नकारात्मकतेने भरलेल्या आपल्या भवतालात आजुबाजूला किती चांगल्या गोष्टी घडत असतात आणि किती माणसं तळमळीने धडपडत असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. पण अनेकदा प्रसिद्धी, वलय, मान, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांचा विचारसुद्धा न करता आंतरिक तळमळीने काम करणारी काही माणसं असतात. खरं तर समाजाच्या चांगुलपणाचा तीच आधार असतात. असं म्हणतात की सगळीकडे अंधार दाटून आलेला असताना उजळायला इवलासा दीप पुरेसा असतो. त्याप्रमाणे सगळीकडे नकारात्मकता, निराशा यांचे गडद, गहिरेपण वाढू पाहत असताना काही माणसं मात्र आपल्या ओंजळीत आशेचा दीप घेऊन बाहेर पडतात. पुण्यातील ‘परिवर्तन’ या संस्थेचे काम असेच आशेचा दीप उजळवणारे आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी पुण्यामध्ये चौथी परिवर्तन युवा परिषद आयोजित केली आणि प्रत्येक युवकाच्या मनात एक नवी आशेची ज्योत पेटवली. त्यांनी सुरू केलेल्या युवाशक्तीच्या जागराला अभिवादन आणि मुजरा करायलाच हवा.
नावाप्रमाणेच परिवर्तनावर श्रद्धा आणि विश्वास असणारी ही मंडळी त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वक्षितीजांवर स्थिरावलेली आहेत. पण तरीही समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं ही त्यातील प्रत्येकाची आंतरिक तळमळ आहे. ती इतकी सहज, स्वाभाविक आहे की त्यामुळे त्यातून मला काय हा प्रश्नच त्यांना पडत नसावा आणि पडला तरी भरभरून समाधान हे एकच उत्तर त्यांना मिळत असावं…
दोन दिवस चाललेल्या या युवा परिषदेत राज्यभरातून ३०० हून अधिक युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते. त्यांच्या सहभागाचा उत्साह जितका तितकाच उत्साह आयोजकांचा त्यांना भरभरून देण्याचा होता. त्यामुळे राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रिडा, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील एकाहून एक दिग्गज मंडळी व्यासपीठावर येत होती आणि आपले आयुष्य उलगडतानाच कसं जगायला हवं याचा मंत्रही तरुणाईला देत होती. त्यांच्या शब्दांना अनुभवाची जोड असल्याने त्याची परिणामकारकता युवकांना भिडल्याशिवाय राहत नव्हती. त्यामुळेच पहिल्या दिवशी उद्योजक आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या पुनित बालन यांच्या मुलाखतीने सुरू झालेली युवा परिषद उत्तरोत्तर रंगत गेली. त्याचा कळसाध्याय ठरला माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख्य उर्फ काकासाहेब यांचे व्याख्यान. प्रत्येक सत्र एक वेगळा अनुभव देणारे आणि एक वेगळे जीवनविश्व उलगडून दाखवणारे होते. त्यामुळेच ते प्रेरक होते. अगदी योग्य वयात मुलांना जे हवे ते नेमकेपणाने देण्याचे काम या परिषदेने केले.
युवा परिषदेचे फलित काय असा प्रश्न जर आपण विचारला तर एका ओळीत सांगता येईल ते म्हणजे यात सहभागी युवक स्वतःकडे आणि जगाकडे पाहायला शिकतील. ही सर्वांत मोठी उपलब्धी आहे. कारण या परिषदेच्या प्रत्येक सत्रातून त्यांना जीवनाची व्यापकता तर कळत होतीच पण त्याच्या जोडीला स्वतःकडे पाहून स्वतःवर किती मेहनत घ्यायला लागणार आहे हे लक्षात येत होते. त्यामुळे या परिषदेने ती ज्योत मनामनांत पेटवण्याचे काम नक्की केले असणार याचा विश्वास वाटतो. अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान त्या दृष्टीने कमालीचे विचारगर्भ आणि दिशादर्शक होते. स्वतःला ओळखा, संकल्प करा आणि सर्वोत्तमाचा ध्यास ठेवा हा त्यांनी दिलेला संदेश प्रत्येक तरुणाने मनावर कोरून ठेवावा असाच होता.
आज सगळीकडे मोबाईलवेडाने पछाडलेले लोक दिसतात. अशा परिस्थितीत त्यांना त्यापासून दूर करायचे तर त्यांच्या जीवनापुढील स्वप्न बदलायला हवीत. त्यासाठी संघर्षातून उभ्या राहिलेल्या रिअल हिरोच्या कहाण्या समोर यायला हव्यात. ही माणसं, त्यांचं आयुष्य, त्यांची प्रेरणा, त्यांची जिद्द, त्यांची जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी पाहिल्यानंतरच ही युवा पिढी काही प्रमाणात रिल्सच्या भोवऱ्यातून बाहेर पडू शकेल आणि स्वतःला घडवण्यासाठी कंबर कसेल, असा उद्देश ठेवून युवा परिषदेतील एकेक हिरा निवडून आणलेला होता. त्यामुळे एकही सत्र कंटाळवाणे, रटाळ झाले नाही. उपदेशाचे डोस नव्हते तर प्रत्यक्ष जीवनानुभव असल्याने तो सहभागी युवकांच्या मनात थेट भिडत होता हे त्यांच्या प्रतिसादातून लक्षात येत होते.
या सगळ्यांत अथक मेहनत घेणारे परिवर्तनचे समीरदादा जाधवराव, अभिजीत घुले, किशोर ढगे आणि अनेकानेक उत्तमोत्तम निःस्वार्थ कार्यकर्त्यांची फौज यांच्या बळावर दोन दिवसांचा हा परिषदेचा डोंगर यशस्वीरीत्या पेलला गेला. त्यांनी किती मोठं सामाजिक काम केलं आहे याची कदाचित त्या प्रयत्न करणाऱ्या हातांना कल्पनाही नसावी. पण त्यांनी डोंगराएवढे काम दोन दिवसांत उभे केले आहे. समाजातील उत्तम हिरे आणि हिरो शोधून काढणे, त्यांना युवकांच्या समोर आणून संवाद घडवून आणणे व त्यातून परिवर्तनचा एक विधायक सेतू उभा करणे हे त्या कामाचे खरे मोल आहे. या सगळ्या परिवर्तनच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद, अभिवादन आणि मानाचा मुजरा…
आगे बढते रहो… तुमची समाजाला खूप खूप गरज आहे…
– पराग पोतदार
(मुख्य संपादक, स्वदेस न्यूज)