राज्यस्तरीय ‘परिवर्तन’ युवा परिषदेचे उद्घाटन
(पराग पोतदार)
स्वदेस न्यूज :
आजची चांगली बातमी आहे ती आपल्या पुण्यातून….
‘परिवर्तन’ या पुण्यातील सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेचे उद्घाटन आज झाले. राज्यभरातून नोंदणी करून ३०० हून अधिक युवक या युवा परिषदेला उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये ‘रिल’ नव्हे तर ‘रिअल’ हिरो त्यांना भेटणार आहेत,
आयुष्यात खरोखरीच यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन काय म्हणते ते ऐकायला शिका, आपला आतला आवाज जे सांगेल तेच करा. आयुष्याचे दीर्घकाळाचे नियोजन करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शाॅर्टकट उपयोगी पडणार नाहीत, असा प्रेरक सल्ला प्रसिद्ध उद्योजक आणि इंद्राणी बालन ट्रस्टचे संचालक पुनित बालन यांनी आज युवकांना दिला.
निमित्त ठरले आहे, ‘परिवर्तन’ या पुण्यातील सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेचे. त्याचे उद्घाटन पुनित बालन यांच्या हस्ते आज झाले. राज्यभरातून नोंदणी करून ३०० हून अधिक युवक या युवा परिषदेत सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये ‘रिल’ नव्हे तर ‘रिअल’ हिरो त्यांना भेटणार आहेत, या प्रसंगी एकनाथकाका जगताप फाउंडेशनचे संचालक उद्योजक संतोष जगताप, युवा सदस्य जीवन जाधव पाटील उपस्थित होते. ‘ज्ञान की’ ग्रंथालयचे प्रवर्तक प्रदीप लोखंडे, पूनम ढगे यांनी पुनित बालन यांची मुलाखत घेतली.
आयुष्यात खरोखरीच यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन काय म्हणते ते ऐकायला शिका, आपला आतला आवाज जे सांगेल तेच करा. आयुष्याचे दीर्घकाळाचे नियोजन करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शाॅर्टकट उपयोगी पडणार नाहीत, असा प्रेरक सल्ला प्रसिद्ध उद्योजक आणि इंद्राणी बालन ट्रस्टचे संचालक पुनित बालन यांनी आज युवकांना दिला. ते म्हणाले, पैसा कसा मिळवायचा यापेक्षा व्यवसाय कसा चालवायचा हे सूत्र महत्त्वाचे आहे. कोणताही व्यवसाय चांगला सुरू होण्यासाठी १ हजार दिवस लागतात हे लक्षात घ्या. त्यामुळे संयम आवश्यक आहे. यात चढ-उतारसुद्धा येतील त्यामुळे हार मानू नका. अनेक स्टार्ट अप्स आमच्याकडे येतात. व्यवसायाचे यश हे तुमच्या पारदर्शकतेवर अवलंबून असते. तुमचं मन काय सांगते तेच करा.
आईवडिलांना विरोध कऱण्यापूर्वी त्यांची भूमिका समजून घ्या, त्यांनी केलेल्या कष्टाची अगोदर जाणीव ठेवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, आई-वडिलांना आपण तरुण वयात खलनायक समजतो. आई-वडील आपल्याला काही सांगतात तेव्हा आपण त्याला लगेचच विरोध करायला सज्ज असतो. पण त्यांच्याच पोटी आपण जन्माला आलो हे विसरून चालणार नाही. ते कधीही चुकीचे सांगणार नाहीत. ते सांगतील ते आपल्या हिताचेच असते. काही क्षणापुरते विरोध करावेसे वाटले तरी त्यांचे ऐकायला शिका. माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून जे कष्ट घेतले त्याची जाणीव मी कायम ठेवली आहे. जेव्हा आई वडिलांना आपण विरोध करतो तेव्हा तो योग्य आहे का हे पाहायला हवे. आईने मला तीन गोष्ट सांगितल्या त्या मी पाळतो. पहिली म्हणजे नेहमी शांत आणि हसतमुख राहायचे. दुसरे म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कमावशील ते समाजाला परत द्यायला शिक. इंद्राणी बालन फाउंडेशनची स्थापना तिच्यामुळेच झाली असे मी मानतो. आजही उत्पन्नातील ३० टक्के वाटा समाजाला देतो. भविष्याचेही नियोजन करून ठेवले असून उद्या आम्ही नसलो तरी हे काम सुरू राहील अशी तरतूद करून ठेवलेली आहे.
पुनित बालन म्हणाले, व्यवसायाची धुरा माझ्याकडे सहजतेने आली नाही वडिलांनी मला पारखून घेतले. मला खरं तर लष्करात जाण्याची इच्छा होती. परंतु पुढे मात्र मी काही काळ नोकरी करून व्यवसायाची धुरा सांभाळली. वडिलांमुळेच मला लोकांशी कसे वागायचे, व्यावहारिक जग कसे समजून घ्यायचे हे त्याच्याकडून समजले. पुनित बालन यांनी आपले वडील एस. बालन यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, वयाच्या ११ व्या वर्षी वडील एस. बालन हे परीक्षेत नापास झाले म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना झाडाला बांधून ठेवले. तो अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी घर सोडले आणि एका ट्रकमध्ये बसून निघाले. तिथून ते थेट पुण्यात रास्तापेठेत एका मंदिरात सोडले. तिथून त्यांच्या वडिलांचा प्रवास सुरू झाला. एक वृद्ध व्यक्ती तिथे नेहमी येत असे व या लहान मुलाला पाहिले. रास्ता पेठेत साऊथ इंडियन मेस लाॅज येथे धुणीभांड्याचे काम लावून दिले. पुढे गुडलकच्या इथे कॅफे डिलाईटमध्ये वेटर म्हणून काही काळ काम केले. अशा खडतर परिस्थितीतून वाटचाल करून एस. बालन हे पुढे आले. तिथून पुढे एस. बालन ग्रुप हा त्यांच्या कष्टातून साकारला आहे. त्याची धुरा मी सांभाळतो आहे.
सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. जीवन जाधव पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
शनिवारवाडा दत्तक घेणार
आपल्या शहरातील जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तू आहेत त्या आपण जपणे गरजेचे आहे. त्यासाठी पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंचे जतन, संवर्धन करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारवाडा दत्तक घेण्याचा आणि तिथे काही चांगल्या सुधारणा घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मत पुनित बालन यांनी व्यक्त केले. सामाजिक बदलात आपल्याला जिथे जिथे योगदान देता येईल ते द्यायला हवे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काश्मीरमध्ये १५ शाळा दत्तक
कूपवाडा, बारामुल्लासह काश्मीरमधील १५ हून अधिक शाळा दत्तक घेतलेल्या आहेत. वर्षाला १५ कोटी रुपये त्या शाळांसाठी दिले जात आहेत. या सर्व मुलांना मोफत शिक्षण मिळेल अशी सुविधा देण्यात आलेली आहे. दहशतवाद्यांचा विरोध असतानाही या शाळा सुरू आहेत. मतिमंद मुलांसाठी एक स्वतंत्र शाळा सुरू आहे. या मुलांना पूर्वी ह्युमन बाँब म्हणून वापरले जात असे. पण आज ती मुले शिकत आहेत. ११० मुले या शाळेत शिकत आहेत. हे काम नेटाने सुरू ठेवणार असल्याचे पुनित बालन यांनी स्पष्ट केले.
अशा युवा परिषदांतून युवकांना चांगली प्रेरणा नक्की मिळेल.