ड्रोनद्वारे फवारणीसाठी शेतकऱ्यांची मागणी!
स्वदेश न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे अहमदनगरमधून…
आधुनिक तंत्रज्ञानाने आता चांगलेच बाळसे धरलेले आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता झळकतेच. मग शेती त्यापासून लांब कशी असेल? अहमदनगर जिल्ह्यातील मालदाड गावात राहणाऱ्या सुप्रिया नवले आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ड्रोनचा वापर चक्क शेतात कीटकनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी करतात. याचाच व्यवसाय सुरू करून त्यांनी पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची सुरेख जोड दिल्याचे दिसून येते आहे.
सुप्रिया यांचे शिक्षण बी.एस.सी ऍग्रीकल्चर मध्ये पूर्ण झालेले असून सध्या त्या अहमदनगर येथेच ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पुणे येथे पूर्ण झाले. ड्रोनचा वापर शेतामध्ये खते, जंतुनाशक, कीटकनाशक यांच्या फवारणीसाठी केला जातो. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हळूहळू ही संकल्पना अमलात आलेली पाहायला मिळते. सुप्रिया यांच्या कामाचे स्वरूप सुद्धा अगदी सोपे आहे. शेतकऱ्याकडून फवारणीसाठी बोलावणे आल्यानंतर ड्रोन, त्यासाठी लागणाऱ्या बॅटरीज आणि जनरेटोर एका इलेक्ट्रिक गाडीतून त्या फवारणीच्या जागेकडे नेण्यात येतात. त्यानंतर सर्वात प्रथम ड्रोन चे संयोजन(setup) करून त्या जमिनीतील सीमारेषा निश्चित केल्या जातात. त्यामधील योग्य ते अंतर,जागा आणि अल्टीट्युड यांची तपासणी आणि विश्लेषण करून झाल्यानंतर ऑटो मोड वापरून फवारणीला सुरुवात होते. एक एकर जमिनीच्या फवारणीसाठी निव्वळ ७ मिनिटे एवढाच कालावधी पुरेसा असतो.
अनेक ठिकाणी अश्या प्रकारची फवारणी हा शेतकऱ्यांसाठी कुतूहल वाढवणारा आणि आश्चर्यकारक असा विषय आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत साशंकता आणि संभ्रम सुद्धा असलेला दिसून येतो. परंतु सुप्रिया त्यांच्या जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा उत्पन्नाचं साधन म्हणून अगदी सकारात्मकतेने वापर करताना दिसत आहेत.
अनेक शेतकऱ्यांसाठी हा विषय स्वागतार्ह आहे. ज्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणी केली आहे, त्यांच्यामते, ड्रोन चा वापर करून फवारणी केली असता वेळ, पैसा आणि साधनसामुग्री कमी प्रमाणात लागते.तसेच एक एकर जमीन फवारणीसाठी आधी तब्बल २ तास लागत, तेच काम आता निव्वळ ७ ते १० मिनिटात पूर्ण होते. परिणामी शेतीमध्ये अजून सधनता येईल अशी खात्री देखील अनेक शेतकऱ्यांना वाटते.
अर्थात तंत्रज्ञान म्हटले, की काही अडीअडचणी आणि आव्हाने निश्चितच आहे. ज्यामध्ये जीपीएस सिग्नल प्राप्ती तसेच योग्य रस्ता आणि ड्रोनसाठी आवश्यक असणाऱ्या बॅटरीज यांची उपलब्धता यांचा समावेश होतो. या गोष्टी योग्य प्रमाणात असल्यास ड्रोन फवारणी वेगाने आणि सुरळीत पार पाडली जाऊ शकते.
सध्या सुप्रिया प्रत्येक एकरामागे रु.३०० असा दर आकारतात. या क्षेत्राला भविष्यात खूप मागणी आहे याबाबत त्यांना खात्री वाटते. गावातील तरुण तरुणींनी उपजीविकेचे साधन म्हणून या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन काम करावे असे सुप्रिया नवले सांगतात. आपल्याच परिसरात राहून उत्पन्नाचं साधन तयार करणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक मदतीचा हात उपलब्ध करून देणे हे दुहेरी कामे सुप्रिया नवले अहमदनगर येथे करत आहेत.