- सफाई कर्मचाऱ्यांमधील सेवाव्रती नारायण अथक कार्यरत
- १२५ टन निर्माल्य पुन्हा निसर्गात विलीन
(प्रिया कांबळे जाधव)
स्वदेस न्यूज :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीची जल्लोषात सांगता झाली. घराघरांत प्रतिष्ठापना झालेल्या गणपतीचे विसर्जन झाले. रात्रभर सुरू असलेल्या उत्सवानंतर सगळे थकलेले जीव झोपायला घरी गेले पण सफाई कर्मचाऱ्यांमधील सेवाव्रती नारायण मात्र अखंड जागा होता. लाखो लोक रस्त्यावर उतरल्याने कागद, कचरा, निर्माल्य यांनी भरून गेलेल्या शहराला पुन्हा त्यांनी चकाचक केले आणि मगच ही मंडळी थांबली. खरी कौतुकाची थाप हवी ती त्यांच्या पाठीवर! त्यातही आणखी कौतुक करायला हवे ते ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांचे. त्यांनी निर्माल्य गोळा करून ते पुन्हा निसर्गात पोहोचण्याचे जबरदस्त काम केले आहे.
आपण उत्सवाचा आनंद साजरा करून मोकळे झालो. त्या वेळच्या आणि त्या नंतरच्या स्वच्छतेचं भान फक्त कचरा वेचक आणि सफाई कर्मचाऱ्यांना होते. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ’ च्या कचरावेचकांनी ‘निर्माल्य टू निसर्ग’ उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत शहराशी बांधिलकी जपली. या वर्षी २०० हून अधिक कचरा वेचकांनी ४६ मुख्य विसर्जन केंद्रावर थांबून नागरिकांकडून थोडे थोडके नव्हे तर १२५ टन निर्माल्य संकलित केले.
मध्यरात्रीपर्यंत नागरिकांसोबत उत्सवात सामील होऊन काम करत स्वच्छ कचरा वेचकांनी जमा केलेले हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पुणे मनपा व्यवस्थेला सुपूर्त केले. तसेच जवळपास ३४ टन सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले. त्यांच्या अथक प्रयत्नांतून पुन्हा एकदा शहराच्या पर्यावरण आणि संस्कृती जपण्यासाठीची त्यांची बांधिलकी स्पष्ट झाली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘निर्माल्य टू निसर्ग’ या अनोख्या उपक्रमामुळे पुणे शहरातील गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल घडला आहे. शहरातील मुख्य विसर्जन केंद्रांवर १२ व १७ सप्टेंबर रोजी कॉर्पोरेट क्षेत्रातील, तसेच शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी यांनी कचरा वेचकांना साथ देत फुलं-पाने, तसेच दूर्वा खतनिर्मितीसाठी वर्गीकृत केल्या. या उपक्रमाद्वारे गेल्या ८ वर्षांत अंदाजे ८०० टन निर्माल्य वेगळे काढून पर्यावरणपूरक पद्धतीने खतनिर्मितीद्वारे निसर्गात परत सोपवले.
स्वच्छ संस्थेने ५० पेक्षा अधिक मोठ्या सोसायटयांमध्ये जवळपास ८००० कुटुंबांपर्यंत पोहोचून शाडू मातीच्या पुनःचक्रीकरणासाठी, शाश्वत व पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी पुनरावर्तन उपक्रमात सहभाग घेण्याबद्दल जनजागृती केली.
याविषयी स्वच्छ संस्थेच्या विद्या नाईकनवरे नागरिकांच्या बदललेल्या दृष्टिकोनाबद्दल म्हणाल्या, “गेल्या १५ वर्षांत, आम्ही एक अविश्वसनीय बदल अनुभवला आहे. आम्ही या शहरासाठी कोविड महामारीसारख्या खडतर काळात आणि सणांसारख्या आनंदी काळात काम केले. पुणे शहरासाठी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत. आता, बऱ्याच लोकांना माहित आहे की स्वच्छ कचरा वेचक निसर्ग आणि संस्कृती या दोन्हींचे संरक्षण करण्यासाठी निर्माल्य गोळा करतात. अनेकजण आम्हाला प्रसाद देतात; आरतीसाठी देखील बोलावतात. आमच्यासोबत जनजागृती केल्याबद्दल आम्ही गणेश मंडळांचेही आभारी आहोत. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आणि कचरा वर्गीकरणाची सवय वर्षभर सुरू ठेवण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करतो. दरवर्षी, पुण्याच्या सर्वात मोठ्या उत्सवात पर्यावरणाचे रक्षण केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”.
याविषयी धनकवडी-सहकारनगर परिसरातील नागरिक पुष्पा म्हणाल्या, “नकळतपणे माझा मोबाईल निर्माल्य संकलन केंद्रावर पडला. निर्माल्य वर्गीकरण करत असताना, स्वच्छ च्या कचरा वेचक सुजाता भोंडे यांना माझा मोबाईल सापडला आणि त्यांनी तो तात्काळ स्वच्छ समन्वयकांकडे दिला. थोड्या वेळाने मी माझ्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा मला समजले की तो सापडला आहे. स्वच्छच्या कचरा वेचकांच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटते. माझा मोबाईल परत दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि त्यांच्या या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे मनःपूर्वक कौतुक करते.”
चिमुकला परम बिर्ला (वय ९) म्हणाला, “आमच्या घरी कचरा घ्यायला येणाऱ्या स्वच्छ च्या मावशी एक दिवसही चुकवत नाहीत, त्या आमच्या कुटुंबासारख्या आहेत. मला बाप्पाच्या उत्सवात त्यांना पाहून खूप आनंद झाला!”
मीनल म्हैसकर-शहाणे म्हणाल्या, आम्हाला आनंद आहे की हेच स्वच्छ कचरा वेचक बाप्पाच्या विसर्जन केंद्रांवर निर्माल्य संकलन करून शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मदत करत आहेत.
प्रमुख गणेश मंडळांनी आरती करण्यासाठी केले निमंत्रित यावर्षी अनेक प्रमुख गणेश मंडळांनी स्वच्छ कचरा वेचकांच्या हस्ते आरती करण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी निमंत्रित केले. मंडळाच्या सजावटीतील कचरा वेचकांचे योगदानदेखील प्रदर्शित केले. केवळ उत्सवादरम्यानच नव्हे तर संपूर्ण वर्षभर कचरा वेचकांच्या अमूल्य योगदानाबद्दल कचरा वेचकांचा सत्कार केला. छोट्या पण एकत्र येऊन केलेल्या कृतींमुळे पर्यावरण व संस्कृतीचे कसे जतन होऊ शकते हे गणेश मंडळांच्या सहभागातून व सांयुक्तिक प्रयत्नांतून सिद्ध झाले.
दरवर्षी ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांचा गणेशोत्सवादरम्यान मिठाई आणि तुळशीबाग गणपतीची तस्बीर देऊन सत्कार करतो, कारण त्या केवळ गणेशोत्सवाचे दहा दिवस नाही तर वर्षभर स्वच्छतेचे काम करतात. यावर्षी कचरा वेचकांच्या हस्ते गणपतीची आरती केल्याचा आम्हाला आनंद आहे”, अशा भावना तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांनी व्यक्त केली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी कसबा गणपती, भाऊ रंगारी, तुळशीबाग, केसरी वाडा यांसारख्या शहरातील प्रमुख गणपती मंडळांना सहभागी करून घेतले. पुण्याचा गणेशोत्सव साजरा होताना पर्यावरण जपले जावे यासाठी जनजागृती करत गणेश मंडळांनी महत्त्वाची भूमिका बजावली.