स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
जिद्द, चिकाटी आणि अविरत अभ्यासाच्या जोरावर डोंबिवलीतील १७ वर्षीय विद्यार्थिनी अदिती प्रवीण सकपाळ हिने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स. वा. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अदितीने तब्बल १६ लघुग्रहांचा शोध लावला असून, तिच्या संशोधनाची दखल अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने घेतली आहे. तिच्या शोधातील ‘2024 WA95’, ‘2024 WQ39’ आणि ‘2024 FO7’ या तीन संभाव्य लघुग्रहांची नोंद नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अदितीला इयत्ता आठवीपासूनच अंतराळ संशोधनाची आवड निर्माण झाली. रात्रीच्या आकाशातील तारे आणि अवकाशातील घडामोडींचा अभ्यास करण्याची तिची जिज्ञासा पुढे संशोधनाच्या दिशेने वळली. टिळकनगर विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असलेल्या अदितीने कमी वयात मिळवलेले हे यश तिच्या संशोधक वृत्तीचे द्योतक मानले जात आहे.
पुण्यातील ‘स्पेसक्रॅट्स विद्यापीठा’मार्फत देशभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांमधून निवड प्रक्रिया राबवण्यात आली. चाचण्या आणि सुमारे दहा हजार मुलाखतींच्या खडतर प्रक्रियेनंतर अदितीची ठाणे जिल्ह्याची ‘स्पेसक्रॅट्स ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली. तिच्यासोबत बदलापूरच्या सोहम साळवे याचीही निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य अंतराळ संशोधन प्रशिक्षण पोहोचवण्यात येणार आहे. असा उपक्रम राबवणारा ठाणे हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
अदितीला डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि शिक्षणाधिकारी देविदास पंडीत यांनी तिचे कौतुक केले आहे. अदितीच्या या यशामुळे डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





