- वाढवा आपल्या शरीराची ऊर्जेची पातळी…
- बाहेरचं खाणं महिनाभर करा बंद आणि पाहा होणारे बदल
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
शनिवार-रविवार आले की बाहेरचं जग आपल्याला खुणावू लागतं आणि तिकडचे खाद्यपदार्थ खाण्यावर आपण ताव मारतो परंतु आपल्याला आपल्या शरीराची ऊर्जेची पातळी काही चांगल्या उपायांनी वाढवता येऊ शकते. त्यासाठी काही गोष्टी मात्र निर्धाराने पाळाव्या लागतील.
डाॅक्टरांचा या संदर्भात सल्ला असा आहे, की तुम्ही एक महिना स्वतःमध्ये काही बदल करून पाहा. तुम्हाला विलक्षण बदल घडताना दिसू लागतील आणि हे चांगले बदल तुमच्या अंगवळणी पडतील. पण त्यासाठी एक महिनाभर काही गोष्टी ठरवून बंद कराव्या लागतील. डाॅक्टरांच्या मते, दीर्घ कालावधीसाठी जेव्हा तुम्ही बाहेरचे पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर, सँडविच खाणे बंद करता तेव्हा तुमचे शरीर या अॅडिटिव्ह्जपासून स्वत:ला डिटॉक्सिफाय करण्यास सुरुवात करते.
त्याचे लाभ खालीलप्रमाणे होतात.
- डोकेदुखी, चिडचीड आणि थकवा अशी लक्षणे कालांतराने कमी होऊ लागतात.
- व्यक्तीची शारीरिक ऊर्जा पातळी वाढते
- पचनक्रिया सुधारते.
- मूड चांगला राहतो
- तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर दिसू लागते.
- फळे, भाज्या आणि घरातील इतर खाद्यपदार्थ अधिक चवदार वाटू लागतात.
- त्यातील नैसर्गिक चवींमुळे तुमचे मन तृप्त होते.
- प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो.
- निरोगी आणि अधिक संतुलित जीवनशैली जगता येते.
आपल्यापैकी अनेकांना मसालेदार, चविष्ट, चमचमीत पदार्थ खायला आवडतात. परंतु या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, मैदा, खाद्यरंगांचा वापर केलेला असतो. त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही अशा फास्ट फूड खाण्याने होतो. पण जर आपण एक महिना पिझ्झा, बर्गर, कोक असे बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले, तर त्याचे खूप मोठे लाभ दीर्घकाळासाठी आपल्याला मिळू शकतात.
डाॅक्टरांच्या मते, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन हे व्यसन बनू शकते. आपल्या शरीराला पोट भरण्यासाठी अधिक अन्न खाण्यास प्रवृत्त केले जाते. बाहेरच्या पदार्थांमध्ये अशा काही गोष्टी टाकल्या जातात, ज्याने माणसाची खाण्याची इच्छा आणखी वाढते, असे संशोधनातून समोर आले आहे. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ॲडिटिव्ह आणि प्रिझर्वेटिव्ह असते, ज्याने ब्रेन केमिस्ट्री बदलते. पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो आणि त्यामुळे तो पदार्थ सतत खाण्याची इच्छा होते. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बराच वेळ टिकण्यासााठी त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा पचनसंस्थेतील चांगले जीवाणू विस्थापित होतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. त्वचेच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो.
त्या ऐवजी पालेभाज्या, चरबीयुक्त मासे व सुका मेवा यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. निरोगी आहार, चांगली झोप यामुळे आरोग्यास दीर्घकालीन फायदे मिळतात, ज्यात लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, हृदयरोग व विशिष्ट कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो.