गरजू आणि उपेक्षितांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याच्या प्रेरणातून हा उपक्रम राबविण्यात येतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच यातून या संस्थांना विविधांगी मदत मिळवून देणे हा या सामाजिक उपक्रमाचा उद्देश आहे. उपक्रमाचे हे 20 वे वर्ष आहे. या 20 वर्षात 28 सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुण्याव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पार्ले येथे हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे उपक्रमाच्या आयोजिका वीणा गोखले यांनी सांगितले.
या उपक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते पुण्यातील ‘निवारा वृद्धाश्रम’ येथे झाले. यावेळी ‘गप्पाष्टक’ कार डॉ. संजय उपाध्ये आणि आर्टिस्ट्रीच्या संस्थापक- अध्यक्ष वीणा गोखले उपस्थित होते.
आतापर्यंत या उपक्रमात 275 सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच 15 कोटीचा निधी याद्वारे मिळाला आहे. यंदा या उपक्रमात 24 संस्था सहभागी झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील संस्था या सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यात कोल्हापूर, इंदापूर, जळगाव जामोद, बीड, अहमदनगर, ठाणे, शिरूर कासार, अकोला, श्रीगोंदा आणि पुणे येथील सेवाभावी संस्थांनी आपल्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडली आहे.या उपक्रमाला 27 ,28, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत भेट देता येणार आहे.
यावेळी अमोल सावंत यांच्या ‘निसर्ग कट्टा’ या वेबसाईटचे उद्घाटन ‘लहाने’ यांच्या हस्ते झाले. पर्यावरणाशी निगडित असलेली ही वेबसाईट आहे.
या सगळ्या संस्थांच्या एक प्रतिनिधी म्हणून अनाथ वृद्धाश्रम प्रकल्प चालविणाऱ्या आजोळ परिवाराचे कर्ण तांबे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भाकरीची वणवण असताना वीणाताईच इथल्या भाकरीवरसुद्धा नाव घेऊन आल्या. येथील प्रत्येक सामानावर वस्तूंवर वीणाताईंचे नाव लिहिले आहे. 2013 ला वीणाताईंनी आजोळ परिवाराला ‘देणे समाजात’ स्थान दिले. लॉकडाऊन पडले आणि वीणाताईंनी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर संस्थेला 2 लाख 33 हजाराची तसेच दुधासाठी सुंदर गायीची मदत मिळाली. यानंतर मदत मिळतच राहिली. 3 लाख मदत मिळाल्यानंतर बांधकाम केली. वस्तू खरेदी केल्या. आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न 9 लाख मदतीने सुटला. देणे समाजाचे उपक्रम डुबत्या जहाजाला दिशा दाखवणारे होकायंत्र आहे. यावर्षी आजी आजोबांना पक्का निवारा द्यायचा आहे व तसेच पुण्यात जागा घ्यायची आहे त्यासाठी मदत हवी आहे.
यावेळी तात्याराव लहाने म्हणाले, एक घटक खऱ्या अर्थाने समाज सेवा करीत असतो, तर एक घटक केवळ जाहिरातीसाठी समाजसेवेचे ढोंग करीत असतो. खरी समाजसेवा आणि ढोंगी समाजसेवा यातील फरक समाज ओळखतो. समाजाचा विश्वास संपादित केल्यास मदतीसाठी समाज पाठीशी उभा राहतो.
ते पुढे म्हणाले, मुरूड जंजिरा येथे मी देखील सामाजिक संस्था स्थापन करून काम करीत आहे. माझी संस्था किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी विनामूल्य डायलेसिस सेवा उपलब्ध करून देते. सामाजिक काम करताना अडचणी येत नाहीत, असे नाही परंतू तुमची वृत्ती आणि नियत स्वस्छ असल्यास अडचणींवर मात करण्याचे मार्ग सापडतात. समाजातील अनेक घटक अनाहूतपणे पुढे येऊन आपली समस्या दूर करतात. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी विज्ञाना पुढे ‘माणुसकी’ ही एक अद्भूत शक्ती आस्तित्वात आहे, यावर माझा विश्वास असून गरजवंताला केलेल्या मदतीनंतर आशिर्वादाच्या रुपाने ती शक्ती तुमच्या पाठिशी उभी राहत असते. त्या मिळणाऱ्या आशिर्वादांमुळेच तुमचे आयुष्य वाढत असते. याचे जिवंत उदाहरण माझ्या रुपाने तुमच्या समोर उभे आहे. मात्र, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती कमी होत चालली आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. समाज आत्मकेंद्री होत चालला असून त्याही पलीकडे जाऊन तो ‘मोबाईल’ केंद्रीत होत चालला आहे. वीणा गोखले यांचे काम हे निद्रिस्त समाजाच्या जाणीवा जागृत करण्याचे आणि त्या अधिक समृद्ध करण्याचे काम असून गेली वीस वर्षे सातत्याने त्या सामाजिक उत्थानाचे हे काम करीत आहेत.
यावेळी बोलताना डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, देण्याने कमी होत नसते तर ते वाढतच जाते. नदी जशी वाहत जाताना तिचे अंतिम ध्येय समुद्रात विलिन होण्याचे असले तरी प्रवाहीत होता होता नदी दोन्ही किनारे समृद्ध आणि सुजलाम सुफलाम करीत असते. दुसऱ्याला देणे अथवा मदत करणे याद्वारे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावनी गोखले- कापरे यांनी केले.